आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनचे महानुभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथे नुकतेच महानुभाव साहित्य संमेलन भरले होते. मी या संमेलनाचा अध्यक्ष होतो, तर अमरावतीचे मोठे बाबा (म. कारंजेकर बाबा) नि महाराष्‍ट्राचे सर्व प्रमुख महानुभाव महंत या प्रसंगी उपस्थित होते. त्या वेळी माझे गेल्या पाच दशकांचे स्नेही प्रा. पुरुषोत्तम नागपुरे (पुरुषोत्तमदादा कारंजेकर व लीळाचरित्राच्या सध्याच्या पंथमान्य प्रतीचे संपादक) मला भेटले. तेव्हा लंडन विद्यापीठाच्या डॉ. रेसाईड यांचीही आठवण आम्हाला झाली. नागपुरे हे नुकतेच लंडनला जाऊन आले. तेव्हा डॉ. रेसाईड यांचे 30 जानेवारी 2011रोजी निधन झाल्याचे त्यांना कळले. रेसाईड यांच्या आठवणींना मी व नागपुरे यांनी उजाळा दिला. त्या अनुषंगाने माझे चार-पाच दशकांपूर्वीचे ते दिवसही मला आठवू लागले...लंडन विश्वविद्यालयाच्या प्राच्यविद्या (‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’) संस्थेतील मराठीचे प्राध्यापक डॉ. इआन रेसाईड यांची नि माझी औरंगाबादेत मराठवाडा विद्यापीठात भेट व्हावी नि पुढे तिचे स्नेहात रूपांतर व्हावे, हा एक सुखद योगच होता. मी महानुभावीय संशोधनावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. मराठी विभागातर्फे शेकडो महानुभावीय हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला होता. या संग्रहातील हस्तलिखितांच्या संशोधनासाठी
डॉ. रेसाईड आले होते. त्या वेळी ते महानुभाव ग्रंथकार हयग्रीवाचार्य यांच्या ‘ग्रंथराज’ या ग्रंथाविषयी संशोधन करत होते. त्याविषयीची व त्यांना आवश्यक असलेली अन्य सर्व माहिती दिली गेली होती, पण या ‘अवघड’ संशोधन क्षेत्राकडे डॉ. रेसाईड का वळले असावेत, याबद्दल मला फार कुतूहल नि आश्चर्य वाटले होते. त्याचे एक कारण हेही होते की, अनेक महानुभाव गं्रथ सांकेतिक लिप्यांत आहेत, त्यांची(लिप्यांची) संख्याच जवळपास 40-50 आहे. ‘सकाळ’, ‘सुंदर’ या महानुभाव सांकेतिक लिप्यांविषयी काही संशोधकांना थोडीफार कल्पना असते, पण अन्य म्हणजे इंस अंक, पारिमांडल्य इत्यादी लिप्यांविषयी तितकीशी कल्पना नसते; शिवाय यांपैकी काही लिप्यांत केवळ अक्षर-संकेतच नसतात तर शब्दसंक्षेपही असतात. काही आकृती चित्र संकेत असतात, तर शीर्षरेषा नि काही विरामचिन्हे यांचेही संक्षेप असतात. शिवाय महानुभाव तत्त्वज्ञान नि आचारधर्म (असतीपरी) यांचेही अन्य महाराष्‍ट्रीय संप्रदायांपेक्षा वेगळेपण आहेच. डॉ. रेसाईड यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या सर्व बाबीसंबंधी संशोधन केले होते. एवढेच नव्हे, तर उपलब्ध असलेल्या समग्र महानुभाव साहित्याची सूची लंडन विश्वविद्यालयाच्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केली होती. याशिवाय महानुभावीय सांकेतिक लिप्यांविषयीचा विस्तृत महत्त्वपूर्ण संशोधनपर लेख त्यांनी या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध केला होता.
