आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्तमानामध्‍ये जगण्‍ां

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नको त्याची, नको तेवढी काळजी करण्याचा बहुसंख्य स्त्रियांचा स्वभाव असतो. तसंच ब-याचदा घर, घराबाहेरच्या मित्रमैत्रिणींमध्ये वावरताना, पूर्वायुष्यात झालेले अपमान, अवहेलना, त्रास याचंच पालुपद बोलण्यातून. ‘मी खूप सोसलं, पहाटेपासून झोपेपर्यंत राबणं, तेही बोलणी खात. नव-याची शाबासकी नाही, सासूचा तर गोड शब्द नसायचा. उलट चुका शोधत सतत टाकून बोलणं. सगळं कसं घेरून आलेलं. नेहमीचंच ते कंटाळवाणं घाण्याला बैल झुंपल्यासारखं आयुष्य. अतोनात ओढाताण, जीवाचं रान. डिप्रेशन यायचं. मग मात्र ठरवून कॉम्प्युटरच्या क्लासला गेले. बाहेरून परीक्षा देत क्वालिफिकेशन वाढवलं. खूप ससेहोलपट. घरची तर त्या काळात शत्रू झाली.' पण आता नोकरी करतेस ना. नवरा खुश, सासू मागंपुढं राहून ऊठबस करतेय. मुलांना अभिमान आहे आईचा. मग तरी भूतकाळातील छळवादाचा पाढा का? अशा स्त्रियांकडे पाहता, त्या आठवणीने त्यांच्या चेह-यावरील रंग उडतो, रया जाते जणू. विझल्यासारखे भकासपण येतो आणि मनाची मोडतोड होत असल्याची जाणवते.
म्हणून मनात येतं, की स्त्रियांनी भूतकाळ वारंवार आठवत राहू नये. कदाचित त्यामुळे ऐकणा-यांकडून सहानुभूती मिळेल. दया दाखवली जाईल. पण हेच मुळी नकोसं. कशासाठी गाडलेली मढी उकरत राहायचं? अशा भूतकाळात रमण्याचं जणू व्यसन असलेल्या स्त्रिया नकोशा वाटतात इतरांना, कारण ते सगळं भूतकाळात जमा झालेलं. म्हणून नवरा खडसावून म्हणतो, बस्स कर तुझ्या त्यागाचं तुणंतुणं. तर सासू नाक मुरकत उद्गारते, आम्ही तर तुझ्यापेक्षा सोसलंय. कशाला उगाच तुझं ते दळण. मुलं तर हसण्यावारी नेत म्हणतात, ‘आई, आता घराबाहेर गेलेलं बरं. कारण सगळं पाठ झालंय ते पुराण.’
म्हणूनच स्त्रियांनी भूतकाळातील प्रसंग, कटू अनुभवांना तिलांजली द्यावी. अशा स्त्रियांचं तेच ते गाणं ऐकून, ब-याचदा इतरांकडून त्या दुखावल्या जातात. पाणउतारा, लागट बोलणंही ऐकून घ्यावं लागतं. मग ती माणसं निर्दयी व निरुपयोगी वाटायला लागतात. हे सगळं टाळणं शक्य आहे. कसं? तर भूतकाळाचं स्मरण टाळण्यातून.
संसार म्हटलं, की व्याप, ताप, संताप, मनस्ताप ओघाने आलाच, त्यातून वाद व मतभेदाची वादळं उठतातच. विवाह, कुटुंब, कार्यालय, नाती, समाज यांपासून दूर जाता येत नाही. मग चढउतार होणार नात्यात. कडू, कडवट, आंबट, तुरट, अनुभव आलेले असणं अपरिहार्य. अगदी शारीरिक, मानसिक, शाब्दिक छळ सोसणं भाग पडलं असेल कदाचित; पण हे सगळं भूतकाळात घडलेलं गाडून टाकावं तिथे त्या वेळी व मोकळं व्हावं वर्तमान जगायला. ताज्यातवान्या मनानं उल्हसित चित्तानं, दैहिक उल्हासानं!
