आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलिंगींच्या हक्कांसाठी सर्वकाही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिशांनी 1868मध्ये 377 कलमान्वये समलैंगिकतेला गुन्हा मानणारा कायदा आणला, तेव्हा भारतीय संस्कृती आणि व्हिक्टोरियन प्रभाव असलेल्या संस्कृतीमध्ये लैंगिकतेच्या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण व्हायला हवा होता. मात्र पाश्चात्त्यांचे अनुकरण (अंधानुकरण) नको म्हणून त्यांच्या विरोधात अनेक लढाया लढल्या जात असताना, या कायद्याविरोधात समाजातील कोणत्याही घटकांनी आवाज उठवला नाही. परिणामी हाच कायदा पुढे अमानुषपणे, कुठलेही शास्त्रोक्त ज्ञान न घेता स्वातंत्र्यानंतरही अमलात येत राहिला आणि एरवी चार भिंतींच्या आत सीमित राहणारे समलिंगींचे खासगी आयुष्य समाजासमोर आणण्याची गरज निर्माण होत गेली आणि इथून खरा संघर्ष सुरू झाला तो, आपण गुन्हेगार नसल्याचे सिद्ध करण्याचा!
‘एलजीबीटी’... समलैंगिक-स्त्री (लेस्बियन), समलैंगिक पुरुष (गे), बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर या वर्गात मोडणार्‍या समूहांनी स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करताना स्वत:चे खासगी, लैंगिक संबंधांचे आयुष्य समाजासमोर विविध माध्यमांतून आणण्याची 2013 पर्यंत फार मोठी किंमत मोजली आहे. मला समाजाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की कुठला नवरा वा कुठली पत्नी आपल्या बेडरूममधील खासगी जगण्याबद्दल खुलेआम बोलू शकेल? पण, समलैंगिकता म्हणजे काय, बायसेक्शुआलिटी म्हणजे काय, ट्रान्सजेंडर म्हणजे काय, हे नेमके ठाऊक नसलेल्या समाजापुढे स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी समलिंगींना आपल्या शारीर प्रेरणा, शरीर यासंबंधी बोलणे भाग पडते. आणि इथेच आणखी एक गैरसमज तयार होतो तो म्हणजे, समलैंगिकता म्हणजे शरीरसंबंधांचा खेळ, बाकी त्यामध्ये कुठलंही भावनिक-मानसिक विश्व विस्तारत नाही!
समलैंगिकांना सार्वजनिक जीवनात वावरताना आज कुठलेही व्यावहारिक अधिकार नाहीत, त्यांना बॅँकेत आपले जॉइंट अकाउंट उघडता येत नाही, ते काम करत असलेल्या ठिकाणी त्यांना प्रमोशनच्या बाबतीत अनेकदा डावलले जाते, भेदाभेदाची वागणूक मिळते. हे लोक आपल्या भावना कुणाला सांगू शकत नाहीत; अशा वेळी त्यांचे भावनिक-मानसिक विश्व हा समाज समजून घेईल, अशी अपेक्षाच ठेवणे चुकीचे ठरते. अशा वेळी मग या समूहाला निर्दोषत्व सिद्ध करण्याबरोबरच मानवी हक्कांच्या लढाईसाठी वेगवेगळ्या माध्यमांमधून बोलते व्हावे लागते. समाजात डावखुर्‍या माणसांची संख्या कमी आहे, म्हणून आपण त्यांना विकृत वा अबनॉर्मल ठरवतो का? मग समलैंगिकांच्या वाट्यालाच हे सगळं का?
पोलिसांनी कलम 377चा चुकीचा अर्थ लावून समलिंगींना सार्वजनिक आयुष्यात वावरण्याचा अधिकार नाही, हेच अधोरेखित करीत 2009पर्यंत कारवाया केल्या होत्या. मात्र 2009मध्ये, या कायद्यात समलैंगिकांचे संबंध सहमतीने आहेत तोवर कारवाईची गरज नाही, अशी सुधारणा करण्यात आली. इथपर्यंत हा कायदा आल्यानंतर आज चार वर्षांनी या कायद्याकडून फारशी अपेक्षा न ठेवता (या कायद्यातील सुधारणेने या समूहाला मदत केली, असे खरे तर म्हणता येणार नाही. उलट एड्सविषयक जागृती करताना पुरुष समलैंगिकांमध्ये कंडोम वाटप केल्यास गुन्हाच ठरतो!) केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून, अभिव्यक्तीच्या माध्यमातून आज निदान समाजामध्ये या समूहाच्या प्रश्नांवर संवाद सुरू झाला आहे, समलैंगिक आपल्या समलैंगिकतेबद्दल आपल्या पालकांशी, भावा-बहिणींशी बोलायला लागले आहेत, ही एक प्रकारे प्रगतीच म्हणता येईल.
