आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनेडी हत्येचे 50 वर्षांचे गूढ (कुमार केतकर)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरोबर 50 वर्षांपूर्वी, 22 नोव्हेंबर 1963 रोजी जॉन फिझेराल्ड केनेडी यांची हत्या केली गेली. या एका हत्येने अमेरिकेचे राजकारण एकदम वेगळ्या वळणावर गेले. राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षा व्यवस्थेत जगभरच नवे निकष आले आणि कट-कारस्थानांची नीती अमेरिकेसारख्या देशातही किती हाहाकार माजवू शकते, हे अवघ्या जगासमोर प्रकर्षाने आले.
सर्वसाधारणपणे कोणत्याही राष्ट्रप्रमुखाची हत्या ही कारस्थानाशिवाय होऊच शकत नाही. मग ती अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडींची हत्या असो की इंदिरा व राजीव गांधींची हत्या; महात्मा गांधींची हत्या असो वा अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांची; इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत असोत वा स्वीडनचे पंतप्रधान ओलाफ पाल्मे यांची हत्या असो! अशा कारस्थानाचे कारण कधी देशाचे धोरण बदलणे हे असते; तर कधी मत्सर आणि विद्वेष; कधी सत्ता काबीज करणे, तर कधी एखाद्या भांडवलदार-उद्योग समूहाला स्वदेशी वा विदेशी भले मोठे कंत्राट मिळवून देणे!
जॉन केनेडींची हत्या होऊन आज 50 वर्षे झाली आहेत; पण त्या हत्येचे गूढ अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही, की कारस्थानाचे सर्व धागेदोरे हाती आलेले नाहीत. त्यामुळे अनेक अर्थ-अन्वयार्थ, थिअरीज, कल्पनाविस्तार केले गेले आहेत आणि त्यांच्या आधारे निश्चित सत्यापर्यंत पोहोचणे म्हणजे वाळलेल्या गवताच्या बैलगाडीत पडलेल्या सुईचा शोध घेण्यासारखे आहे.
तरीही काही गोष्टी निदान स्थूलपणे सिद्ध होऊ शकतील, अशा पुढे आल्या आहेत. गेल्या 50 वर्षांत सुमारे 40 हजार पुस्तके केनेडींवर लिहिली गेली आहेत. त्या सर्व पुस्तकांमध्ये अर्थातच हत्येविषयीचे प्रकरण असतेच. पण ज्याला ‘अंतिम सत्य’ म्हणतात, ते हाती लागलेले नाही. म्हणूनच ज्या बाबी स्थूलपणे पुढे आल्या आहेत, त्या समजून घेतल्याशिवाय केनेडींच्या हत्येचे कारस्थान व त्यामागचे राजकारण लक्षात येणार नाही.
जॉन केनेडी अध्यक्षपदी निवडून आले 1960 मध्ये आणि त्यांचा शपथविधी झाला 20 जानेवारी 1961 रोजी. त्याच वर्षी सोविएत युनियनच्या मार्गदर्शनानुसार (आदेशानुसार) 13 ऑगस्ट रोजी बर्लिनची भिंत उभी करायला सुरुवात झाली. हा अर्थातच योगायोग नव्हता. दुसरे महायुद्ध संपून फक्त 16 वर्षे झाली होती. त्या युद्धानंतर दोन महासत्ता जागतिक राजकारणात अवतरल्या होत्या. ब्रिटन व इतर युरोपीय साम्राज्यशाही देश त्या युद्धात निष्प्रभ झाले होते. सोविएत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये जगाचा भूगोल आणि विचारसरणी विभागल्या जाऊ लागल्या होत्या. दुस-या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जर्मनीचे विभाजन झाले होते. जो भाग सोविएत लाल सेनेने मुक्त केला, तो पूर्व जर्मनी म्हणून एक स्वतंत्र देश ओळखला जाऊ लागला आणि जो भाग अमेरिकेच्या दोस्त शक्तींच्या नेतृत्वाखाली मुक्त केला गेला, तो स्वतंत्र पश्चिम जर्मनी म्हणून ओळखला जाऊ लागला.
