आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रजांच्या द्रष्टेपणाची सोहळ्याने नव्या पिढीला प्रचिती

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कविता एखाद्याला उघडे-नागडे वास्तव दाखवू शकते तसेच ती एखाद्याला जगण्याची ऊर्जाही देते. कुसुमाग्रजांच्या कवितेने हे बळ दिले, त्या त्या काळातली सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती त्यांच्या कवितांमधून मांडली म्हणूनच हा कवी द्रष्टाकवी ठरला.
या कवीमधल्या नाटककाराचे लेखनही वेगळ्याच प्रकारचे. डॉ. जब्बार पटेल यांनी ‘कुसुमाग्रजांच्या नाटकांकडे आधुनिक रंगभूमीवरील कलाकारांनी वेगळ्या अर्थाने पाहायला पाहिजे’ असे विधान सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमात केले. आज स्वगतांचा जमाना नाही. लांबलचक, पल्लेदार वाक्येदेखील आता टाळ्या घेत नाहीत; पण कुसुमाग्रजांच्या नाटकाची ही शैली वगळता त्यांच्या नाटकांच्या विषयांमध्ये, आशयामध्ये किती तरी आधुनिक पिढीची संक्रमणे दडलेली आहेत याचा विचार व्हायला हवा. त्यांचे मुख्यमंत्री, बेकेटसारखे नाटक असो वा सुपरिचित नटसम्राट असो. या सगळ्या नाटकांचे विषय हे आजच्या काळाशीही सुसंगत आहेत. आधुनिक रंगभूमीने स्वत:चे असे नवे विषय विकसित करताना कुसुमाग्रजांची ही नाटकेदेखील नव्या पद्धतीने विकसित केल्यास रंगभूमी व प्रेक्षक यांच्यातले नाते अधिक दृढ होईल, असे वाटते. यामुळेच जब्बार पटेल यांनी केलेले विधान अतिशय समर्पक आहे, असे येथे म्हणण्यास हरकत नाही.
या वेळी समारोपप्रसंगी झालेला ‘अद्वैत कुसुमाग्रजांच्या कवितेचे, नाटकाचे’हा सौमित्र यांची संकल्पना असलेला कार्यक्रम सादर झाला. अभिनेत्री रिमा लागू, सचिन खेडेकर, मुक्ता बर्वे, विभावरी आपटे, संजीव मेहंदळे यांनी हा कार्यक्रम सादर केला. यात कौतुकास्पद ठरले ते सौमित्र यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांमधले काढलेले अन्वयार्थ आणि त्यातून रेखाटलेली संहिता. परमेश्वर रिटायर होतोय या कवितेतील परमेश्वराला ओळखणारे साक्षीदार कोण असतील ही शक्याशक्यता स्वत: विकसित करीत समाजातल्या वास्तवाला हेरत केलेले सादरीकरण कुसुमाग्रजांच्या कालसापेक्ष लेखनाला सलाम करणारे ठरले.
कवितेतल्या दोन ओळींमधली जागा ही नेहमीच अव्यक्त असते, वाचणाºयाला तिचा अर्थ लावण्यासाठी तिथे जागा मोकळी सोडलेली असते. तिचा पुरेपूर वापर सौमित्र यांनी मूळ कवितेच्या अर्थाला धक्का न लागू देता केला. अर्थात मुक्ताची अभिवाचनाची शैली, रिमा लागूंच्या वाचनातली प्रगल्भता, खेडेकरांचा ठेवणीतला टोन यांनी ही संहिता अत्यंत अर्थपूर्ण व प्रवाही ठरली यात दुमत नाही. मुळात एखाद्या दिग्गज कवीच्या कवितांच्या अर्थाचे हे नव्या पिढीने मांडलेले पुढचे पाऊल होते. या कार्यक्रमाने कुसुमाग्रजांच्या कवितांना नव्या पिढीच्या अर्थांचा एक वेगळाच चेहरा दिला, असे म्हणावयास हरकत नाही.
नाटक आणि कविता उलगडवत असताना कुसुमाग्रज कळले असं वाटतं एका क्षणी; पण दुसºयाच क्षणी ते अतर्क्य, अगम्य वाटायला लागतं. मात्र, कळण्यापेक्षा त्यांचे लेखन ‘आपलं’ वाटतं यातच सारं आलं नाही का ? सांगता सोहळ्यातला सगळ्यांच्या मनात दाटलेला गहिवर तरी हेच सांगत होता.