आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीरोदात्त नायकाची काळसुसंगत शोकांतिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या कंठाळी वातावरणात समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे, आत्मपरीक्षण करायला लावणारे क्षण अभावानेच येतात. मात्र र. धो. कर्वेंचे संघर्षमय जगणे मांडणाऱ्या ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाच्यानिमित्ताने ही संधी अलीकडेच चालून दिली.  त्या अनुषंगाने हे टिपण...
 
नाटककार अजित दळवीलिखित ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाचा पन्नासावा प्रयोग पाहण्याची नुकतीच संधी मिळाली. एका दुर्लक्षित व्यक्तिमत्वाची अनेक वर्षानंतर नव्याने ओळख झाली. अतुल पेठे यांनी दिग्दर्शनासोबतच या नाटकात रघुनाथराव अर्थात र.धों. कर्वेची रंगवलेली व्यक्तिरेखा नसानसात अशी काही रुजविली होती, की वाटावे साक्षात आपण त्या उपेक्षित महात्म्याच्या तोंडूनच त्याचा तो संघर्षमय धडपडीचा काळ अनुभवतो आहोत.  
 
या संपूर्ण नाटकाची बैठक उपस्थित प्रेक्षकांस सत्तर- ऐंशी वर्षं मागे घेऊन गेली. त्या काळात घडलेल्या घटनांचे चालते बोलते रूप थेट डोळ्यासमोर उभे करते झाली. यातील रघुनाथराव, त्यांच्या सोशिक पत्नी, त्यांच्यावर गुदरलेले खटले, कोर्टातील जबान्या, विरुद्ध अशिलांच्या भडक प्रतिक्रिया हुबेहूब मनावर ठसल्या. समाजाने, व्यवस्थेने दाखविलेली अपरिपक्वता रघुनाथरावांना पावलोपावली व्यथित करते, परंतु ते हार मानत नाहीत, संयम सोडत नाहीत, हे अतुल पेठे आणि सहकारी कलावंतांनी परिणामकारकरित्या साकारले. म्हणूनच समाज स्वास्थ्याकरिता धडपडणाऱ्याच्या पाठी कोर्टातील तारखा मागून तारखा पडण्याचा प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कालवाकालव निर्माण करतो. तर कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांचे ओरडणे, त्यांचे हावभाव, अहिताग्नी राजवाडेंची उच्चारवातील साक्ष आणि मामा वरेरकरांचा संयमी सल्ला सारेच प्रेक्षकांच्या मनावर कोरले जाते. त्यातही खटल्याच्या जाळ्यात गुरफटलेले रघुनाथराव आपला व्याप विसरून पत्नीचे पाय दाबून देताहेत, हा प्रसंग दोहोंतील प्रगल्भ नात्याचे दर्शन घडवतोच, पण एकमेकांमधल्या तरल प्रेमभावनेचेही दर्शन घडवून जातो.  
समाज सुखी आणि सुदृढ राहावा, हे व्रत घेतलेले रघुनाथराव दुर्दैवाने उपेक्षितच राहिले नाहीत, तर आयुष्यभर पैशांनी दरिद्रीही राहिले आणि त्या परिस्थितीला मरेपर्यंत धीराने तोंडही देत राहिले. अर्थात,मृत्युनेही त्यांना वाकुल्या दाखविल्या, १९५३ मध्ये त्यांच्या देहावसनानंतरही त्यांच्या वर एक खटला गुदरला गेला. एवढा काळापुढे पाहणारा थोर माणूस, पण त्याच्या मृत्यूची दखलही त्यावेळच्या व्यवस्थेने घेतली नाही.
 
