Home | Magazine | Rasik | lalit-modi-poject-victoria

खतरों का खिलाडी

प्रशांत पवार, राज्य वृत्त समन्वयक-दिव्य मराठी | Update - Jun 01, 2011, 06:59 PM IST

मोदीची ही दुसरी इनिंग कोट्यवधींचा घोटाळा केल्यामुळे तुरुंगाची हवा खात संपते की इंग्लंडमधील प्रोजेक्ट व्हिक्टोरिया हे आणखी एक नवे बाळ जन्माला घालून संपते हे, पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरेल.

  • lalit-modi-poject-victoria

    अंगावर अर्मानी सूट... सोनेरी कडा असलेला चष्मा आणि कानाला कायम व्हर्टूचा मोबाईल... ललितकुमार मोदीचे हे रूप यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले नाही. ज्याने आयपीएल ही मिलियन डॉलर बेबी जन्माला घातली तोच ललित मोदी आज नालायक बाप ठरला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, सीबीआय, प्राप्तिकर खाते, सक्त वसुली संचालनालय सगळेच जण मोदीच्या हात धुऊन मागे लागले आहेत. आयपीएलच्या फ्रॅन्चायझीमध्ये आपल्या नातेवाइकांची भागीदारी, फ्रॅन्चायझी मिळवून देण्यासाठी केलेली तोडपाणी आणि टेलिव्हिजन राईट्सच्या मिळकतीमध्ये असलेला छुपा आर्थिक सहभाग, असे अनेक काळे धंदे केल्यामुळे मोदी भारतातून पळून गेला आहे. मोदी लंडनमध्ये लपून बसलाय असेही म्हटले जाते, तर तो अबुधाबीमध्ये असल्याचीही कुजबूज कायला मिळते.
    आता ही चौथी आयपीएल यशस्वीपणे पार पडतेय की या वेळी तितकासा जोर दिसत नाही यावर उलटसुलट चर्चा आहेत. आयपीएलचे जाहिरातदार म्हणतात की या वेळी किमान ११ टक्के इतके नुकसान आम्हाला सोसावे लागत आहे, तर ज्यांनी मोदींकडून सुत्रे हिसकावून घेतली ते आयपीएल - फोरचे चेअरमन चिरायू अमीन म्हणतात की, या वेळच्या आयपीएलमधून आम्ही किमान १ कोटी रुपये वाचविले आहेत जे यापूर्वीच्या आयपीएलमध्ये नाहक खर्च व्हायचे. उदाहरण देताना त्यांनी आयपीएलचे सामने संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या पार्ट्याबद्दल सांगितले. मुळात खेळाडू प्रचंड दमलेले असताना अशा
    पार्ट्याची गरजच काय? त्यामुळे पार्ट्याचे हे सत्र रद्द करून आम्ही कोट्यवधी रुपये वाचवले असल्याचे अमीन यांनी सांगितले. हे सगळे होत असताना मोदी सध्या करतोय तरी काय याबद्दलही तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. जे मोदीला अनेक वर्षांपासून ओळखतात त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक होता मोदी... असे तुम्हाला कधीच म्हणता येणार नाही. कारण मोदी कधीच संपणार नाही. मोदी लंडनमध्ये लपून बसलाय असे म्हटले जात असले तरी मोदी लपून बसलेला नसून तो तिकडेही क्रिकेटचा धंदाच करायला गेलाय. इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटचे एक वेगळेच स्थान आहे. हे लक्षात घेऊन आयपीएलचा मास्टरमाइंड ललित मोदीने आता इंग्लंडमध्ये बंडखोरांची ट्वेन्टी-२0 स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत कधीही न पाहिलेली ट्वेन्टी-२0 असे या स्पर्धेचे स्वरूप असणार असून त्यात कौंटी क्रिकेटचे म्हणजे यॉर्कशायर, वॉरिकशायर, लँकेशायर यासारखे नामवंत संघ सहभागी होणार असल्याचे कळते. या स्पर्धेचे एकूण बजेट आहे १.२ बिलियन पौंड. या मॉडेलचे नामकरण झाले आहे प्रोजेक्ट व्हिक्टोरिया... ललित मोदी आणि इंटरनॅशनल मॅनेजमेन्ट ग्रुप (आयएमजी) या दोघांनी मिळून सध्या कौंटी क्लबच्या संचालकांशी बोलणी सुरू केली आहेत. मोदीच्या या नव्या प्रोजेक्टमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे धाबे दणाणले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या थिअरीनुसार प्रोजेक्ट व्हिक्टोरियासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डापेक्षा वेगळी अशी नवीन कॉर्पोरेट गव्हर्निंग समिती नेण्यात येणार असून, त्यांच्यामार्फतच प्रोजेक्ट व्हिक्टोरियाचा कारभार केला जाणार आहे.
    या समितीमार्फतच कौंटी क्लबशी संलग्नित फ्रॅंन्चायझींशी करार करण्यात येणार आहे. या फ्रॅंचायझींच्या कार्यपद्धतीचा फॉम्र्युला हा आयपीएलसारखाच ठेवण्यात आला आहे.प्रोजेक्ट व्हिक्टोरियाबद्दल अद्याप विस्तृत माहिती बाहेर आली नसली तरी, जर ललित मोदीने त्यात हात घातला तर त्याचे नक्कीच सोने होईल याबद्दल अनेकांना खात्री आहे. आयपीएलमध्ये अनेक उद्योजक, बॉलीवूडचे सेलिब्रिटी आणि राजकीय नेते हे केवळ मोदीच्या मास्टरमाइंडवरच करोडो रुपये गुंतवायचे. कारण एक गोष्ट त्यांना नक्की माहीत होती की, तुम्ही मोदीला तुमच्याकडचे १ रुपये द्या, तो हमखास त्याचे किमान १५ रुपये तरी करून देणारच... आज मोदी जरी आयपीएलच्या बाहेर असला तरी त्याच्याच जोरावर बोर्ड अधिकाधिक श्रीमंत होत चालले आहे हे कबूल करावेच लागेल. आता उत्सुकता आहे ती मोदीच्या या नव्या इनिंगची. ही दुसरी इनिंग कोट्यवधींचा घोटाळा केल्यामुळे तुरुंगाची हवा खात संपते की इंग्लंडमधील प्रोजेक्ट व्हिक्टोरिया हे आणखी एक नवे बाळ जन्माला घालून संपते, हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरेल.

Trending