वस्तुत: जर्मनीला हिटलरी नाझी जोखडातून मुक्त करण्यासाठी स्टॅलिनच्या नेतृत्वाखालचा कम्युनिस्ट रशिया आणि भांडवली व्यवस्थेचे प्रतिनिधी देश अमेरिका व इंग्लंड हे एकत्र आले होते. पण युद्धाच्या अखेरीस त्यांच्यातील वैचारिक आणि राजकीय मतभेद उग्रपणे प्रकट झाले. त्यालाच पुढे ‘शीतयुद्ध’ म्हणून संबोधले गेले. पूर्व आणि पश्चिम जर्मनी हे विभाजन आणि आता बर्लिनची भिंत हे त्या शीतयुद्धाचे प्रतीक बनले.
म्हणूनच केनेडींची हत्या ही शीतयुद्धाच्या दिवसेंदिवस उग्र होत जाणा-या राजकारणातील पहिली स्फोटक ठिणगी आहे. हा खून कुणी केला? अमेरिकन पोलिस खाते, चौकशी आयोग आणि अमेरिकेच्या न्याययंत्रणेने असा निष्कर्ष काढला की, केनेडींची हत्या ली हार्वे ओस्वाल्ड या क्युबन तरुणाने स्वत:च्या जबाबदारीवर आणि कुठच्या तरी अनामिक सुडासाठी केली! अमेरिकेने क्युबातील फिडेल कॅस्ट्रोंची क्रांती दडपण्यासाठी घुसखोरी, दगाबाजी, आक्रमण असे सर्व काही केले होते. त्यामुळे अस्वस्थ आणि सुडाने पेटलेल्या क्युबन तरुणाने केनेडींचा खून केला, असा अमेरिकन व्यवस्थेचा निष्कर्ष होता.
परंतु त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्या निष्कर्षावर जवळजवळ कुणाचाही विश्वास बसलेला नाही. बहुतेक अमेरिकन असेच मानतात की केनेडींच्या खुनामागे अतिशय व्यापक असा कट आहे. मुख्य म्हणजे त्या खुनाच्या व्यापक कटातील मुख्य कारस्थानी खुद्द अमेरिकन प्रशासनातच होते, अशी शक्यता तेव्हापासूनच व्यक्त केली जात होती. ऑलिव्हर स्टोन या विख्यात चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाने ‘जेएफके’ हा चित्रपट बनवला. त्या चित्रपटाला ऑस्कर आणि इतर पुरस्कारही मिळाले. या चित्रपटात तर थेट असे सूचित करण्यात आले की या खुनाच्या कटात त्या वेळचे अमेरिकेचे उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन हेच सामील होते. शिवाय त्यांच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) तत्कालीन मुख्य जे एडगर हूवर यांनीही त्या कारस्थानात भाग घेतला होता. त्या दोघांनी अनेक अधिकारी, काही गुन्हेगार आणि काही राजकारणी यांना त्या कटात सामील करून घेतले होते.
आता तर अशीही माहिती बाहेर येऊ लागली आहे की ओस्वाल्डला खुद्द सीआयए या अमेरिकन हेरखात्यानेच या खुनासाठी दोन वर्षे अगोदर नियुक्त केलेले होते. ओस्वाल्ड सीआयएच्या ‘पे-रोल’वर कधीपासून आणि कसा होता, हेसुद्धा आता बाहेर येऊ लागले आहे. खुनापाठोपाठ लगेच असे सांगण्यात आले होते की ओस्वाल्ड सोविएत युनियनमध्ये गेला होता. दोन वर्षे त्या देशात राहून तो अमेरिकेला आला होता.
