आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kumudini Deshpande Aurangabad About Sant Literature

तुका म्हणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानपणापासून मी बरंच ऐकत आले. म्हणून थोड्या थंडपणाने पण खरोखरी आदराने आणि प्रामाणिकपणाने सांगते की, संत वाङ््मयाबद्दल आणि संतांबद्दल मला फार प्रेम आहे, आदर आहे. त्यांच्या वाङ्मयाने एक महत्त्वाचा दृष्टिकोन दिलेला आहे. ऊठसूट उपदेश करणाऱ्या वडील माणसांपेक्षा संतांविषयी मला अधिक आदर वाटतो.

तुकारामांचे अभंग अर्थ, आशय आणि काव्य या तिन्ही दृष्टीने मला आवडतात, त्यात जास्त आपलेपणा जाणवतो. त्यांचे ते परखड बोलणे, शिवीगाळ करणेही आवडते. नामा म्हणे, तुका म्हणे, असे शेवटच्या ओळीत असणारे शेकडो अभंग ऐकले. ऐकता ऐकता गहिवरले, कळवळले, पावन धन्य झाले. पण सतत तुका म्हणे ऐकून थकवा येऊ लागला. रोज उपदेश ऐकून हे महात्मे आपल्याला भीती घालतात असं वाटायला लागलं, तेही आसूड उगारून फटके मारत दाखवलेली भीती.

संयम हवा, शिस्त हवी, पद्धत हवी असे किती वेळा म्हणत राहायचे. त्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्यातील गंमत जाते. कित्येक घरांतून मुलांच्या मागे असे करावे, तसे करू नयेचा धोशा चालू असतो. विशेषत: मागच्या पिढीत हे फार होते. म्हणूनच त्या काळातील कित्येक विद्वान झालेली, प्रसिद्धीस आलेली, थोर माणसे घरातील उपदेशाला कंटाळून घरातून पळून गेलेली आहेत. सर्वसाधारण तरुण वयात चांगलंवाईट कळत असतं. कळत नाही असा एक काळ प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो. कळतं पण वळत नाही असा!

मनुष्य म्हातारा झाला, करून सवरून भागला, देवपूजेला लागला तसा तो तरुणपण जणू विसरून जातो. आपण कधी चुकलोच नव्हतो, असा आव आणतो आणि घरातील मुलांना हे करू नका, ते करू नका म्हणत त्यांना जेरीस आणतो. अशा उपदेशाच्या भडिमाराने तरुण माणसाचे डोके उठते. माणसाला सल्ला हवा असतो, पण उपदेश नको असतो. माणसाला अमुक कर म्हटलेले चालते. पण अमुक करू नको म्हटलं की त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचते. कित्येक वृद्धांना उपदेश करण्याची सवयच असते. त्यांना वृद्धपणीसुद्धा नाटक, सिनेमा पाहावासा वाटतो. पण तरुण कोणी चित्रपटाला निघाले की त्यांना हटकतात.

तरुण मुलांवर संसकार करू नयेत, असं मला म्हणायचं नाही. पण ऊठसूट संस्कार, उपदेश म्हणजे कडू औषध दिल्यासारखेच. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. माणसाने काय बोलावे हे जितके शहाणपणाचे म्हणजे फायद्याचे तितकेच त्याने काय बोलू नये हेही फायद्याचे!
प्रत्येक माणसाची जीवनाकडे बघण्याची भूमिका वेगळी असते, विचार असतात. त्यालाही तेच वाटत असतं की माझं म्हणणं खरं! दुसऱ्याची काही वेगळी मतं, वेगळे विचार असू शकतात, हे कुटुंबातील वृद्धांनी जाणलं पाहिजे. गांधीजी काय म्हणतात, तुकाराम काय म्हणतात, नामा काय म्हणतो, हे सर्व सतत सांगून आम्हाला भंडावून सोडू नका, आमचं आम्हाला इकडे-तिकडे बघू द्या. तुम्ही चुकला असाल, पडला असाल, आम्हालाही पडो, झडो, माल वाढो असं वागू द्या. तुम्ही रस्ता दाखवावा, अपघाताच्या खुणा सांगाव्यात, सगळे सांगावे. आमचे म्हणणे पण तुम्ही ऐकावे. सतत तुमचे बोट धरावे हा आग्रह कशाकरिता!