आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leela Patil Article About Priorities In Married Life, Madhurima

प्राधान्यक्रम वेगळे तरीही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटलं जातं, पण दैनंदिन जीवनात मान्य केलं जात नाही. वास्तव असं, की प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे, असं मान्य केलं जात नाही. वादाचे प्रसंग, विरोध करण्याची खुमखुमी, त्यातून तापसंताप, मनस्ताप होत राहतात. विस्कटत जातं मन आणि निराशेने घेरले जातो आपण. ‘नाहीच जमायचं याच्याशी/ हिच्याशी या जन्मात तरी अशी टोकाची प्रतिक्रिया. वास्तविक दोन भिन्न घरं, ज्या त्या कुटुंबातलं वातावरण वेगवेगळं, पार्श्वभूमी भिन्न, संस्कार निरनिराळे आणि मग मनं, मतं वेगवेगळी असणार. अशाच दोन व्यक्ती लग्नानंतर एकत्र येणं, राहणं, बोलणं, जगणं घडत असताना पती-पत्नी नातं निभावत असताना, प्राधान्यक्रमही वेगवेगळे असणं मान्य करायला हवं. पण घडतं उलटं. आपल्याच कामांना/इच्छांना अग्रक्रम देण्यास घट्ट पकडून तेच रेटण्याचा प्रयत्न होत राहतो. मग झटापट शब्दांची, कुरघोडी वर्तनाची आणि अट्टहास आपलेच पुढे रेटण्याचा. यातून निष्पन्न होतं ते काय? वाद, विसंवाद, संघर्ष हेच.
स्वरा एकदम मनमोकळी. हसणं, खिदळणं, चेष्टामस्करी, खळखळून हास्य व भरभरून जगणं. माहेरघरी आई मैत्रीण आणि बाबा स्नेही. अशा स्वराचं लग्न झालं सोहमशी. तो इंजिनिअर, ख्यातनाम कंपनीत पदाधिकारी. दोघं अनुरूप आणि आर्थिक सुखवस्तूपण ठळकपणे उठून दिसणारं. स्वराला खरेदीची, लाँग ड्राइव्हची आवड. कॉमेडी मूव्ही, मस्त दिसणं आणि असणं हा तिचा प्राधान्यक्रम जीवनशैलीचा. तर सोहम सतत डील, प्रोजेक्ट, पॅकेज, मार्केटिंग आणि फोन कॉल्स, इंटरनेट व लॅपटॉपच्या गराड्यात. सोहमला वाचनाची आवड, प्रोजेक्टचे वेड, रिसर्च व पेपर रीडिंग, आळस तर शिगोशीग भरलेला सुट्टीच्या दिवशी. स्वभाव भिन्न असू शकतात. पण प्राधान्यक्रम इतके निश्चित. दोघंही आपापल्या मुद्द्यांचे समर्थन अटीतटीने करत.
अलीकडे किरकोळ वाटणा-या गोष्टींमध्येही प्राधान्याचा फंडा. रियाचा नवरा रसिक. नावाप्रमाणे बायकोकडे सौंदर्यदृष्टीने पाहणारा. म्हणाला, ‘जरा हेअरस्टाइल बदल. सुंदर दिसशील.’ ‘नको ना सैल ढगळ पंजाबी, त्यापेक्षा साडीत छान दिसतेस.’ “टी-शर्ट, पँट घाल.’ “माझ्यासाठी फोर व्हीलर शीक-ग्रेसफुल नि एन्जॉयेबल.’ अशासारख्या त्याच्या प्राधान्याच्या बाबी बायकोबद्दल. त्यावर रियाची चिडचिड. ‘मी आहे अशी तशीच राहणार.’ “नको तुझं पुराण सुरू करूस. मी नि साडी! शी, किती बोवाळा!’ “हेअरस्टाइल हा माझा प्रांत.’ “शिट, रिअली यू आर स्टबन. आरामात जातेय हवं तेव्हा, बाहेर ड्रायव्हर आहे ना. माझा जॉब ही माझी प्रायोरिटी. करिअर इज माय फर्स्ट लव्ह.’
नितीन नवरा नीताचा. फॅक्टरी स्वत:ची. भरपूर काम तितकेच ताण. फॅक्टरी त्याच्यासाठी महत्त्वाची. नीताची नोकरी अर्धवेळ. तिच्या खूप अपेक्षा नवरा म्हणून नितीनकडून. पण त्याच्याकडे वेळ नाही. तिची भावनाशील वृत्ती. प्रेम करावं आणि दाखवावं नव-याने, ही नीताची प्रायोरिटी. डोळे बोलके, नजरेतून प्रेम दिसायला हवं. स्पर्शातून व्यक्त करावं अशी तिची मनोमन इच्छा. नीता सतत दुर्मुखलेली. आयुष्य म्हणजे नरक वाटायला लागला. माणसांची नाती व त्यांची गरज नितीनच्या हिशेबात महत्त्वाचे नाहीच. फॅक्टरी हीच जणू लाइफ पार्टनर. नीताला समारंभ, कार्यक्रम, सण-उत्सवात एकटीच वावरण्याची वेळ. नव-याचं नातं मिरवायची हौस अतृप्तच.
