आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींची जात कशाला सांगता?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका बाजूला उना दलित अत्याचार घटनेची प्रतिक्रिया म्हणून गुजरातमधले दलित सामूहिक स्तरावर बौद्ध धर्माचा स्वीकार करताहेत, आणि दुसऱ्या बाजूला दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती या नात्याने पदभार सांभाळणार आहेत. दोन्ही घटनांतला विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. म्हणूनच कोविंदांवर दलित आणि अल्पसंख्याकांमध्ये विश्वासाचे आणि निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. या पार्श्वभूमीवर दलित समूहांचे बौद्ध धर्माचा स्वीकार करणे आणि कोविंद यांचे राष्ट्रपतीपदी विराजमान होणे, या दोन घटनांच्या अनुषंगाने ज्येष्ठ लेखक-सामाजिक कार्यकर्ते ‘उपरा’कार* लक्ष्मण माने आणि गुजरातमधील धर्मांतर चळवळीचे बिनीचे शिलेदार डॉ. पी. जी. ज्योतिकर यांचे हे दृष्टिकोन...
 
 
एकीकडे ज्या हिंदुत्ववादी संघटनांकडून दलितांवर हल्ले होत आहेत, त्याच संघटनांची शीर्ष संस्था राष्ट्रपतीपदासाठी मात्र दलित उमेदवार देते. असा उमेदवार दलित जरूर असतो, पण तो आंबेडकरवादी कधीच नसतो. मात्र तो दलित असल्याची चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणली जाते. काेविंद यांची जात सांगता; यापूर्वी कधी कोणी राष्ट्रपती झाले नव्हते? त्यांच्या जातीची का चर्चा नाही झाली? उपराष्ट्रपती पदाचे भाजप उमेदवार व्यंकय्या नायडू यांची पण जात सांगा की. काय आहे, भारताची राज्यघटना बुडवायची आहे, तर दलिताच्या हातून बुडवलेली बरी...

रामनाथ कोविंद जन्माने दलित असतील; पण कर्माने वैदिक आहेत. काँग्रेसच्या मीराकुमार काही वेगळ्या नाहीत. त्या दलित आहेत, पण त्या काँग्रेसच्या दलित आहेत. त्यांनी कधी दलित उद्धारासाठी काही केल्याचे आठवत नाही. कोविंद यांच्याकडे आम्ही पूर्वास्पृश्य म्हणून पाहात नाही, अस्पृश्य म्हणूनच पाहतो. कोविंद यांनी खुशाल त्यांचे धर्मकर्तव्य पार पाडावे. आम्ही हिंदू धर्म त्यागला आहे. स्पृश्यअस्पृश्यतेच्या जंजाळातून आम्ही बाहेर पडलोय. आमच्या धम्मात जातबीत नाही. आम्ही आता माणूस आहोत. लोकांना समता पाहिजे, जातीचा काच नकोय. तरी बाबासाहेबांचे अनुयायी गप्पच आहेत. ते सामािजक समरसतेच्या गोष्टी करताहेत. मायावती जर ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णु महेश है’ असे म्हणत असतील, तर बसप आिण आरएसएसमध्ये फरक काय राहिला, हाही एक प्रश्नच आहे. 

बाकीचे सोडा, बाबासाहेबांचा दुरुपयोग करण्याचा मार्ग भाजपला कोणी दाखवला हो? आंबेडकरी नेत्यांनी दाखवला. मायावती, रामविलास पासवान या कामी अग्रभागी राहिले. बाबासाहेबांचा फोटो लावायचा अन् मते मागायची, असे आता भाजपही करू लागलीय. त्यामुळे उत्तर प्रदेशात जाटव आिण चमार सोडता इतर सर्व अनुसूचित जाती या आपसूकपणे भाजपच्या गळाला लागल्या आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. त्या घटनेस २००६मध्ये ५० वर्षे होणार होती. अर्धशतकाचे औचित्य साधायचे होते. पण मला अपघात झाला. त्यामुळे २००७मध्ये आम्ही धम्म दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत पाच लाख अनुयायी हाेते. ते सर्व एका जातीचे होते. मी दीक्षा घेतली, तेव्हा माझ्यासोबत वेगवेगळ्या ४२ पोटजातीचे पाच लाख भटके विमुक्त होते. त्यानंतर हनुमंत उपरे यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ ही चळवळ केली. योगायोग नाही, पण आम्हा दोघांवर भयंकर संकटे ओढवली. उपरे जिवानिशी गेले. मला बेअब्रू केले गेले. या दोन्ही प्रसंगांचा अनेकांनी धसका घेतला. अन् राज्यातली बौद्ध धर्म प्रसाराची चळवळ थंडावली. नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर ही चळवळ उत्तर भारतात गतिमान झाल्याचे दिसतेय. याचे कारण लोकांना नरकातून बाहेर पडायचेय. माणूस जाणिवेच्या पातळीवर जोपर्यंत गुलाम असतो, तोपर्यंत आपणच आपल्या हाताने डोक्यात दगड मारून घेतोय, हे त्याला कळत नसते. तळागाळातल्या जातीत शिक्षणप्रसार झालाय. आम्ही पण वाघिणीचे दूध प्यायलोय. त्यामुळे दलित, आदिवासी, भटके आता जागे होताहेत. या घटकेची धक्कादायक बाब ही की, ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्या राज्यात दलितांवर हल्ले वाढले आहेत. त्याची प्रतिक्रिया येणारच.

हिंदू असलेल्या तळातल्या जातींचा बौद्ध धर्माकडे ओढा वाढणे नैसर्गिक आहे. सध्या धर्मांतरे होताहेत, पण ती सुटी सुटी. तळातल्या जातीचे नेते पुढे आले, तर धर्मांतराचे प्रमाण यापेक्षा वाढेल. सध्या हिंदू धर्माचा त्याग केल्याच्या बातम्या येत आहेत. पण, त्यातील सहभागींची संख्या अल्प अाहे. याचे कारण, संस्थात्मक पातळीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची चळवळ पूर्वीच्या तुलनेत थंडावली आहे. धम्म चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना, संस्थांना आपलाही लक्ष्मण माने होईल, असे वाटते आहे. ती भीती निराधार नाही. परिणामी, इच्छा असूनही पुढे होण्यास कुणी धजावत नाही. 

परिस्थिती विपरीत असली तरीही, मी पुन्हा धम्म चळवळीचे काम हाती घेतो आहे. मी आंध्र, कर्नाटक, गोवा या राज्यांच्या सीमाभागांत जाणार आहे. तिथल्या भटक्या-विमुक्तांना बौद्ध धर्माचे महत्त्व पटवून देणार आहे. नरकातून बाहेर पडायला लोक अधीर आहेत. त्यासाठी धुरीणांनी पुढाकार मात्र घ्यायला हवा आहे. कारण, राजकीय सत्तेपेक्षा धम्म स्वीकार दलितोद्धाराचा खरा मार्ग ठरू शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.

- लक्ष्मण माने  
banddarwaja2015@gmail.com
(लेखक भटक्या विमुक्त चळवळीत ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांची उपरा, विमुक्तायन आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत.) 
बातम्या आणखी आहेत...