आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रयोग करायला काय हरकत आहे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डान्सबारना मान्यता देऊन बारबालांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्याचे पुण्य कुणी मिळवले. स्वारींना रात्री वावरायला अधिकृत रंगशाळा मिळणार या चिंतेने कुण्या गृहिणींचे मुखचंद्र काळवंडले. र.धों. कर्वेंच्या ‘समाजस्वास्थ्य’ला 84 वर्षे झाली. बृहन्महाराष्‍ट्र मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनाच्या निमित्ताने उल्लेखनीय असे मजपाशी काही जमले. म्हटले तर हा लेख त्या सगळ्याचे कडबोळे, अवियल, खतखते अथवा भोगी अशासारखे घाटले आहे.
‘बारबालांपासून संसार वाचवा, बायांनो नवरे सांभाळा’ असा एक सल्ला. पुरुषांनी बाहेरख्याली असणं ही त्यांच्या मेंदूतील रसायनांचीच मागणी. त्यापासून दूर असे पुरुषांना एकनिष्ठ बनवणे हे आव्हान, कदाचित विवाह समुपदेशक तुम्हाला यात मदत करू शकतील असा दुसरा सूर.
माझ्या डोक्यात वळवळलेला एक किडा असा, ‘मेंदूतील रसायनांना उत्तेजित कोण करतं?’ या उत्तेजनांवर काही निर्बंध आणता येतील. नैतिक-अनैतिक हे समाजानेच ठरवायचे असल्याने स्त्री-पुरुष दोहोंनाही जो द्यायचा तो अधिकार समान द्यावा. त्याची न्याय्य अंमलबजावणी होतेय हे पाहण्याची जबाबदारी घरोघरीच्या लक्ष्मी-नारायणांनी घ्यावी. इंटरनेटवर बरंचसं ट्रॅफिक हे पॉर्न साइट्समुळे होतं म्हणे. बिघडण्याचा हा नवा मार्ग असे एक मत. ‘समाजस्वास्थ्य, कामसूत्र नि गेशा यांचे काम इंटरनेटवरच्या कलात्मक प्रेझेंटेशन्सनी होईल,’ असा विधायक विचार का नाही, असा माझा प्रश्न.
‘इंडियन-गर्ल-हनीमून-क्लिप-लीक्ड’ अशा प्रकारचे एसेमेस नि त्यावरच्या उड्या ही आपल्याकडे स्थळकाळाचे भान विसरून घडणारी गोष्ट. इथे बेभान हेच नैसर्गिक, तेव्हा आपण वादात न पडावे. तर सांगत होते, त्यातली ती मुलगी, नववराच्या हुकूमशाहीचा बळी असल्यासारखी दिसत होती. आज्ञा क्र. 1. चल, कपडे उतरव, इकडे कॅमे-याकडे बघ. अशाच आणखी पुरुषी अधिकारातून आलेल्या आज्ञा. बिच्चारी! पुढे स्वारी तिच्यावर स्वार नि दौड सुरू. तिचा विव्हल चेहरा रावांच्या मर्दुमकीच्या संपूर्ण चित्रीकरणाच्या अट्टहासात कधीमधी दिसतो.
स्वप्नांचा चुराडा फक्त याच स्त्रीच्या नशिबी असे नाही. तिच्या उत्कर्षाशी देणेघेणे नाही, अशा संवेदनाहीन पुरुषाशी गाठ पडलेल्या प्रत्येक भगिनीचे ते दु:ख आहे. विवाह समुपदेशकाकडून धडे घेणं शाळेत जाऊन शिकण्यासारखं समाजमान्य होतंय. पण इंटरनेटवरच्या साइट्सवर लाइव्ह शोज पाहताना कुणाला ही वेदना अधिक चांगली कळू शकेल. समुपदेशकाला ‘इट्स अ रोमँटिक जर्नी एंडिंग इन्टू इंटरकोर्स’ ही सेक्सची व्याख्या समजावणे सहज जमेल. गरज आहे, ‘मल्टिमीडियामधून जाणवतं ते सगळं स्वार्थापलीकडेही समजून घेण्याचा’ शहाणपणा बाणवण्याची.
पुरुषांच्या मेंदूतील रसायनांचे लाड स्त्रीने करावेत, मदालसांचे ओठ त्यांना भुरळ पाडणारच हे समजून घ्यावे. याला एक चांगले उत्तर इंटरनेटच्या माध्यमातून स्त्रीला उत्तेजना देऊ शकणा-या साइट्सच्या रूपात उपलब्ध आहे. समंजसपणा उभयपक्षी वाढीला लागेल अथवा एकपक्षी असमंजसपणाला आळा बसेल. प्रयोग करायला काय हरकत आहे?
पुरुषांचा एकतर्फी प्रचार आहे की त्यांची कामवासना उत्तेजित असते आणि स्त्रीची तशी नसते. बाहेरख्यालीपणा खपवून घेण्याचीच गरज आहे अथवा बलात्कारासारखे प्रसंग घडणारच, किंवा स्त्रीने त्याला हवी तेव्हा साथ नाही दिली तर तंटे स्वाभाविकच, हे सगळे दाखवले जाते तितके निसर्गत: आॅब्व्हियस नाही. कधी या प्रकारे स्त्री-चेतवणारे प्रयोग करून कुणी निष्कर्ष काढल्याचे माझ्या आढळात नाही. किंबहुना माझ्या एका मित्राबरोबरच्या चर्चेत मदालसेच्या ओठांच्या फोटोंचा त्याच्यावर नि त्याच्या मित्रांवर झाला तसा परिणाम माझ्यावर अथवा माझ्या मैत्रिणींवर झाला नाही. पॉर्न साइट्सवरच्या मटेरिअलमध्ये मला ते पोटेन्शिअल दिसते. समान अधिकारामध्ये हे सगळं यावं ना...
आणखी एका चर्चेत असं आलं होतं, बाळंतवेणांचे उदात्तीकरण केल्याने किमान सहनकर्तीला रिकग्निशन तरी मिळते. बलात्कारात जर इतक्या वेदना होतात तर काही प्रमाणात वेदना या समागमातही असणारच. पण यावर पुरुषांना त्या वेदनांची जाणीव असल्याचे आढळले नाही. पॉर्न साइट्सवर काही प्रचारकी मटेरिअल असले तरी काही प्रमाणात तरी त्याचा शिक्षणासाठी निश्चित उपयोग होऊ शकतो. त्या क्लिपमधल्या दुर्दैवी मुलीचा नवरा इतका मदोन्मत्त आहे, त्याला तिचे अश्रू, बापुडेपण दिसतच नाही. आपले बरेच हीरो अनुकरण करतील (करत असतीलच, म्हणून तर नव-याने झोडलं तर... सारख्या म्हणी) बाईचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार वाढतच राहील.
प्रणय हळुवार आहे, संवेदनशील आहे, अशा प्रकारचे चित्रीकरण इतकेप्रभावी आहे की मला नाही वाटत एखाद्या समुपदेशकाला केवळ वाक्चातुर्याच्या बळावर इतक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल.
लोकांना जर पॉर्न साइट्स बघून जिभल्या चाटायच्याच आहेत तर आपण खुलेआम त्याचा उपयोग करून शिक्षण का देऊ नये? आणि एकदा का त्या साइट्सना शिक्षणाचा आयाम प्राप्त झाला की आपोआपच पुन:पुन्हा तेच ते अंगप्रदर्शन पाहून वेळ काढण्याची प्रवृत्ती कमी होईल.