त्यानंतर डॉ. रेसाईड यांची भारतात पुन्हा भेट झाली. त्या वेळी ते महानुभावीय संशोधनाबरोबरच मराठी बखर-वाङ्मयाकडे वळले होते. योगायोगाने माझे वैचारिक नि भावनिक देशीसंबंध अध्ययन, संशोधन क्षेत्र असल्याने आमचे पुन्हा सूर जुळले. माझा पहिला पीएच.डी. संशोधनाचा विषय ‘मराठी बखरींतील फार्सीचे स्वरूप’ असा होता. शिवाय महाविद्यालयीन अध्ययन, अध्यापन करतानाही बखर वाङ्मयाविषयी मी खूप चिंतन-मनन केले होते. ‘भाऊसाहेबांची बखर’ आणि ‘सभासद बखरी’चे (श्रीशिवप्रभूंचे चरित्र) संपादनही मी केले होते. डॉ. रेसाईड यांना भाऊसाहेबांची बखर फार आवडली होती. तिच्याविषयी त्यांनी संशोधन/लेखन केले होते. लंडनमधील इंडिया ऑफिसच्या ग्रंथालयात/ हस्तलिखित संग्रहात काही मोडी लिपीतील बखरी असल्याची माहिती मला त्यांनी दिली होती. 1982मध्ये मला ब्रिटिश कौन्सिलची गौरववृत्ती (फेलोशिप) मिळाली. त्यामुळे लंडन विश्वविद्यालयाच्या ‘स्कू ल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’(एस.ओ.ए.एस.)मध्ये डॉ. रेसाईड यांच्या सहवासात संशोधन करण्याची संधी मिळाली. त्या वेळी लंडनमध्ये असलेले हे मराठी ऐतिहासिक दस्तऐवज पाहता/अभ्यासता आले. चार-दोन दिवसांच्या गाठीभेटीत माणसाचा जणू काही एखादा पुसटसा आलेख उमटतो; बिंदू-बिंदूनी रेखाटलेला. आपण अनेक दिवस त्या माणसाच्या सहवासात असलो की, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे नि स्वभाव वैशिष्ट्यांचे अधिक जवळून दर्शन घडते, त्यातल्या पुसट-अस्पष्ट रेषा अधिक रेखीव-आखीव होऊ लागतात. तसेच काहीसे माझ्या नि डॉ. रेसाईड यांच्या बाबतीत घडले होते.
आपण परदेशात गेलो की काहीसे होमसिक होत असतो. त्या काळात तर भ्रमणध्वनी इत्यादी सुखसोयीदेखील नव्हत्या. दूरध्वनी युरोपमध्ये व अन्यत्र फार स्वस्त होते, पण परदेशातून भारतात फोन करणे तितकसे परवडणारे नव्हते. हवाईपत्र हाच त्यावरचा रामबाण उपाय होता. एस.ओ.ए.एस.मध्ये माझ्या केबिनजवळच पत्रांचे रॅक्स असत. माझ्या नावाच्या कप्प्यात पत्र आलेली असत. चार दोन दिवसांत मी काहीसा अंतर्मुख झाल्याचे पाहिले की, डॉ. रेसाईड भावाच्या मायेने पाठीवर हात ठेवून विचारत- काही घरचे पत्रबित्र आले की नाही? कशी आहेत मुले? तुम्ही पत्र पाठवले की नाही? तर कधी म्हणायचे, ‘मादाम तुसाँ (पुतळ्याचे वस्तुसंग्रहालय) तुम्ही पाहिले की नाही? जाण्यापूर्वी जरूर पाहा. थोडे मन लागेल.’ तर कधी म्हणायचे, ‘शेक्सपियरचे स्टॅटफर्ड अपॉन अ‍ॅव्हॉन एकदा पाहून पोट भरत नाही. तुम्ही दुस-यांदा गेलात, हे छानच झाले...’ कधी म्हणायचे, ‘कंटाळा आला की सहज पिकॅडेली सर्कसवरून एखादी चक्कर मारून येत चला...’ त्यानंतर मध्ये बरीच वर्षे गेली. एकदा असेच पुण्याला पत्रकार नगरमधील माझे जीवश्चकंठश्च मित्र कथाकार शंकर पाटील यांच्या सिंधू इमारतीतील फ्लॅटमध्ये गप्पागोष्टी करत असताना डॉ. रेसाईड यांचा विषय निघाला. ते फार घाईगर्दीत भारतात येऊन गेल्याचे त्या वेळी कळले होते. त्यांनी मला फोन करण्याचा प्रयत्न केल्याचेही समजले. मग त्या प्रसंगी पाटील म्हणाले, रेसाईड यांनी मराठी कथांच्या संग्रहाचे संपादन करायला घेतले आहे आणि त्यासाठी त्यांच्या ग्रामीण कथेची रेसाईड यांनी निवड केली आहे. त्यातले गावकूस, काळी आई, आखर यांसारखे ग्रामीण शब्द ते अत्यंत बारकाईने समजून घेत असल्याचे शंकर पाटील म्हणाले होते. महानुभाव साहित्य, बखर वाङ्मय ते मराठी नवकथा आणि ग्रामीण कथा अशा विविध प्रांतांतली रेसाईड यांची अभ्यासक वृत्ती पाहून मनोमन मी अवाक झालो होतो. रेसाईड हे जणू लंडनचे महानुभावच होते...