रघुनाथराव कर्वे आपले वडील ‘भारतरत्न’ धोंडो केशव यांच्याप्रमाणेच प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी होते. वडिलांनी त्यांना सुरुवातीस शाळेत घातलेच नाही. पुस्तकी अभ्यासापेक्षा आपल्या मुलाने काही वेगळे करावे, ही त्यांची इच्छा होती आणि झालंही तसेच. सामाजिक स्वास्थ्य, स्त्रियांची समाजात होणारी होरपळ, लहान वयात होणारी लग्ने, या साऱ्या गोष्टी ते संवेदनशील मनाने रोज पाहात होते. आठ-आठ मुलांचा काफिला पाहून हैराण होत होते. पुढे रितसर शिक्षण पूर्ण होऊन पोटापाण्याकारिता ते जरी प्राध्यापिकी करते झाले, तरी त्यांचा पिंड जणू सामाजिक सेवा करणाऱ्या डॉक्टराचा होता. त्या काळातील म्हणजे, १९२५ सालची परिस्थिती कट्टर प्रतिगामी विचारांची होती. अशा प्रसंगी तीनशे  रुपयांची स्थिर नोकरी सोडण्याचे धाडस करत दोनच वर्षामध्ये पैसे न मिळणाऱ्या सर्वस्वी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याच्या प्रबोधनकार्याच्या उद्योगात त्यांनी स्वतःला बांधून घेतले. १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ हे प्रबोधनपर मासिक चालविण्याचा निर्णय घेऊन, तो अमलातही आणला. खरे तर या आधीपासूनच ‘अष्टपुत्र सौभाग्यवती भव’चा आशीर्वाद हा काही वर्षांनंतर अरिष्ट ठरून लोकसंख्येचा स्फोट करणार  हे त्यांना पदोपदी जाणवत होते. आपल्या भाषणांतून, सततच्या बोलण्यातून ते आपली सडेतोड मते कुणाचीही पर्वा न करता सतत मांडतच होते. मात्र, शिव्याशापांशिवाय त्यांच्या पदरी दुसरे काही येत नव्हते.
 
संतती नियमन हेच सुखी संसाराचे, सुदृढ आयुष्यमानाचे मूळ आहे, हा त्यांनी दिलेला पहिला मूलमंत्र होता. संतती नियमनाचे रघुनाथराव हे देशातील आद्य प्रवर्तक होते. पण हा मान त्यांना न मिळता दुसऱ्या कुणी त्या साऱ्या उपाध्या स्वतःभोवती गुंतवून आरत्या ओवाळून घेतल्या. पण, सुधारकी विचारांच्या परिणामांबद्दल पर्वा न करणारे रघुनाथराव या घटना थिल्लर समजत, फुकाच्या श्रेयाकडे दुर्लक्ष करत.
 
धर्माच्या नावाखाली, खोट्या प्रतिष्ठेच्या मुखवट्या खाली कामवासानेबद्दल बोलायचेच नाही, चुकीच्या समजांना गोंजारतच राहायचे आणि बाल वधुंना, वराना भरकटू द्यायचे,याबद्दल त्यांचा तीव्र आक्षेप होता. स्त्रीचं शरीर म्हणजे काय, कामवासना का जागृत होते, सारख्या विषयांवर पहिल्या अंकापासूनच त्यांनी आपला रोख स्पष्टपणे व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच अंकावर एका नग्न स्त्रीचा फोटो छापल्याने धर्म मार्तंडांचीच नाही, तर साऱ्या सुशिक्षित मध्यम, उच्चवर्गीयांची ‘अश्लील’, ‘कामपिसाट व्यक्ती’ अशी शेरेबाजी त्यांना एेकावी लागली होती. रघुनाथरावांचे या साऱ्या विरोधाला साधेच उतर होते. ते म्हणायचे, ‘सत्य हे नेहमी नग्नच असते, जे मी बोलतो आहे, तेच दाखवतो आहे'. तरीही लोकसन्मान ठेवून त्यांनी हे चित्र बदलले आणि त्या जागी दीपस्तंभाचे मुखपृष्ठ एक वर्षाकरिता योजिले.
 
