आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलीभाषा संस्कृतीचा आरसा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा कोसांवर भाषा बदलते, असे आपण म्हणतो. पण केवळ भाषाच बदलते असे नाही; तेथील दगड, डोंगर, माळ, जमीन, पाणी, पिके, अन्न व धान्याच्या चवी या सगळ्यात काही वेगळेपण दिसत असते. त्याचा परिणाम भाषेवर नकळत होत असतो.

भाषेतील हे वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत भाषेच्या अनेक अभ्यासकांनी यापूर्वी केला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अशा किती भाषा आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्याचा समकालीन शोध घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया(पीएलएसआय)तर्फे भाषा सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पातून हाती आलेल्या निष्कर्षांवर आधारित खंड (‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’- मुख्य संपादक
डॉ. गणेश देवी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे) एप्रिल-2013मध्ये प्रकाशित होत आहे.

भाषावैज्ञानिकांना अभिप्रेत असलेली सर्वरूढ पद्धत थोडी बाजूला ठेवून एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय भाषांची स्थिती काय आहे, याचा स्पष्ट नकाशा आखण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अनैतिहासिक पद्धत ‘पीएलएसआय’ने स्वीकारली आहे. ही गोष्ट सर्वेक्षणाच्या सर्व खंडाला असलेल्या प्रस्तावनेत ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. गणेश देवी यांनी स्पष्ट नमूद केली आहे.

डॉ. देवी यांच्या प्रस्तावनेत सर्वेक्षणाविषयीच्या अनेक गोष्टींची चर्चा आहे. त्यातून सर्वेक्षणाविषयी डॉ. देवी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या कामाची दिशा अभ्यासकांना समजू शकेल.

महाराष्ट्राच्या भाषिक सर्वेक्षणाविषयी सांगायचे झाल्यास अस्तित्वात असलेल्या भाषा, उपभाषा, बोली यांचा शोध घेणे वरकरणी सोपे वाटत असले तरी क्षेत्रीय काम हे एक आव्हानच होते. सापुतारा आणि पुणे येथे झालेल्या दोन चर्चासत्रांनंतर महाराष्ट्रातील सर्वेक्षणाचा एक आराखडा तयार झाला. पुणे येथील एका कार्यशाळेतून मला कामाचे स्वरूप, दिशा आणि अडचणी यांची काहीशी कल्पना आली; परंतु हे चर्चासत्र अधिक महत्त्वाचे ठरले. त्यातून पुढे महाराष्ट्राच्या भाषांच्या अभ्यासास प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील भाषांव्यतिरिक्त या खंडात महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांशिवाय उर्दू आणि सिंधीचाही समावेश करण्याचे ठरले. कारण या भाषांना स्वतंत्र राज्य नाही. मराठी आणि मराठीची रूपे- (येथे बोलीऐवजी रूपे हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे.)

आदिवासींच्या भाषा, भटक्या-विमुक्तांच्या भाषा आणि सर्वेक्षणात याशिवाय प्राप्त झालेल्या काही इतर भाषा. उदा. दख्खनी (मिरजजवळ बोलली जाणारी भाषा), नॉ लिंग (कोकणातील एका गावात बोलली जाणारी भाषा) अशा भाषांचा शोध घेतला आहे. त्यातून एकूण बावन्न भाषांचा हा भाषिक (आणि सामाजिक व सांस्कृतिकही) दस्तऐवज तयार झाला आहे.

लोकसमूहात जाऊन एखादी माहिती उपलब्ध करून घेणे; विशेषत: ग्रामीण, अशिक्षित लोकांकडून काही माहिती प्राप्त करून घेणे, हे आव्हानात्मक काम असते. अशा वेळी लोकांच्या मनात आपल्याविषयी विश्वास प्राप्त करून घेणे महत्त्वाचे असते. लोकांना प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगणे, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे त्यांचे व त्यांच्या भाषेचे, जीवनपद्धतीचे महत्त्व जगाला कसे समजणार आहे, या राष्ट्रीय प्रकल्पात आपला हा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देणे; हे एक कौशल्याचे व जिकिरीचे काम असते.

