आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर आला... आदिवासी खचला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यमवर्गीय शहरी मानसिकतेला रोमँटिक भासणारा पाऊस आदिवासी भागात मात्र पुराचे थैमान घालत दरवर्षी आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. जिल्हा तर दूरच राहिला, तालुक्यापासूनही ४०-५० किलोमीटर अंतरांच्या आदिवासीबहुल गावांमध्ये पावसाचे चार महिने आणि पुढचे तीन महिने  दैन्यावस्थेत जातात. या काळात तालुक्याच्या गावी जाण्याची वेळ आलीच तर नाइलाजाने एकेक दोन-दोन जण लाकडाचा डोंगा (तात्पुरती नाव) बनवून जीव धोक्यात घालून नदी पार करताना दिसतात.  कारण, भामरागडसारख्या तालुक्यात अजूनही अशी किती तरी गावं आहेत, जिथे आजवर पक्के रस्ते, पूल बांधलेच गेलेले नाहीत. अबुजमाळ नावाचा एक भाग आहे. जिथल्या अनेक गावांचीच सरकार दरबारी नोंद झालेली नाही. तिथल्या आदिवासींकडे अद्यापही आधार, कार्ड रेशन कार्ड वा इलेक्शन कार्ड नाही. इथून तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला जायचं म्हटलं तरीही, लोकांचे येणे-जाणे मिळून सहा दिवस खर्ची पडतात.  
पावसाळ्यात इथल्या आदिवासींचा जगाशी संपर्क तुटतो. एकदा नव्हे चार-पाचदा असे घडते. या काळात गावांमध्ये काय घडते, कोण जगते, कोण मरते याची जगाला खबरच लागत नाही. म्हणूनच या भागाला ‘अबूज-मिस्ट्री’ असेही संबोधले जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मी कुमनार नावाच्या अत्यंत दुर्गम गावात राहायला गेलो होतो. या गावातला एकही जण शिकलेला नाही. शाळा काय आहे, आरोग्य सुविधा म्हणजे काय, याचा या गावाला पत्ता नाही.  प्राणी-पक्षी जसे निसर्गाच्या भरवशावर जगतात तसं याचं जगणं-मरणं सुरू असतं.

पावसाळ्याच्या काळात भामरागड भागात साप चावण्याच्या घटना तर खूप घडतात. साप चावलेल्या व्यक्तीला शासकीय रुग्णालयात नेणे हा एकमेव उपाय असतो. मात्र, काहीच सोयी-सुविधा नसल्याने सर्पदंश असो वा टीबीसारखा जीवघेणा आजार माणसं उपचाराविनाच दगावतात. अंधश्रद्धेचा पगडा असल्याने तंत्रमंत्राच्या नादी लागतात. लहान मुलं, वयोवृद्ध यांची अवस्था पावसाळ्यात भीषण असतेच, पण महिलांना पराकोटीच्या यातनांना तोंड द्यावे लागते. आजही आदिवासीं गावांमध्ये “कुर्मा’ परंपरा पाळली जाते. या परंपरेनुसार मासिक पाळी आलेल्या मुलीला वा महिलेला 

घरात राहण्यास सक्त मनाई असते. घरापासून दूर जंगलाच्या दिशेने बांधलेल्या झोपडीत तिला या काळात दिवस काढावे लागतात. प्रथेप्रमाणे मासिक पाळी आलेल्या महिलेचा चेहरा बघणे, तिला हात लावणे निषिद्ध मानले जाते. पावसाळ्याच्या काळात जेव्हा महिलांना मासिक पाळीमुळे घरापासून दूर राहणे भाग पडते,  त्या झोपड्या किमान झोपण्याएवढ्यादेखील मोठ्या नसतात. इतर सुविधांचा तर प्रश्नच नसतो. अशा वेळी कुणा महिलेला साप चावला तर मरण हेच तिचं भागधेय असतं. इतर वेळी खाटेला माणसाला बांधून चार जण कमीत कमी १० ते अधिकाधिक ४० किमी पर्यंत चालत जाऊन रुग्णालय गाठतात. एवढं करूनही वाटेतच रुग्ण दगावणार नाही किंवा रुग्णालयात सोयी उपलब्ध असतील याची जराही शाश्वती नसते.  

भामरागड तालुक्यात टेकला नावाचं एक गाव आहे. या गावातली माझ्या ओळखीतली लग्न झालेली एक मुलगी होती. मासिक पाळीच्या दरम्यान घरापासून दूर झोपडीत राहत असताना तिला साप चावला. पण तिची मासिक पाळी सुरू आहे, म्हटल्यावर कुणीही तिला मदत केली नाही. त्यातच ती मरण पावली. एरवी, भामरागड तालुक्यातल्या कित्येक आदिवासी गावांमध्ये डॉक्टर पोहोचत नाही. शिक्षक पोहोचत नाहीत. यातल्या अनेक भागात १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे अशा वर्षातून तीन वेळाच  शिक्षक नजरेस पडतात. या शिक्षकांना झेंडा मास्तर म्हटले जाते. ज्यांना कुणाला शिक्षा द्यायची असते, त्या शासकीय कर्मचाऱ्यांची भामरागडला बदली केली जाते. त्यामुळे त्यांना ही एक प्रकारे काळ्या पाण्याची शिक्षा वाटते. समजा कुणी बदली घेऊन आलेच तर तालुक्याच्याच ठिकाणी वास्तव्याला असते. 

आदिवासी गावांपर्यंत जाण्यास कुणालाच रस नसतो. पावसाळ्यात जगापासून तुटल्यामुळे आदिवासी कसेबसे तग धरून असतात. दिवाळीच्या निमित्ताने जेव्हा ते एकमेकांना भेटतात, तेव्हा अमुक एक जण दगावल्याचं त्यांना कळतं. जेव्हा कधी पावसाळा सरतो, नद्या- नाल्यांचे पाणी ओसरते, दिवस-दिवस प्रवास करून मीठ-मिरची घेण्यासाठी ते तालुक्याच्या ठिकाणी पोहोचतात. आदिवासींना मिठाचं खूप महत्त्व असतं. त्यांच्यासाठी ती अत्यंत दुर्मिळ गोष्ट असते. मीठ देणाऱ्याला ते देवमाणूस मानतात. इतर वेळी जेव्हा पाहुणे एकमेकांना भेटतात. पाहुणा आवर्जून मीठ देतो. दरवर्षी पावसाळा आदिवासींसाठी संकटं घेऊन येतो. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, दळणवळणाच्या कोणत्याच सुविधा नसल्याने आदिवासींच्या व्यथा-वेदना पुराच्या पाण्यात वाहून जातात. त्या इतरांपर्यंत कधी पोहोचतच नाही.  शासन आदिवासी गावांपर्यंत पोहोचत नाही. पोहोचले की नक्षली त्याला विरोध करतात. यात आदिवासींचं मरण मात्र निश्चित ठरलेलं असतं... 
 
- लालसू सोमा नोगोटी 
advlalsunogoti@gmail.com
लेखक आदिवासी प्रश्नांचा अभ्यास असलेले कार्यकर्ते आहेत
लेखकाचा संपर्क-९४०५१३०५३०
बातम्या आणखी आहेत...