Home | Magazine | Madhurima | l-p-shoppe-article

एल. पी. शॉपीची उद्योगभरारी

चंद्रलेखा दिंडे औरंगाबाद | Update - Jun 10, 2011, 01:12 PM IST

प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत लताताइंनी आपला व्यवसाय वाढवला आहे. सुरुवात ज्या व्यवसायापासून केली त्याच्या जोडीला आज त्या इतर व्यवसायही करतात. ग्राहकांना नवीनतम सुविधा पुरवणे हाच त्यांचा ध्यास आहे.

 • l-p-shoppe-article

  महत्त्वाकांक्षी, करिअर वूमन आणि नातीगोती सांभाळणारी केअर टेकर गृहिणी या दोन्ही अवघड जबाबदाºया पार पाडणारी अशी आजच्या आधुनिक स्त्रीची सार्थ ओळख. अशीच एक गृहिणी लता प्रताप पाटील यांनी एका व्यवसायाच्या वाटेवर गेल्या पंधरा वर्षांत मोठी उद्योगभरारी मारली आहे.
  त्यांचा जीवनप्रवास पाहिला तर प्रत्येक वेळी प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढत जाण्याची वृत्ती सहज ध्यानात येते. बारावीला असताना लग्न झाले. लग्नानंतर भेंडा (नेवासा) साखर कारखान्यावर क्वार्टर्समध्ये एकाकी राहण्याची वेळ आली; पण दुर्दम्य इच्छाशक्तीने शिक्षण चालूच ठेवले. एम.कॉम. करेपर्यंत पारनेर-तुळजापूर असा साखर कारखान्याचा प्रवास झाला. शहरीकरणापासून दूर राहण्याची वेळ निभावून नेली.
  अचानक जीवनाला कलाटणी मिळाली. पतीला साखर कारखाना सोडून एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. अहमदपूर, जि. लातूर येथे नवीन ठिकाणी व्यवसायाची नांदी झाली. पतीच्या प्रोत्साहनाने 19९३च्या दसºयाला केवळ ५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर सुरतला जाऊन साड्या आणल्या. अहमदपूरसारख्या ठिकाणी शहरातील फॅशन पोहोचायच्या आत त्यांच्याकडील विविध फॅन्सी साड्या हातोहात खपू लागल्या. त्यांनी मग एल.पी. शॉपी या नावाने घरीच या व्यवसायाला सुरुवात केली. गावातील वाढत्या ओळखी त्यांना व्यवसायासाठी फायदेशीर ठरल्या. क्रेडिटवर माल देत असल्याने अडी-अडचणीला बायकांनी भरवशावर माल नेला.
  नेहमीच दर्जेदार व्हरायटी व चांगल्या रंगसंगतीच्या साड्या हे त्यांच्या शॉपीचे वैशिष्ट्य आहे. त्यांची शॉपी अल्पावधीत घराघरात पोहोचली आहे. त्यांनी हळूहळू सुटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, टॉप्स, बेडशीट्स, गालिचे, पडदे, लिनोलियम, पुलगमच्या प्रसिद्ध सोलापुरी चादरी, लक्झरियस ब्लँकेट्स ठेवायला सुरुवात केली. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. छोटेखानी बस्ते त्या देऊ लागल्या. रास्त दर, मालाची गॅरंटी व हवा तसा माल उपलब्ध करून दिल्यामुळे महिला सर्कल वाढले. त्याचबरोबर फॅमिली खरेदीसाठी येऊ लागल्या. दसरा, दिवाळी, संक्रांत या सणांना आजही प्रचंड गर्दी असते. याच वेळी ओरिफ्लेम या स्वीडिश कंपनीचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स त्यांनी ठेवायला सुरुवात केली. हळूहळू त्यातही जम बसवला. पाटीलबाई जे वापरतील त्याला बायकांकडून लगेच मागणी येते. दिवाळीत पणत्या रंगवून विकण्याचा सिझनल उद्योगही त्या आपल्या मुलीसोबत करतात. विविध पर्सेसही विक्रीसाठी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
  सध्या पैठणीचा धंदा जोरात चालला आहे. खास येवल्याहून माल आणतात. रंग, पोत, व्हरायटी यासाठी त्यांचा चॉईस सिलेक्टिव्ह असल्याने पैठणी विक्रीतही त्यांनी जम बसवला आहे. या कामात पतीची मोलाची साथ त्यांना लाभली आहे. प्रचंड मेहनत, व्यवहारी दृष्टिकोन, व्यावसायिकरीत्या हा धंदा त्यांनी कुशलतेने उभारला. एकातून अनेक उद्योग उदयाला आले; पण त्याचा सर्व भार त्या सांभाळत आहेत.
  पाच हजार रुपयांच्या अल्प भांडवलात उद्योग सुरू करून त्याचा लाखाच्या वर टर्नओव्हर त्यांनी नेला आहे. आता त्यांच्या व्यवसायासाठी त्या राजस्थान, अहमदाबाद, दिल्ली येथून माल आणतात. क्रोकरीपासून लोकरीपर्यंतचे सर्व आयटम त्या ठेवतात. अहमदपूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी केवळ दूरदृष्टीने त्यांनी उद्योगभरारी घेतली आहे.

Trending