आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्म अप प्लीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी आज तुम्हा सर्व मैत्रिणींना काही खास टिप्स देणार आहे. नोकरी आणि व्यवसाय करतानाच कौटुंबिक आघाडी सांभाळणार्‍या तुमच्यासारख्या मैत्रिणींसाठी शारीरिक स्वास्थ्य राखण्यास उपयुक्त ठरणारे काही व्यायाम सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की, आम्ही दररोज घरातली कामं, स्वयंपाक, साफसफाई करतो, मुलांना शाळेत ने-आण करतो, बाजारहाट करतो. त्यामुळे आमचा व्यायाम होत असतोच; मग आम्ही खास वेगळा व्यायाम करण्याची काय गरज आहे? हा प्रश्न सर्वच गृहिणींना पडतो. त्यामुळेच बर्‍याच जणी व्यायाम करणे टाळतात, तर काहींचे म्हणणे असते एवढ्या रामरगाड्यात आम्हाला वेळच मिळत नाही. अशा माझ्या मैत्रिणींना व्यायामाचे महत्त्व सांगायचे आहे. तुम्ही दररोज जे घरामध्ये अथवा बाहेर शारीरिक श्रम घेता त्याला व्यायाम म्हणत नाही तर तो तुमचा रोजच्या किंवा दैनंदिन कामाचा भाग असतो. त्याच्यापासून तुमची सुटका नसते; परंतु याव्यतिरिक्त वेगळा वेळ काढून व्यायाम करणे आवश्यक आहे. हे करताना तुम्ही मानसिकदृष्ट्यासुद्धा त्या क्रियेमध्ये जोडणे जाणे आवश्यक असते.

आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीला, मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी, व्यायाम आवश्यक आहे. दिवसभराच्या व्यग्र दिनचर्येमध्ये व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य नसेल किंवा घर अथवा ऑफिसपासून व्यायामशाळा जवळ नसेल, तर चालायला किंवा धावायला जाणे हा एक उत्तम व्यायाम आहे. हल्लीच्या प्रचलित भाषेत यास ब्रिस्क वॉकिंग, किंवा जॉगिंग असे म्हणतात. बर्‍याच जणांना असं वाटतं की, चालायला अथवा धावायला जाण्यासाठी सकाळचीच वेळ योग्य असतेे. परंतु ही एक भ्रामक समजूत आहे. दिवसभरातील कोणत्याही वेळी साधारण ४५ मिनिटे ते एक तास यासाठी राखून ठेवावा. चालताना अथवा जॉगिंग करताना पहिली काही मिनिटे कमी वेगाने चालावे अथवा जॉगिंग करावे व नंतर आपल्या क्षमतेनुसार वेग वाढवावा. तसेच थांबवतानादेखील वेग कमी करत थांबावे. हा व्यायाम कोणत्याही वयोगटातील स्त्रियांसाठी उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने वेळात वेळ काढून व्यायाम करावा, असे मी आवर्जून सांगेन. पुढच्या आठवड्यात आपण वेट ट्रेनिंग आणि योग्य आहाराबद्दल चर्चा करूया. टिल देन, वॉर्म अप.

लीना मोगरे, अतिथी संपादक
फिटनेस गुरू
mkspostbox@gmail.com