आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळे उघडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अपेक्षांचे ओझे’ हा 29 मार्चच्या ‘मधुरिमा’मधील सचिन रावते यांचा लेख वाचून माझे डोळे चांगलेच उघडले. दहावीत असलेल्या माझ्या मोठ्या मुलीवर आम्ही कुटुंबीय असाच दबाव आणतोय हे माझ्या लक्षात आले. तू काहीच करू शकणार नाहीस, बारावी झालीस की तुझे लग्नच लावून देतो बघ, असे आम्ही तिला सतत सांगत आलो. तिच्या दोन धाकट्या भावंडांच्या कामगिरीच्या व आमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती वाढत होती, याची मला जाणीव झाली. त्यामुळेच ती वार्षिक परीक्षा जवळ आली की आजारी पडते, डोकेदुखीसाठी तीन डॉक्टर बदलले तरी उपाय नाही. लेख वाचून मी पक्का निर्धार केला की तीही धाकट्या भावंडांएवढीच हुशार आहे आणि तिला तसेच वागवायचे. पालकांनी विचार केला पाहिजे की आपण शाळेत होतो तेव्हा कसे होतो, एवढे मार्क मिळवत होतो का?
याच अंकातील ‘आव्हान ड्रायव्हिंगचे’ हा डॉ. वृषाली देशमुख यांचा लेख वाचून माझ्या ड्रायव्हिंगची गोष्ट सांगावीशी वाटते. घरची गाडी महागडी असते मग अनेक नवरे शक्यतो बायकोने गाडी चालवूच नये, असा प्रयत्न करतात. मलाही अशीच भीती वाटायची; परंतु माझ्या पतीने माझ्यासाठी चालवायला सोपी अशी वॅगनआर घेऊन दिली. मग मी मनातली भीती टाकून दिली आणि डेअरिंगने गाडी चालवायला सुरुवात केली. आज मी बिनधास्त 100च्या वेगाने गाडी चालवते. गाडी चालवताना अनेक अनुभव येतात. अनेक पुरुष ड्रायव्हर आमच्याकडे पाहून टोमणे मारतात तेव्हा गाडीतून उतरून त्यांच्या खानदिशी कानाखाली वाजवावी असे वाटते. मनातली भीती टाकून दिल्याने शेजारी नवरा आणि मागे मुले बसलेली असताना गाडी चालवत बाहेर फिरायला जायचा आनंद मी लुटू शकते. मुले सुरुवातीला चिडवायची की, तुला जमणार नाही; पण मी हट्टाने गाडी चालवायला शिकले आणि मी काय करू शकते हे त्यांना दाखवून दिले.