येथूनच सर्व रहस्यमय घटनांची सुरुवात होते. ओस्वाल्ड अमेरिका सोडून रशियाला इतक्या सहजपणे कसा जाऊ शकला? तो क्युबन अमेरिकन होता. म्हणजेच अमेरिकन पोलिस व हेरखात्याला चुकवून तो रशियाला जाऊ शकला नसता; त्याचप्रमाणे तितक्याच सहजपणे परत अमेरिकेत येऊही शकला नसता. मग हे त्याला कसे जमले? ज्या डलास शहरात केनेडींचा खून झाला, त्याच शहरात आणि ज्या इमारतीतून केनेडींवर गोळ्या झाडल्या गेल्या, त्याच इमारतीत त्याला नोकरी कशी मिळाली? केनेडींवर त्याने तीन गोळ्या झाडल्या, असे सांगितले गेले. पण प्रत्यक्षात चार गोळ्या झाडल्या गेल्याचे आता सिद्ध झाले आहे. मग चौथी गोळी झाडणारी दुसरी व्यक्ती कोण होती? ही रहस्य-प्रश्नांची मालिका येथेच संपत नाही. सर्वात सनसनाटी घटना होती ती म्हणजे ओस्वाल्डला पकडल्यावर तो पोलिसांच्या ताब्यात असताना जॅक रुबी नावाची एक व्यक्ती आकस्मिकपणे तेथे आली आणि त्या रुबीने ओस्वाल्डवर थेट गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्यामुळे ओस्वाल्डचे निवेदन, त्याची चौकशी, उलटतपासणी, खटला, तेथील जबानी, न्यायालयातील उलटतपासणी हे काहीही झाले नाही. किंबहुना ओस्वाल्ड कदाचित सर्व काही सांगून टाकेल आणि कारस्थान्यांची नावे, कटाचे स्वरूप आणि त्या षड्यंत्रात कोण कोण, कुठे, कधी सामील झाले, याबाबतची माहिती बाहेर येईल, म्हणून त्याचेच तोंड कायमचे बंद करण्यासाठी त्याला ठार मारले. अर्थातच ओस्वाल्डला सर्व गोष्टी जरी माहीत नसत्या तरी त्याच्या निवेदनावरून ब-याच गोष्टींचा उलगडा होऊ शकला असता. जो खुनी होता त्यालाच मारून टाकल्यामुळे गूढ आणि खरे गुन्हेगार अज्ञातच राहिले.
ज्या रुबी नावाच्या व्यक्तीने ओस्वाल्डचा पोलिसांच्या देखत खून केला, तोसुद्धा अमेरिकन हेरखात्यात होता. म्हणजेच खून झाल्यानंतर त्यामागचे सूत्रधार अंधारात ठेवण्यासाठीच हे सर्व प्रयत्न चालू होते. असे म्हणतात की रुबीने तुरुंगात काही आठवणी आत्मनिवेदन स्वरूपात लिहून ठेवल्या आहेत. पण त्या अजूनही प्रकाशात आलेल्या नाहीत.
लिंडन जॉन्सन यांच्या एका सहका-याने लिहिलेल्या आठवणीत त्याने म्हटले आहे की, जॉन्सन यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्त्वाकांक्षा इतकी तीव्र होती की ते उपाध्यक्ष झाल्यापासून संधी शोधत होते.
सत्ता मिळवण्यासाठी ‘किलर इन्स्टिंक्ट’ हवी, अशा विचाराच्या जॉन्सन यांना सीआयए आणि एफबीआय या दोन्ही हेर व पोलिस खात्यांचीही आपल्याला साथ मिळेल, याची खात्री पटल्यावर किंवा त्या हेरखात्यांनी कट रचल्यावर त्यांना जॉन्सन यांची मदत मिळेल, असे त्यांना वाटल्यावर त्यांनी संयुक्तपणे वा स्वतंत्रपणे या खुनाची नेपथ्यरचना तयार केली.अमेरिकन प्रशासन, न्याययंत्रणा यांनी पोलिस खात्याचा अहवाल रास्त मानून ओस्वाल्डने स्वत:च्या जबाबदारीवर आणि व्यक्तिगत खुन्नस ठेवून केनेडींचा खून केला, हीच ‘थिअरी’ जगभर रुजविण्याचा केलेला 50 वर्षांचा प्रयत्न पूर्ण फसला आहे.तरीही मूळ प्रश्न उरतोच.