भूतकाळातल्या ‘नकारा’ऐवजी ‘होकार’ आठवा. झिडकारणं घट्ट पकडून न ठेवता समंजसपणे विस्मरणात टाकून द्यावं. ‘होकार’ स्मरणात, ‘यश’ आठवणीत, शाब्बासकीचा पाठ‌ घडावा म्हणजे वर्तमान अत्यंत उल्हसित व जगण्यातला आनंद देणारा ठरतो.
स्त्रियांना स्वत:ला काय हवं हे चांगलं माहीत असतं. पण त्याबद्दल स्पष्ट बोलण्याची हिंमत नसल्याने घुसमट होत राहाते. म्हणून आपण व्यक्त व्हायला हवं. बोलणं, चर्चा खूप चांगलं मोकळं वातावरण निर्माण करते. वर्तमानात मस्त जगायचं ठरवून आलेल्या संधी घेत राहून, पुढं सरकत जाऊन हवं ते झडप घालून मिळवण्यातून कृतकृत्य व्हायला होतं, हेच समाधान व त्यालाच सुख म्हणतात.
आज जग खूप पुढे जात आहे. गतिमान होत आहे. स्त्रिया शिक्षण, अर्थार्जन करत आहेत. मीडियाच्या सान्निध्यामुळे, कॉम्प्युटर, इंटरनेट, ई-लर्निंगच्या माध्यमातनं स्वत:ला अपडेट ठेवणं शक्य होत आहे. मनोरंजनाचा खजिना तर भरभरून. तेव्हा आपण या सगळ्या जादूच्या आस्वादात रमायला हवं. भूतकाळात पाटा वरवंट्यावर वाटण करण्यामुळे झालेला त्रास आठवण्याचा व संदर्भ देण्यापेक्षा मिक्सर वापराची मजा लुटा ना! आता कंदील, चिमणी कशाला आठवायची लख्ख अशा ट्यूबलाइटच्या उजेडात?
भूतकाळातील क्लेशकारक प्रसंग, घटना द्यायच्या गंगार्पण करून. कशाला पराजयाची, अपमानाची बोच? त्यावर पडदा टाकलेलाच बरा ना. स्वत:साठी आणि नात्यांसाठीसुद्धा. सल मनात ठेवला, की सलतोच काटा सलावा तसा. तेव्हा काटा काढून टाकला की सलणारं जातं संपून आणि ठुसठुसणंसुद्धा. उगाच पू होईपर्यंत राखणं नकोच ना! हे असं घडावं भूतकाळाबाबत. यासाठी ‘आजचं’ जगणं खुमासदार करावं. अरे, एवढं सुंदर आयुष्य पुढं उभं आहे, खुणावत आहे. तेव्हा वर्तमानकाळात जगण्यात आणि आनंद घेण्यात ठामपणा दाखवावा.
‘भूतकाळा टाका गाडुनि’ असे म्हणत वर्तमानात जगण्याचा अट्टाहास व ध्यास खरोखरच सुखद ठरतो हे चिरंतन सत्य आहे. गॅसवर स्वयंपाक करीत असताना लाकडं, गोव-या चूल, धूर, फुंकणी, नि डोळ्यातली चुरचुर कशासाठी मनात घ्यायची? शिवाय शिशिर ऋतूचं सोसणं सुसह्य होतं ते वसंत ऋतूच्या आगमनानं आणि तसं तर स्मरणानं!
खरं सुख म्हणजे काय? भूतकाळातील क्लेशकारक आठवणींचं स्मरण नाही करायचं, भविष्यकाळाबद्दल चिंता करण्याचा मानसिकता त्याज्य ठरवायची आणि वर्तमानातील मौज, मस्ती, मजा यामध्ये जगायचं. अशाच व्यक्ती सुखी समाधानी होतात. स्त्रियांनी वर्तमानात जगायचं ठरवावं. तसा निर्धार नवी आव्हानं झेलणं, पेलणं सोपं सुलभ करण्याचे बळ देईल, हे लक्षात घ्यावं. तरच एकविसावं शतक स्त्रियांच्या सकारात्मक मानसिकतेचे प्रतीक ठरेल.