आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकाल का जरा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलं चिल्लर बोलणारी नसतात, असे आजच्या स्त्रियांना, आयांना सांगावेसे वाटते. आपली मुले लहान आहेत, असे ज्या वयात पूर्वीच्या परिमाणांनुसार वाटे, त्या वयात आता ती लहान राहिलेली नाहीत. शिवाय त्यांचे बोलणे म्हणजे वायफळ बडबड नसतेच मुळी. त्यामागे त्यांची जाणून घेण्याची मानसिकता असते. मुळात बोलणे हीसुद्धा एक ‘मानस प्रक्रिया’ आहे हे जाणून घ्यायला हवे वडीलधार्‍यांनी. लहान मुले तर आईशी भाविनकदृष्ट्या अधिक जुळलेली. त्यामुळे आईच्या अवतीभोवती अधिक. अगदी मांडीवर डोकं घुसळणे, कमरेला मिठी मारणे, पाय पकडून हट्ट करणे हे सगळे तसे आईशी. तेव्हा हा भावनिक बंध पकडून आयांनी मुलांचे मन जाणून घ्यावे.

आजची मुले टेक्नोसॅव्ही आहेत. आयांपेक्षा या क्षेत्रातील अधिक ‘जाणकार’ म्हणा ना! तसेच मुले ‘जजमेंटल’ बनून ते जजमेंट शब्दांमधून स्पष्ट मांडणारी बनत आहेत, म्हणजेच त्यांना प्रत्येक गोष्टीत मत असते आणि ते बोलून दाखवायचे असते. त्यांच्या पौगंडावस्थेला सुरुवात आता लवकर होत आहे. पण ती ‘अॅडल्ट’ नसूनही ‘ओरिजनल’ थिकिंगची असल्याने जे दिसते, वाटते, पटते, नाही पटते ते सगळे बोलून दाखवण्याशी प्रामाणिक राहतात. भलेही मोठ्यांच्या दृष्टीने चुकीचे वाटेलही. मात्र, त्यामागचा त्यांचा हेतू स्वच्छ, स्पष्ट आणि म्हणणे अगदी नैसर्गिक स्रोताचे असते.

हल्लीचा अभ्यासक्रम आणि अध्यापन ज्ञानरचनावादी होत आहे म्हणजे शिकणे ही मानसप्रक्रिया असून मज्जारज्जूंशी निगडित आहे. ‘समज’ घेऊन समजावून घेणं अशी रचनावादी भूमिका आणि गटपद्धतीद्वारे कृतिशीलतेवर भर देणे आणि स्वयंअध्ययनाची सवय यामुळे मुले स्वविचारातून व्यक्त होत आहेत. सोप्या शब्दांत मुलांचे बोलणे हे विचाराधारित असते. अनुभव कथनाचा उद्देश तर असतोच; पण आईचे त्यावरचे मत त्याची आपल्या मतांशी ताळा, चूक की बरोबरचा शोध, संभ्रम संपवण्याचा इरादा असतो. यासाठी समस्त आयांनो, मुलांना समजून घेणे गरजेचे आणि त्यासाठी त्यांचे लक्षपूर्वक ऐकणे फार महत्त्वाचे. पण नेमके तेच घडेनासे झालेय हे कुटुंबांमधूनचे चित्र. हे दिसतेय इतरांना पण आया जाणून घेण्यासाठी कुठे सजग असतात? मुळातच मुलांवर, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि मग क्रियाशील श्रवणाकडे वळा.

‘आमच्या वर्गातील नीलिमा भलतीच नॉइजी. ममता म्हणजे ढोली कुठली, सततची बडबड आणि दादागिरी! टीचरनी दिली तंबी, केली पनिशमेंट. सो सॅड ना,’ अनिशला आईचे मत हवे होते. पण बसला आईचा ओरडा. कामात होती म्हणावे तर काम करताना कानाने ऐकून, तोंडाने बोलायला काय हरकत आहे? त्याच्यातल्या मेंदूला व लॉजिकला पडलेला प्रश्न.

‘ग्राउंडवर आज धमाल. खूप खेळलो आई. मॅच जिंकली आम्ही. मला तर टीचरनी शाबासकी दिली. मुलांनी खांद्यावर उचलून ‘जय हो’चा घोषा केला. खूप छान ना...’ मनीषचा चेहरा आनंदाने फुललेला. तो तर आईच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत; पण आईचा ओरडा, ‘अरे, किती मळलास बघ नि सरळ किचनमध्ये. सेन्स हवा ना रे. जा बाथरूममध्ये, अंघोळ कर स्वच्छ.’ मनीष हिरमुसला. निदान ‘बोलू या रे नंतर, स्वच्छ होऊ ये बघू,’ असे बोलणे अपेक्षित होते. पण मनीषच्या भावना, आनंदावेग दुर्लक्षलेला.