केनेडींच्या हत्येने कुणाचे काय हेतू साध्य झाले?
1. पहिली गोष्ट म्हणजे, सोविएत युनियनला अप्रत्यक्ष इशारा दिला गेला, की बर्लिनला जी शीतयुद्धाचे प्रतीक म्हणून उभी राहिलेली भिंत आहे, ती भिंत असेपर्यंत जगभर ठिकठिकाणी कम्युनिस्ट राजवटींना व विचारसरणीला अमेरिका लष्करी आव्हान देत राहील. (1989 मध्ये 9 नोव्हेंबरला भिंत पडली आणि दोन वर्षांनी सोविएत युनियनचे विघटन होऊन सुमारे 45 वर्षे चाललेले शीतयुद्ध संपले.)
2. क्युबाचा प्रश्न शांततेने मिटविला जाणार नाही. (केनेडींच्या हत्येनंतर बरोबर चार वर्षांनी सीआयएने कॅस्ट्रोंचे सर्वात निकटचे मित्र, कॉम्रेड आणि क्रांतिकारक चे गव्हेरा यांची बोलिव्हियामध्ये हत्या
केली. म्हणजेच केनेडी हयात असताना हे खूनसत्र त्यांना करता आले नसते; म्हणून सर्वप्रथम केनेडींनाच नेस्तनाबूत करायची ती योजना होती.
3. केनेडींच्या काळात व्हिएतनाममध्ये अमेरिकेचे फक्त सहा हजार सैनिक होते (त्यांना सल्लागार म्हणत असत!), पण केनेडींच्या हत्येनंतर अमेरिकन सैनिकांची संख्या पाच लाखांवर गेली. केनेडींनी व्हिएतनामचे युद्ध इतके विस्तारू दिले नसते, असे अमेरिकन प्रशासनातील युद्धखोरांना व सीआयएला वाटले. केनेडींच्या हत्येमुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला.
4. केनेडींच्या हत्येनंतर पाचच वर्षांनी त्यांचे भाऊ आणि सल्लागार रॉबर्ट ऊर्फ बॉबी केनेडी यांची हत्या झाली. त्याच वर्षी, काही महिने अगोदर, कृष्णवर्णीयांचे गांधीवादी नेते मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या केली गेली. अमेरिकेचे एकूण राजकारणच अधिक आक्रमक, अधिक युद्धखोर, अधिक उजवे करण्याला केनेडी बंधूंचा विरोध होता. केनेडींच्या हत्येनंतर अमेरिका अधिक आक्रमक होत गेली.
5. शीतयुद्धाचे बर्लिन हे प्रतीक होते खरे; पण शीतयुद्ध शिगेला पोहोचलेले असतानाच सोविएत युनियनचे सर्वेसर्वा निकीता क्रुश्चेव आणि जॉन केनेडी यांनी समन्वयाने जगाला तिस-या महायुद्धापासून दूर ठेवले होते. त्या दोघांनी सामंजस्य दाखवले नसते, तर 1962मध्ये क्युबाच्या आखातात दोन्ही महासत्तांच्या अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या समोरासमोर ठाकल्या असताना अणुयुद्ध भडकले असते!
म्हणूनच केनेडींच्या हत्येला शीतयुद्धाचा गडद कॅन्व्हास आहे. गेल्या 50 वर्षांत जग खूपच बदलले - अधिक हिंस्र, अधिक उग्र, अधिक अतिरेकी झाले. केनेडींचा प्रयत्न सामंजस्य वाढवण्याचा, शांतता प्रस्थापित करण्याचा आणि
जागतिक स्तरांवर संवादी वातावरण निर्माण करण्याचा होता. केनेडींच्या हत्येने ती ‘छोटी सी आशा’ लोपली!