हे कौशल्य केवळ लोकांसाठी किंवा लोकसमूहांसाठीचे नव्हे, तर अनेक वेळा यातील सहभागी लेखकांसाठीही पणाला लावावे लागते. प्राप्त माहिती उचित वेळेत पाठवणे, माहितीतील दुरुस्ती किंवा त्रुटी कळवल्यास ती माहिती पुन्हा अद्ययावत करून पाठवणे, यात अनेक वेळा त्यांची उदासीनता दिसून आली. अनेक वेळा त्यांच्या इतर कामांमुळे ते शक्य झाले नाही किंवा ती माहिती संकलित करण्यात त्यांचे क्षेत्रीय कार्य कमी पडले असावे. आता अशा गोष्टींना अडचणी म्हणता येणार नाहीत. शोधप्रक्रियेचे हे सर्व घटकच असतात. प्रारंभी महाराष्ट्रात थोड्याच भाषा असाव्यात असे वाटले; परंतु ही शोधप्रक्रिया जशी विस्तारत गेली तसतशी ही संख्या वाढत गेली. भटक्या-विमुक्तांच्या भाषांविषयी लेखन करणारे बहुतेक त्या समाजातील कार्यकर्तेच आहेत.

त्यांचा जनसंपर्क असतो; पण लिहिण्याची सवय आणि शिस्त त्यांना अवगत नसते. अशा वेळी त्यांच्याबरोबर राहून काम करावे लागते. दोन वर्षे ही सर्वेक्षण प्रक्रिया लांबली, ती अशा अडथळ्यांमुळे; पण त्यातून मनाची विविध रूपे पुन्हा अभ्यासता आली. महाराष्ट्राच्या या खंडात मराठीची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे हे भाषांचे सर्वेक्षण आहे; भाषेचा किंवा भाषाविज्ञानाचा अभ्यास नाही. त्यामुळे ही सर्वेक्षण प्रक्रिया फार तर भाषेचा इतिहास आणि वैशिष्ट्य सांगणारी आहे; वाङ्मयाचा इतिहास अथवा अभ्यास सांगणारी नाही. क्षेत्रीय काम करताना अथवा भाषांची माहिती मिळवताना आलेली मुख्य अडचण म्हणजे, नव्या पिढीला आपल्या समाजाची भाषा फारशी माहीत नसते. किंवा आपण आपल्या भाषेतून बोललो, भाषेविषयी बोललो तर आपली जात इतरांना समजेल, असे त्यांना वाटते. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी बहुतांश भटक्या-विमुक्तांच्या नव्या पिढीने मराठी भाषा घरात आणि घराबाहेर स्वीकारली आहे. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत ही गोष्ट अभिनंदनीय आहे; मात्र त्या समाजात त्या त्यांच्या भाषा बोलणार्‍यांची संख्या विरळ का होईना, पण आहे.

समाजातील सर्व भाषांवर प्रमाण मराठीचे मोठे आक्रमण झाले आहे. हे या सर्वेक्षण प्रक्रियेत स्पष्ट झाले. ग्रिअर्सन यांनी ब्रिटिश काळात केलेल्या भाषा सर्वेक्षणाला आता शंभर वर्षे झाली आहेत. ग्रिअर्सन यांनी घेतलेले परिश्रम, त्यांची दृष्टी, त्यांच्या कार्याचे मोल हे सर्व वंदनीय आहे; परंतु ब्रिटिशकालीन झालेल्या या सर्वेक्षणाचा हेतू भारतीय भाषांच्या दृष्टीने किती शुद्ध होता, हे तपासायला हवे. आजचे हे सर्वेक्षण लोकांनी, लोकांच्या प्रेरणेतून केलेले आहे म्हणून त्यास ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ किंवा मराठीत ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ असे म्हटले आहे. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषाविषयक विविधतेचा, अस्तित्वाचा आणि किंचित अस्मितेचाही हा आविष्कार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, हा अभ्यास समाजशास्त्री व मानववंशशास्त्री यांच्या अभ्यासकांना अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. भाषांची आजची स्थिती व त्यांचे अस्तित्व दर्शवणारे हे सर्वेक्षण दीर्घकाळानंतर झालेले आहे. समकालीन भाषांची नोंद या निमित्ताने अधोरेखित होत आहे. कमी होत जाणार्‍या किंवा मरणप्राय भाषांना यातून फार बळ मिळेल असे म्हणता येणार नाही; परंतु त्यांचे दस्तऐवजीकरण या निमित्ताने झाले आहे.