गौरी कर्तव्यदक्ष, स्मार्ट, नवनवीन पदार्थ करणं व खिलवणं. छान दिसणं, नटणं, फिरणं, सौंदर्य मिरवणं हे तिचे प्राधान्यक्रम. माणसं गोळा व अवतीभवती ती राहावीत याची आवड. मनापासून भरभरून जगणं हवंसं. गौतमला त्याचे ना कौतुक, नाही शाब्बासकी. भलताच कामसू. त्याची मूल्ये वेगळीच. पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती मिळविण्यातच रमणारा. ही वृत्ती बदलण्याचा गौरीचा आटोकाट प्रयत्न. पण नाही म्हणजे जमेनासं नाहीच होत. गौरी हल्ली उदास, मरगळलेली. जीवनातला रस आटून, रसरशीतपणा घटून चाललाय. गौतम डॉक्टर, त्याची प्रायोरिटी रुग्णालय, रुग्ण, शस्त्रक्रिया, नि असंच याच क्षेत्रातली.
करिअर आणि घर या दोन्ही आघाड्यांवर लढताना आर्याची फार धावपळ नि पळापळ. तिचा पैसा तिच्या नव-याला ओमला आणि कुटुंबाला हवाय. संसार चालू आहे दोन मुलांसह, पण आर्याने घर सांभाळून मग नोकरी करावी ही ओमची अपेक्षा. मात्र आर्याचं उलट. ती कामात रमणारी. घरासाठीची व्यवस्था लावून घराबाहेर राहायची उशिरापर्यंत. कारण तशी नोकरीची मागणी होती. पण ओमचा ओढा घराकडे. मुलं हा त्याचा वीकपॉइंट. त्यामुळे सतत खटके.
पटकन भावनावश होणारा स्वप्निल. काहीशी तटस्थ स्मिता. थंड, मनाची घालमेल होऊ न देणारी. स्वप्निल सरकारी नोकरीत, स्मिता खासगी कंपनीत. स्वप्निल मुलांभोवती फ‍िरणारा, सतत त्यांची काळजी. जरासं दुखलं खुपलं की अस्वस्थ, त्याची प्रायोरिटी म्हणजे घर नि मुलं. तडजोड नाहीय याबाबतीत, की कसलाच समझोता. स्मितावर सतत तोंडसुख. ‘आई नाहीसच तू. बायको तरी कुठं आहेस प्रेमळ? तुझं काम महत्त्वाचं. बाकी जग नाहीच तुला.’ असे सतत टोमणे. घरसंसारात शांती कशी राहणार?
याउलट सिम्रन. तिचं लक्ष सतत मुलं, अभ्यास, करिअर, क्लास, खाणं याकडेच. अगदी जीव ओतून करणारी. पण या तिच्या प्रायोरिटीमुळं नवरा तर दुर्लक्षलेला. त्याची शाब्दिक, शारीरिक, भावनिक कोंडी. तसा तर शारीरिक, भावनिक, मानसिक सहवासाला दुसरा पर्याय नाही. पण सिम्रनसाठी तो महत्त्वाचा नाहीच. एकमेकांबरोबर असणं, हरेक दिवस ‘शेअर’ करत वाटून देत घेत जगणं नव-याला आवडतं. पण नवरा पोरका. वैवाहिक नातंच रुळांवरून घसरत असल्याचा हा ठळक संकेत नव्हे काय?
तसं तर दोघांची व्यक्तिगत गरज, शारीरिक, मानसिक भूक, नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पना हे सगळं वेगवेगळं, प्रायोरिटीज वेगवेगळ्या हे गृहीत धरावे दोघांनी. घुसमटत राहू नका. परस्परांवर प्रेम हवं. आणि बांधिलकी हवी. विश्वास हवा. त्याहीपेक्षा स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न तर निश्चितच हवा. एकमेकांना समजून, उमजून, जाणून, जाणवून घेणं हवं. समझोता तोच त्राता.

काळ-
वेळ, परिस्थितीनुसार प्राधान्याच्या प्रश्नांच्या टोचा मारून एकमेकांना घायाळ करणं नकोच. माझी आवड, माझी मतं, माझे विचार अशा आक्रमक विचारांनी वावरणारी दोघेही असतील तर संसार कसा होणार?