आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खिडकीतून मावळतीच्या उन्हाची सोनेरी तिरीप तिरक्या चालीची रेघ उमटवीत आली आणि स्वाती तयारीला लागली. आज सुरेश आला की ती दोघं हँडलूम प्रदर्शनाला जाणार होती. सुरेशने घेतलेली साडी तिने कपाटातून काढली आणि साडीची घडी तिने उलगडली, इतक्यात फोन वाजला. आनंदाचे फुलपाखरी पंख फडफडले आणि तिने फोन उचलला. ‘हॅलोऽऽ,’ पलीकडून सुरेशचा आवाज आला, ‘स्वाती, आय अ‍ॅम सॉरी, आज आपल्याला प्रदर्शनाला जाता येणार नाही. इथे ऑफिसमध्ये लहानपणी माझ्याबरोबर गोट्या खेळणारा माझा बडा मित्र आला आहे. आम्ही दोघं अर्ध्या तासात घरी येतो. हे बघ, त्याला फ्रूट सॅलड आणि बटाटे वडे फार आवडतात. तेवढं करून ठेव.’


स्वातीने फोन ठेवला. लग्नाला दोनच महिने झाले होते. अजून भराभर कोणतेही पदार्थ करायचे म्हटले की तिला धडधड व्हायची. बरं, घरात दुसरं कोणीच नव्हतं. न दिसणारी थरथर तिच्या अंगात शिरली. ‘फक्त अर्धा तास आणि हे दोन बडे पदार्थ! कसं करावं?’ पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. हा सुरेशही कसा? कधीही तिला मदत करत नव्हता. वर म्हणायचा, ‘माझी आई इतका सुंदर स्वयंपाक करते. शिवाय तिला कोणाचीही मदत घेतलेली चालायची नाही. ‘आईचं कौतुक ऐकतानाच तिच्या लक्षात आलं, हे महाशय आपल्याला मदत करण्यात कुचकामी आहेत.
विचारांचा भारा डोक्यावर वाहत तिने फ्रिज उघडला. फक्त सफरचंदं होती. आता केळी, पपई, संत्री आणायला हवीत. भाजीची काळजी नव्हती ते बरं झालं. बटाटे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण सगळं तिने एका ताटात काढलं आणि आपली साडी नीट करत निघाली. दार लावता लावता तिचं लक्ष पलंगाकडे गेलं. सुरेशने दिलेली साडी तिथेच पलंगावर होती. तेव्हा दारातून परत येऊन तिने ती कपाटात टाकली आणि फिरायला जायच्या बेताबाबत मनात निषेध नोंदवत ती जवळच्या फळांच्या दुकानाकडे आली. तिचं नशीब बरं म्हणायचं, हवी ती फळं तिथे होती. आता भाव करण्यात अर्थ नव्हता. तिने पटापट फळं आणि पुलावसाठी भाज्या घेतल्या आणि ती घरी आली.


सगळ्या भाज्या नि फळं आपल्याकडे टवकारून बघताहेत असं तिला वाटायला लागलं. भाज्या धुतल्या, बारीक चिरल्या. तिकडे बटाटे कुकरमध्ये टाकले. इकडे राईस कुकरमध्ये भाज्यांना सोबत घेऊन तांदळाचे दाणे वाफेचा सुस्कारा टाकू लागले. स्वातीनेही एक पदार्थ मार्गी लागल्याचा सुस्कारा टाकला.


दारावरची बेल वाजली. सुरेश आणि त्याचा मित्र आले. आता स्वाती जराशी सैलावली होती कारण, बटाटे वडे गरम तळून वाढता येणार होते. सुरेश आत आला, त्याने विनयची ओळख करून दिली आणि म्हणाला, ‘स्वाती, तुझं सगळं झालं की हाक मार, तोवर आम्ही गप्पा मारत बसतो.’ इतक्यात विनय म्हणाला, ‘वहिनी, काही घाई करू नका. चार वडे तळून झाले की आम्हाला बोलवा.’ स्वातीला नवल वाटलं. इतकं स्वयंपाकघरातल्या गोष्टीचं अचूक ज्ञान कसं? पण तिने ते विचार दूर सारले आणि दोन वडे टाकले. कढईतल्या तेलात बुडबुडे काढत वडे पोहू लागले.


इतक्यात विनय आत आला, ‘वहिनी, मी डिशेस घेतो आणि चमचे पण तिथेच दिसताहेत,’ असं म्हणत विनय समोरच्या काचेच्या कपाटाजवळ गेला. त्याने बशा, चमचे काढले आणि तो म्हणाला, ‘अरे सुरेश, बाउल्स कुठे आहेत?’ सुरेश गडबडलाच. अंधारात रस्ता दिसू नये अशी त्याची गत झाली. तो म्हणाला, ‘स्वाती, बाउल्स कुठे आहेत?’ तेवढ्या वेळात समोरच्या ट्रेमध्ये ठेवलेले बाउल्स विनयला दिसले. त्याने सगळं टेबलवर व्यवस्थित मांडलं. फ्रिजमधून फ्रूट सॅलड काढून स्वातीने सर्व्ह केलं. इकडे सहा, आठ बटाटे वडे तयार झाले होते.
विनय म्हणाला, ‘सुरेश, ते वडे आण इकडे. ’ सुरेशने वड्यांची प्लेट टेबलावर मध्यभागी ठेवली आणि इकडे स्वातीच्या चेह-यावर हास्याच्या रेघा उमटल्या.


लग्न झाल्यापासून हे पहिलंच काम सुरेशने केलेलं तिला दिसलं!
खाणं झाल्यावर हातासरशी सुरेशची आणि स्वत:ची प्लेट, बाउल्स, सगळं घेऊन विनयने बेसिनमध्ये टाकलं. आणि मग बाहेर जाऊन ते गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने, ‘वहिनी, माझ्या आवडत्या डिशेस मला खाऊ घातल्यात, मेनी मेनी थँक्स. मस्त झाले होते दोन्ही पदार्थ,’ असं म्हणून सुरेशचा निरोप घेऊन विनय निघून गेला. तो गेल्यावर सुरेश किती तरी वेळ त्याच्या आठवणी सांगत बसला.


दुस-या दिवशी सकाळी स्वाती उठली. ती चहा करायला लागली आणि सुरेश आत आला. रोजच्यासारखी चहाची वाट पाहताना त्याने स्वातीला वर्तमानपत्र मागितलं नाही म्हणून तिने सुरेशकडे पाहिलं तर त्याच्या हातात वर्तमानपत्र होतं. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. सुरेशने वर्तमानपत्र टेबलवर ठेवलं आणि स्वातीकडे पाहिलं. स्वाती किटलीत चहा गाळत होती. सुरेशने तोवर कपबशा टेबलवर मांडल्या आणि बशीत बिस्किटं काढली. म्हणाला, ‘ये स्वाती, आपण दोघं बरोबरच चहा घेऊ.’ स्वातीला आता सुरेशच्या कामाचा उमज पडला. काल विनयने तिला किती तरी मदत केली होती. सुरेशच्या नकळत त्याला छान धडा शिकवला होता. सुरेशकडे पाहत स्वातीने चहाचा चवदार घोट घेतला आणि हसत सुरेशपुढे बिस्किटं सरकवली.