रघुनाथराव संतती नियमनाबरोबरच कामशास्त्राचेही प्रणेते होते. लैंगिकतेच नाव काढल्यावर तोबा तोबा म्हणणाऱ्यांना ते नुसते ढोंगी म्हणायचे नाहीत,तर त्यांना उपदेशायचे की लैंगिक विषय हा सक्तीने शिकवला गेला पाहिजे, आई- वडिलांनी आपल्या तरुण मुलामुलींना मोकळेपणाने हे सांगायला पाहिजे की, लैंगिकता ही फक्त अंधारात, गुप्ततेत बोलण्याची बाब नाहीये, तर मनापासून आनंद घेण्याची देण्याची प्रवृत्ती आहे. पण आपण त्यापासून नुसते दूर जात नाही, आहोत तर अज्ञानानामुळे अनेक समस्या निर्माण करत आहोत. वाढती जनवृद्धी ही त्यातील सर्वात मोठी समस्या आणि तिच्या सदैव शिकार होणाऱ्या या स्त्रियाच, अबलाच असणार आहेत, हे त्यांच्याच वडिलांना-आई-भाऊ-बहिणींना कसे उमगत नाही, ते तळमळीने विचारत राहायचे. आपणास मूल पाहिजे की, नको याचा अधिकार हा स्त्रियांनाही असला पाहिजे म्हणून रघुनाथराव आग्रही होते. स्त्रियांना मूल नसल्याचे जेवढे दुःख असते, तेवढेच नको असतानाच्या बळजबरीचेही असते. पण समाजाची भूमिका स्त्री म्हणजे, पतिव्रता आणि आज्ञेत राहणे हीच तिची जबाबदारी... यास रघुनाथराव  पुरुषी अहंकारी सरंजामदारी म्हणायचे.
धर्ममार्तडांचे वर्चस्व असल्याच्या काळात रघुनाथरावांनी संतती नियमन केंद्रे चालू केली. भयानक लोकसंख्येचा जेव्हा भार सोसवेनासा होईल, तेव्हा दोन किंवा तीन मुलांचा कायदा करणे भाग पडेल, ही त्यांची त्या वेळची भविष्यवाणी होती. जी आज आपण खरी झाल्याचे पाहतो आहोत. संतती नियमन केंद्र त्यांनी सुरु तर केलीच, पण लोकांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, म्हणून फ्रान्समधून पुरुषांनी वापरायची साधनेही आयात करण्याची त्यांनी हिंमत दाखवली. 
 
आज त्यांचे हे विचार ऐकता -वाचताना जाणवते की खरेच हा माणूस किती दूरदर्शी होता. आजही, जग एवढे प्रगत झाले असताना समलिंगी संभोग, समलिंगी विवाह यावर जगभर किती वादविवाद चालू आहेत, पण रघुनाथरावांनी त्या काळात समलिंगी आकर्षण ही उपजत प्रवृत्ती आहे आणि ती जपलीच पाहिजे, म्हणून त्याचे सतत समर्थनच केले. त्याही पुढे जाऊन त्यांनी धार्मिक समजुतींवरही हल्ला केला. स्त्रीची योनी ही पावित्र्याची खूण हे म्हणणे निव्वळ बकवास आहे, उलट स्त्रीलासुद्धा जर एखादा पुरुष आवडला, तर त्याबरोबर समागमाचे स्वातंत्र्य मिळावयासच पाहिजे, असे ते उघडपणे लिहावयाचे.
 
रघुनाथराव आपल्या तंद्रीत, आपल्या विषयात रममाण होते, पण त्यांना धर्मद्रोही, समाजद्रोही आणि शेवटी देशद्रोहीही ठरविले गेले. रघुनाथराव तेव्हादेखील काळाच्या पुढे होते. पण समजा, आज ते असते, तर आजच्या धर्म-समाज आणि राजकारणाचा कट्टरपणा पाहता  ते पूर्वीइतकेच समाजद्रोही-धर्मद्रोही ठरलेे असते. 
 
एकूणच,धोडो केशव कर्वे या महात्म्याचा हा मुलगा आपल्या तत्वांकरीता आयुष्यभर उपेक्षित जीवन जगला. सूर्यापोटी शनी म्हणून हिणविला गेला. पण हा वडिलांच्या सूर्यतेजाएवढाच, खरे तर कांकणभर जास्तच तळपला. त्याच्या त्या प्रखर तेजामुळेच कदाचित आम्ही त्याच्याकडे पाहूच शकलो नाही, ही बोच ‘समाजस्वास्थ्य’च्या प्रयोगाने जाणत्यांच्या मनात नव्याने उत्पन्न केली. एका क्रांतिकारी प्रबोधनकाराची आपण अक्षम्य अशी अवहेलना केली, याचीदेखील तीव्रतेने जाणीव करून दिली...
 
- कुमार नवाथे 
Kumar.nawathe@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९९७०२१७२६१ 
बातम्या आणखी आहेत...