हल्लीची मुले जाहिरातीच्या क्रेझमध्ये. वेदान्तचा प्रश्न आईला ‘स्टेफ्री म्हणजे काय आई? कसलं पुडकं? खाऊचं नाहीच ना! त्यावर शाई ओतली की शोषली जाते कशी?’ अर्थात या प्रश्नाने आई स्तंभित आणि अचंबित. म्हणजे असे काही विचारेल हे अपेक्षित नव्हते. तेव्हा ती एकदम चूपचाप. वेदान्त बोलत राहिला; पण ते आईच्या कानात मनात शिरत नव्हते. वेदान्त चिडचिडला व तणतणत िनघून गेला. मात्र प्रश्न मेंदूत, शंका मनात घेऊनच.

मुलांचे प्रश्न जिज्ञासा, कुतूहल यावर आधारित आणि त्याचे निरसन व्हावे म्हणून आईकडे उत्तरांच्या अपेक्षेने भारलेले. चाइल्ड सायकॉलॉजीच्या अंगाने विचार करावा समस्त आयांनी, जमेल तशी पण सच्चेपणाची उत्तरे द्यावीत. व्यावहारिक अर्थाने चपखल व योग्य ठरतील अशी उत्तरे देण्यासाठी मुळातच एकाग्रता, फोकस आणि मुलांच्या प्रश्नांचे महत्त्व जाणून घेण्याची मानसिकता आईकडे हवी.

मुलांशी बोलायला वेळच नाही असे कारण अंशत: खरे. प्राधान्यानुसार क्रमवारी ठरवताना मुळात मुलांसाठी वेळे देणे ही ‘फर्स्ट प्राओरिटी’ हवी. तशी कशी द्यायची हे जिनेतिने ठरवण्यासाठी व्यूहरचना आखावी. अवघड असले तरी अशक्य नाही. स्वत:साठी वेळ, पर्सनल स्पेस, कम्फर्ट्स हे सगळे हवे व घ्यावे, पण त्याआधी विविधांगांनी मुलांचा विकास होण्यासाठी विवेकी पालकत्व सिद्ध करण्याचा निश्चय हवा. मूल हवे असा निर्णय होताक्षणीच संगोपनाचा श्रीगणेशा म्हणून त्या अपत्याचाच विचार व्हावा व वेळ द्यावा गर्भसंस्कारापासूनच.

एकाग्रतेने मुलांचे बोलणे ऐकून घेणे, प्रतिसाद देणे, शंकानिरसन आणि कुतूहल शमन करणे घडावे. मुलांशी संवाद हवा, मैत्री हवी असे मान्य केले जाते. पण त्या दिशेने कृती? संवाद आटत गेलेली घरे िजवंत नाहीत. त्यांचा टवटवीतपणा घटत चाललेला. फोन, लॅपटॉप, नेट, गॉसिप, गप्पा, पार्ट्या, टेस्ट, पार्लर वगैरेसाठी दिल्या जाणार्‍या वेळात काटछाट हवी. माता म्हणून क्वालिटी टाइम देणे हे कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे. जर तसे घडत नसेल तर मुले आईपासून, घरापासून तुटत जातील. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आहारी जाऊन वा घराबाहेर मित्र-मैत्रिणींमध्ये रमण्याकडे त्यांचा ओढा वाढेल. कदाचित आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा इतर मार्गाने प्रयत्न करतील का? तसे फारसे समाधान देणारे ठरणार नाही.

आपले बोलणे आईच्या कानात शिरत नाही, मनात घुसत नाही असा वारंवारचा अनुभव मुलांना आईपासून दुरावलेपण देईल. भावनिक परकेपण निर्माण होण्याचा धोका आहे. आज आणि हव्या त्या वयात मला आईचा सहवास व संवाद घडत नसेल तर! मुले वेगळेपणाने वागायला लागतील व लग्नानंतर तर वेगळेच राहायला लागतील. शिवाय आईच्या हाकेला ‘ओ’ देणे दूरचेच. ज्या वयात आईला मुलांची माया, आधार हवासा वाटेल व आवश्यक ठरेल, तेव्हा तो मिळण्याची शक्यता कमीच कारण मुलांना त्या वयात जे हवे ते देण्यात ती कमी पडलेली आहे. आता मुलांकडून झालेल्या अपेक्षाभंगाचा जाब कशी विचारणार?