आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधानी ‘वेलू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिवाई दे ग माय ऽऽऽ’ कानावर आवाज येताच हातचं काम सोडलं नं लगबगीनं ताटात चिवडा, चकल्या, शंकरपाळी, लाडू, अनारसे काढले, एक पोलक्याचं पीस ठेवलं, पोराचे अर्धवट वापरलेले चांगले कपडे घेतले. दारात येऊन म्हटले, ‘वहिनी, दिवाळी घेऊन जा.’ ‘आले की बाई, तुमच्याकडंच येत व्हती बघा,’ म्हणत तिनं डोक्यावरचं टोपलं उतरवलं. माझ्या हातातलं ताट घेतलं. कपड्यांची पिशवी घेतली. मोठ्या प्रसन्न चेह-याने म्हणली, ‘बाई, देव तुमचं भलं करो, लय मोठ्ठं मन हाये तुमचं, दर टाईमाला भरभरून दिवाई आन दर महिन्याला मनमोकयी अमावस बी देत्यानं, देव तुमच्या पोराला आयुष्य देवो.’
तिचे बोल ऐकताच माझंही मन समाधान पावलं. म्हटलं, ‘वहिनी, आपल्या कमाईत सगळ्यांचा वाटा असतो. दिल्यानं कमी नाही पडत, वाढत असतं. बसा, चहा ठेवलाय.’ ती पटकन पायरीवर बसली. चहा घेतला. तिचं टोपलं डाळ-धान्याने आणि दिवाळीच्या फराळाने उतू जात होतं तिच्या मनासारखं. ‘चढवून द्या बाई, लय जड झालंय,’ असे तिने म्हटल्यावर मी टोपल्याला हात लावला.
सडा-रांगोळीची वेळ झाली. बादलीतलं पाणी मारून अंगणासहित मनानेही गार होत समाधान मानून घेतलं. रांगोळी घालायला बसले. रांगोळीच्या थेंबासोबत मनाच्या अंगणातही विचारांची रांगोळी घातली जात होती. कारण त्यात रंग भरायला न बोलावता वेलू येऊन बसली होती. तिच्यासोबत तिचेच विचार डोक्यात थेंबांना जोडणा-या रेघा बनू लागले.
वेलू शेजारच्या बंगल्यात राहायला आली होती. तिला पाहून ती तिच्या घराशी किती एकरूप झाली हे दिसत होतं. प्रत्येक गोष्टीचा सुखद स्पर्श ती अनुभवत होती. कारण ते तिने तिच्या कष्टाने, जिवाचं रान करून उभारलेलं, तिचं विश्व होतं. जिन्याच्या कठड्याचा स्पर्श, भिंतींच्या आत तिने केलेला श्वासोच्छ्वास, संध्याकाळी बोटांनी बटणे दाबून प्रकाशमान होणा-या खोल्या, हाताने नळ उघडताच येणारं पाणी, जमिनीतील दगड, भिंतीतील वीट न् वीट सारं सारं काही आनंद देणारं. तिला भावलं होते, हृदयात ठसलं होतं.
तिचं वागणं, वावरणं, हालचाल, दारापुढच्या रोपट्यांची जोपासना, दाखवत असतात - ‘हे घर माझं आहे, फक्त माझं आणि माझंच! तिथं कुणीच माझी हेटाळणी करणारं, अवमान करणारं, परकेपणाची अन् पोरकेपणाची आठवण करून देणारं नसेल. आणि तिचं घरही म्हणत असावं, तू इथे सुरक्षित आहेस. तू माझी आहेस. सर्वस्वी माझी. म्हणूनच तर ती इतकी प्रसन्न आणि शांत असते बहुधा.
‘अक्का, खूपच सुंदर झाली हं रांगोळी, थांबा मी फोटो घेते,’ म्हणताच, मी तिच्याबद्दलच्या विचारांच्या रांगोळीतून बाहेर येऊन वर पाहताच वेलूने केलेली
रंगांची रंगसंगती बघून प्रसन्नतेने चेह-याच्या रेषा हलल्या. तिच्या चेह-यावरही तेवढेच रंग येऊन प्रफुल्लित चेहरा झाला होता.
‘ये गं वेलू, घरात ये ना, दिवाळीचा फराळ घे.’ ‘नको अक्का, नंतर केव्हा तरी येईन, मीही लावते ना पणत्या दाराशी. अंधारत आलंय,’ म्हणत झराझरा घराकडे निघाली. आणि आधीच तयार करून ठेवलेल्या पणत्या ओसरीवर, प्रत्येक पायरीवर ठेवत होती. जणू मनातला प्रत्येक अंधारलेला कोपरा पणतीने उजळत होती. तुळशीजवळ सांजवात तिने लावली अन् हात जोडून, डोळे मिटून तुळशीला नमस्कार करीत होती.
काय मागत असावी? ‘मागणं’ तर तिचा स्वभाव नाही. जीवनात दु:ख आणि यातनांची वादळे मात्र न मागता मिळाली होती तिला. हसत हसत झेलताना मी तिला पाहिलं होतं. चार घरांआड ऐकू जाईल अशा धबधब्यासारखं खळाळून, सातमजली हास्य देवानं दिलं होतं तिला. मनीचा सल लपवण्यासाठी की सोसण्यासाठी होतं कुणास ठाऊक?
तिच्या ओसरीवरच्या तिने लावलेल्या दिव्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. हाच प्रकाश तिच्या आयुष्यात कधी येईल का? अंगणात तिने तिच्या बारीक निमुळत्या, कलात्मक बोटांनी रेखाटलेली वेलबुट्ट्यांची मनोवेधक रांगोळी, त्यात भरलेले रंग, कधी तिच्या जीवनात रंग भरतील का? सारं सारं विसरून वर्तमानात रमणारी, लहान सहान गोष्टीत आनंद शोधणारी वेलू भाग्यवान की तिचे काट्यावरून चालत, तिचे जीवन आठवत स्वत:चे सुखी आयुष्यात दु:खी होणारी मी?
‘अक्का, उद्या आपल्याला खालच्या वस्तीत फराळ वाटायला जायचे बरं का.’ वेलूच्याच बोलण्याने मी विचारातून बाहेर निघाले. ‘बघू,’ तोंडातून येताच दुस-याच क्षणाला लाज वाटली स्वत:ची. पक्क्या वेलूच्या पक्क्या निर्णयासारखा पक्का होकार दिला. ‘येईन गं वेलू, जाताना बोलाव मला.’ त्या होकाराबरोबर मनात सुखसंवेदना जाणवल्या.