आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिय रसिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मन हेलावणारा लेख
१३ सप्टेंबर रसिकमधील अरविंद जगताप यांचा लेख मन हेलावणारा आहे. लेख वाचून राजकारण्यांबद्दल चीड वाटते, तर नाना आणि मकरंदबद्दल अभिमान. अर्थात, हृदयद्रावक परिस्थिती आहे, मागे राहिलेल्या कुटुंबीयांची..

एक सुजाण नागरिक म्हणून आपणही खारूताईचा वाटा उचलावा, अशी लेख वाचून मनापासून इच्छा झाली. सुस्त पडलेल्या भावनांना जागृत करण्याचे काम लेख व लेखकाने केले, याबद्दल धन्यवाद. - तृप्ती जाधव

भानावर आणणारा लेख
दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीतील अरविंद जगताप यांचा लेख वाचला. लेखात सर्व मुद्द्यांची अतिशय व्यवस्थित मांडणी करण्यात आली असून आजच्या वर्तमानावर अत्यंत जळजळीत व कठोर भाष्य त्यात आले आहे. खऱ्या अर्थाने समाजमनाला भानावर आणणारा हा लेख आहे. लेख वाचताना असं वाटत होतं की, हे माझ्या अंतरीचे बोल आहेत.
विदर्भाचे भेदक चित्रण
६ सप्टेंबर ‘रसिक’ अंकात विरा साथीदार यांनी विदर्भामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे व उपाय अतिशय समर्पक शब्दांत मांडले आहेत. याला राजसत्तेचे धोरण व दृष्टिकोन जास्त कारणीभूत आहे, असे ठामपणे त्यांनी मांडले आहे. लेखात आताच्या विदर्भातील शेतकऱ्यांना प्रश्न विचारला आहे की, उत्पन्नाचे खात्रीचे साधन नसलेला आदिवासी मात्र आत्महत्या करीत नाही, मग स्वत:ची शेतजमीन असलेला शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

विरा साथीदार यांचे मत शेतकरी हितासाठी आहे. शेतकऱ्यांच्या आधीच्या पिढ्यांनी एकाहून एक भयानक संकटे भोगलीत, उपासमार भोगली व दारिद्र्य पाहिले; परंतु आत्महत्या न करता संकटाचा मुकाबला केला. हे आजच्या शेतकऱ्याने समजून घेऊन धीर धरला पाहिजे. आपल्या लेकरांना असे अचानक उघड्यावर टाकून देऊन तुमचा प्रश्न सुटणार नसून त्या परिस्थितीशी तुम्ही लढले पाहिजे, असे मत त्यांनी सुंदर शब्दांद्वारे मांडले आहे. पुन्हा ‘सोन्याची कुऱ्हाड वऱ्हाड’ झालं पाहिजे, हा या लेखामागील उद्देश आहे. ते विदर्भातील सामान्य शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. — शंकर अर्जुन चव्हाण, जळगाव

आपण या मातीचं ‘बेणं’ लागतो...!
१३ सप्टेंबर ‘रसिक’मधील अरविंद जगताप यांचा मातीशी नाळ असणाऱ्या प्रत्येकाला (संवेदनशील व्यक्तींना) अंतर्मुख करणारा ‘आपण काही देणं लागतो की नाही?’ हा लेख वाचला. खरं म्हणजे, लेखकाने आत्मपरीक्षणात्मक प्रश्न विचारून संवेदनशील वाचकांना विचार करायला भाग पाडलेले आहे. आपण या मातीचं देणं लागतो, एवढंच नव्हे; तर आपण या मातीचं ‘बेणं’ आहोत, या सामाजिक जाणिवेतून आपण समाजाचं देणं लागतो. आपण या मातृभूमीचं देणं लागतो. ज्याला या देशाचा पोशिंदा म्हटलं जातं, बळीराजा म्हटलं जातं, त्या ‘बळी’ जाणाऱ्या असहाय्य, हतबल राजाच्या सेवेसाठी समाजऋण म्हणून नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आदी मंडळींनी शेतकऱ्यांच्या दुःखाचा वाटा आपापल्या परीने उचलण्याच्या हेतूने अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी पाऊल टाकलेले आहे.

शेतकरी बांधव अव्याहत दुःखाने होरपळून निघत असताना, भौतिक विकासाच्या भंपक गप्पांच्या धुरळ्यात शेतकरी सदैव दुर्लक्षिला जातो. भौतिक विकास मुळीच नको असे नाही, किंतु याबरोबरच एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे, समाजाचे स्वास्थ्य सुदृढ, निरोगी आणि बाळसेदार ठेवायचे असेल, तर कृषिप्रधान म्हटल्या जाणाऱ्या देशाचा शेतकरीसुद्धा यापासून यत्किंचितही वंचित राहता कामा नये. अन्यथा केवळ भौतिक सुख-सुविधा इ. विकासाच्या रेट्यामुळे समाजाचा आणि तद्वतच देशाचा केवळ एकच अवयव वाढलेला दिसेल, आणि हा एक अवयव वाढणे म्हणजे ते बाळसे नव्हे, तर ती एक प्रकारची सूज ठरेल. जी सामाजिक आरोग्यास अहितकारक व धोकादायक आहे. शहर, रस्ते, गल्ली, चौक यांची नावे बदलली जावीत, म्हणून आक्रमक होणारी; तसेच आठ दिवस मांस खावे की दोन दिवस खावे, या आणि अशा कित्येक क्षुल्लक गोष्टींपेक्षा आज पोटाची खळगी भरण्यासाठी काय खावे? या विवंचनेत पडलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र कुणीच कसा आक्रमक होत नाही. अशा वेळी पक्ष, संघटना, चळवळ, साहित्य, संगीत, कला, नोकरदार, व्यावसायिक आदींनी आपणही या समाजाचं देणं लागतो...! आपणही या मातीचेच ‘बेणे’ आहोत...! या भावनेतून यथाशक्ती हातभार लावण्याचे कार्य करणे नितांत गरजेचे आहे. शेतकरी अधिकाधिक स्वयंपूर्ण कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. — संतोषकुमार आवटे, जालना

मन हेलावणारा लेख
१३ सप्टेंबर ‘रसिक’मधला अरविंद जगताप यांचा लेख वाचला. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना जाणून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेले नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांनी कलाकारांमधील माणूस जिवंत ठेवला आहे. जगाचा पोशिंदा असणारा ‘बळीराजा’ आज संकटात आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदत करून, आत्मिक बळ देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. शहरातल्या लोकांना या गोष्टींचं काही गांभीर्य राहिलं आहे की नाही? आपल्यातील संवेदनशीलता मरत चाललेली आहे की काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

कोणत्याही गोष्टींचं आकांडतांडव करून ‘ब्रेंकिग न्यूज’ करणारी आम्ही माणसं, कांदा महाग झाला की एकापेक्षा एक विनोद निर्माण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीने कोट्यवधी रुपये खर्च करतो; पण हाच पैसा पाण्याचा प्रश्न सोडवायला का वापरला जात नाही, हे जगतापांनी फार सूचकपणे मांडले आहे.— प्रा. जिजा शिंदे, औरंगाबाद