आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दम्य!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय सुनीता विल्यम्स,
माझी मैत्रीण तुझ्याशी संवाद साधत होती, आणि आम्ही अक्षरश: जळत होतो.
हो, म्हणजे तिला संधी मिळाली, 2007मध्ये तशा लहानच होतो आम्ही. पण ही मैत्रीण तेव्हापासून तुझी जबरदस्त क्रेझ असलेली. आत्ता 2013मध्ये दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, मुंबई ज्या ज्या ठिकाणी तू गेलीस, तिथे तिला मीडिया पर्सन म्हणून प्रवेश मिळवता आला असता, पण शेवटी एकाच शहरात तिला तुला पाहण्याची नि ऐकण्याची संधी मिळाली... हाऊ लकी शी इज... तिनेच तू साधलेला संवाद जसाच्या तसा, आमच्यापर्यंत पोहोचवला.
अर्थात, त्यापूर्वी ‘यु ट्यूब’वर कितीतरी वेळेस आपण भेटलो...
तुझे स्पेस वॉक... 50 तास 40 मिनिटे चालण्याचा तुझा विक्रम... अंतराळात 322 दिवस तुझे राहणे, आम्हाला तुझ्याबद्दल कुतूहल, तुम्ही तीन भावंडे. सुट्ट्यांमध्ये सतत बाहेरचे प्रदेश, परिसर धुंडाळणारे तुम्ही... तुझे वडील भारतीय, म्हणून तुझे येथे येणे... भगवद्गीता, गणपती आमच्या संस्कृतीबद्दल तुलाच अधिक माहिती.
अंतराळात आपला तिरंगी झेंडा तू नेलास, त्याचे काय अप्रूप वाटले आम्हाला...
अवकाशात राहून ट्रेडमिलवर धावणारी तू, याच आंतरराष्‍ट्रीय अवकाश स्थानकाबाहेर दुरुस्तीचे काम करणारी तू, जिथे काही महिने राहायचे त्याची डागडुजी करता आलीच पाहिजे, यासाठी केवढ्या गोष्टी तुला कराव्या लागल्या.
‘डिस्कवरी’ चॅनेलवर या मोहिमा आम्ही पाहात होतो.
सुनीता, ज्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहतो, ज्या घरात कायम राहिलो, त्या रुमची वरवर सफाई आम्ही करतो, पण फ्यूज गेला, नळ खराब झाला, पाणी वाहू लागले, टेबलाचा पाय तुटला, मोबाइल अकस्मात हँग झाला, पी. सी किंवा लॅपटॉप नादुरुस्त झाला की, धाबेच दणाणते आमचे. टू-व्हीलर बंद झाली तर जिथे आहे तिथे ठेवायची, हा आमचा फंडा.
होस्टेलच्या रुमबद्दलच नव्हे तर तिथल्या खाण्याची, व्यवस्थेची कायम तक्रार करणाºया आम्ही.एवढीशी रुम, कधी पाणी नसणे, खायला काही न मिळणे, मात्र तुझी दिनचर्या पाहून संकोचलो आम्ही.
तुझे खडतर प्रशिक्षण आणि निरनिराळ्या देशात लहानपणापासून प्रवास करण्याची तुला मिळालेली संधी यामुळे तुझ्यात सहनशीलता रुजली. किती सहज पण केवढे खरे बोललीस तू. प्रवास, माणसे, निसर्ग किमया करतो. प्रत्येक सुट्टीत तुम्हा तिघांना आई-वडिलांनी कायम बाहेर नेले. आम्ही त्याच शहरात, मॉल, मुव्ही यात दंग होत राहिलो. नवा अनुभव नको, बंदिस्त जागा आणि तीच ती घिसीपिटी मनोरंजनाची साधने. प्रशिक्षण म्हटले की, आमच्या अंगावर काटा.
तुझा विश्वास आहे माणसांवर... कोणत्या तरी देशाचा नागरिक, हे लेबल आम्हीच लावतो. आमची ओळख उपजात, जात, धर्म, वंश यात फिरणारी, तू तर विश्वाला घर मानणारी.
‘पीपल आर युनिव्हर्सल सिटिझन्स ऑफ ए ब्युटिफुल प्लॅनेट’ हा तुझा सार्थ विश्वास, कारण तू पृथ्वीभोवती फिरतेस, अहंकाराभोवती नाही. क्षुद्र विचार, मनोवृत्ती तुझ्या आसपास फिरकल्याही नसतील.वजनविरहित स्थितीत तरंगत असताना, अंतराळातून पुंजक्यासारखे मानव वस्तीचे दर्शन घडत असताना तुझ्या मनात अविचार येणे शक्यच नाही.
देशाला तुकड्यातुकड्यांनी तोडत, दुरभिमान बाळगणाºया, ध्येय न ठेवता निव्वळ टाइमपास करणाºया आमच्यापैकी कित्येकांना तू फक्त एक वाक्य सांगितलेस... झोकून द्या... तल्लीन होऊन जा, कशाचा तरी हिस्सा बना, ज्यात रुची असेल त्या कशाचाही...
ही इन्व्हॉल्व्हमेंट जगण्याचा भाग बनवू आम्ही... तू खूप मोठी आहेस वयाने, पण एकेरी उल्लेख करतो आम्ही... कारण तू आमची स्पेस भरून काढली आहेस.