सर्वेक्षणात महाराष्ट्रातील भाषांची माहिती संकलित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे; परंतु काही भाषा बोलणारी कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. जी एक-दोन राहिली, तीही मराठीच बोलतात. उदा. सिद्दी. तर काही भाषांमध्ये मराठी शब्द सहज रूढ आहेत. विशेषत: महिन्यांची, वारांची नावे, अंतरे-कि.मी., वजने इत्यादी. आपल्या दैनंदिन जीवनात मराठी किंवा इंग्रजी कॅलेंडर वापरण्याच्या सवयीतून हे झाले आहे. या गोष्टींना पूर्वी त्या त्या भाषेत प्रतिशब्द होते. काही भाषांमध्ये ठरलेल्या निकषानुसार संपूर्ण माहिती मिळवणेही आव्हानात्मक ठरले. त्यामुळे सर्व भाषांची माहिती एकसारखी न येता कमी-जास्त प्रमाणात आली आहे. आमच्यासाठी अज्ञात ठरलेल्या काही भाषा कोणी लक्षात आणून दिल्या, तर पुढील आवृत्तीत त्यांचा समावेश करता येईल.

नगरी, कोल्हापुरी, सातारी, वैदर्भी अशा बोलींचा स्वतंत्र बोली म्हणून येथे समावेश हेतूपूर्वक केलेला नाही. या भाषा भौगोलिक क्षेत्र स्पष्ट करणार्‍या आहेत व त्यामध्ये फरक फक्त ‘हेल’चा आहे. मराठीपेक्षा त्याचे स्वरूप फार वेगळे नाही. यावर काही मतभेद होऊ शकतात. पण प्रकल्पाची रचना करताना सहभागी लेखक-संपादक व भाषातज्ज्ञांशी व मुख्य म्हणजे डॉ. देवींशी याबाबत चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. खरं तर याला मर्यादा म्हणता येणार नाही; पण यासंबंधी थोडे स्पष्टीकरण द्यावे या हेतूने हे नमूद केले आहे. भाषांची वर्गवारी अकारविल्हेनुसार अथवा भौगोलिकदृष्ट्या न करता मराठीची रूपे, आदिवासींच्या भाषा, भटक्या-विमुक्तांच्या भाषा आणि इतर भाषा अशा पद्धतीने केली आहे. त्यामुळे वाचकांची अथवा अभ्यासकांची सोय झाली आहे. भाषिक सर्वेक्षणाचा उपक्रम या खंडाद्वारे साकार होत आहे. महाराष्ट्रात पंथ, जाती, धर्म, संप्रदाय यांची विविधता आहे, यामुळे मराठी भाषेची प्रादेशिक रूपे साहजिकच अनेक आहेत. अभिजन, बहुजन, भटके, विमुक्त, आदिवासी, दलित अशा विविध समाजांच्या विविध भाषिक रूपांनी महाराष्ट्र ध्वनित होत असतो. त्याचेच प्रतिबिंब केलेल्या पहिल्या भाषा सर्वेक्षणात प्रकर्षाने उमटले आहे.

बोली आणि भाषा
मराठी आणि मराठीची रूपे : 1) मराठी, 2) अहिराणी, 3) आगर, 4) खान्देशी लेवा, 5) चंदगडी, 6) झाडी, 7) पोवारी, 8) कोहळी, 9) तावडी, 10) मालवणी, 11) व-हाडी, 12) वाडवळी, 13) सामवेदी, 14) संगमेश्वरी
आदिवासींच्या भाषा : 15) कातकरी, 16) कोकणा, 17) कोरकू, 18) कोलामी, 19) गोंडी, 20) देहवाली, 21) परधानी, 22) पावरी, 23) भिलालांची निमाडी, 24) मथवाडी, 25) मल्हार कोळी, 26) माडिया,
27) मावची, 28) मांगेली, 29) वारली, 30) हलबी, 31) ठाकरी, 32) ‘क’ ठाकूरी, 33) ढोरकोळी, 34) ‘म’ ठाकूरी
भटक्या-विमुक्तांच्या भाषा : भटक्या विमुक्तांच्या सांकेतिक भाषा, 35) कुचकोरवी, 36) कैकाडी, 37) कोल्हाटी, 38) गोरमाटी, 39) गोल्ला, 40) गोसावी, 41) घिसाडी, 42) चितोडिया, 43) छप्परबंद, 44) डोंबारी, 45) नाथपंथी डवरी, 46) नंदीवाले, 47) पारोशी मांग, 48) पारधी, 49) बेलदार, 50) मांग गारुडी, 51) वडारी, 52) वैदू. अन्य भाषा : 53) पारोशी मांग, 54) दख्खनी, 55) ‘नॉ’ लिंग, 56) ‘म’ ठाकूरी, 57) उर्दू 58) सिंधी : भाषा आणि साहित्य