मात्र संविधानात नमूद केलेल्या मानवी हक्कांची लढाई जिंकण्यासाठी, पुढील अनेक वर्षे आम्हाला लढावे लागणार आहे. आम्हाला वेगळे अधिकार, वेगळ्या सुविधा नकोत, आम्हाला मुख्य प्रवाहातच राहून काम करायचे आहे, जगायचे आहे. मात्र अनेकदा माणूस म्हणून आमचा जगण्याचा वा मूलभूत अधिकारांचा हक्कच हिरावून घेतला जातो आहे. याबाबत मला एक उदाहरण आजही आठवते. माझ्याकडे बीपीओमध्ये काम करणारी एक ट्रान्सजेंडर स्त्री (मुलाने स्वत:चे स्त्रीमध्ये रूपांतर केले होते) हतबल होऊन आली होती. महिलांचे स्वच्छतागृह वापरते म्हणून तिच्या विरोधात ‘एचआर’कडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. तिचे म्हणणे होते, ‘एचआर’ व्यवस्थापकाला मी स्त्री आहे असे सांगितले, तर तो प्रुफ मागतो.
ही हतबलता मुळात या समूहाच्या वाट्याला का यावी? आपल्याकडे या समूहाची लैंगिकता ही त्यांची निवड आहे, असा गैरसमज करून घेतला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही समलैंगिकच काय, हेटेरोसेक्शुअलही (समाजाच्या दृष्टीने ‘निरोगी’ लोक) आपली लैंगिकता, आपल्या लैंगिक प्रेरणा निवडू शकत नाहीत. शिवाय ‘जेंडर आयडेंटिटी’ आणि ‘जेंडर एक्सप्रेशन’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात; नव्हे आहेत. समलैंगिक समूहाच्या अतिशयोक्त वागण्याकडे बोट ठेवताना, माध्यमांनीच त्यांचे अतिशयोक्तीपूर्ण चित्रण आतापर्यंत केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या संदर्भात माझेच उदाहरण द्यायचे झाल्यास, माझ्या आईला विश्वासात घेऊन मी समजावलं होतं की मी समलिगी आहे. त्या वेळी तिने सहज प्रश्न केला होता, म्हणजे तू स्त्रीबरोबर संबंध ठेवू शकत नाहीस का? तिला जे उत्तर मी दिलं, तेच समाजानेही समजून घेण्याची गरज आहे. समलैंगिक पुरुष हा ‘बाईल्या’ असतो, तो स्त्रीबरोबर संबंध ठेवण्यास असमर्थ असतो, समलैंगिक स्त्री ही बहुतांशी पुरुषी दिसते, हे ‘स्टिरेओटाइप्स’ आहेच, जे अगदीच चुकीचे आहेत. मी स्त्रीबरोबर संबंध ठेवू शकतो, पण ती माझी शरीराबरोबर मानसिक, भावनिक प्रेरणा, इच्छा वा गरज नाही, जे नैसर्गिक आहे. परंतु हीच उमज समाजाला नसते.
समाजामध्ये समलिंगी लोक काय योगदान देऊ शकतात, हेही समजून घेण्याची मानसिकता नसलेल्या समाजामध्ये या समूहाला निर्मळपणे जगता येण्यासाठी खूप लढावे लागणार आहे. त्यासाठी दहा वर्षांपूर्वी जी माध्यमे वापरली जात होती, त्यात आता विस्तार झाला आहे. रेडिओ, टीव्ही चॅनेल्स, युट्यूब, वृत्तपत्रे यांसारख्या माध्यमांचा वापर वाढतो आहे. ‘कशिश’सारखे माहितीपट महोत्सवही आयोजित केले जात आहेत. महाविद्यालयांमध्ये समलैंगिकतेमुळे चेष्टेचा विषय होऊन ‘ड्रॉप-आऊट्स’ वाढू नयेत, थांबावेत म्हणून पथनाट्यांसारखे विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. मी स्वत: कार्पोरेट कंपन्यांमध्ये जाऊन जनजागृतीपर व्याख्याने देतोय. प्राचीन भारतीय संस्कृतीच मुळात अनेक-जातिधर्मांचं मिश्रण ल्यायलेली आहे. त्यात लैंगिक प्रेरणाही अंतर्भूत आहेत. पण पाश्चात्त्यांच्या अनुकरणात ही जाणीवच समाजाने विस्मरणात टाकलेली आहे. त्यामुळे माझी, माझ्या समूहाची लढाई ही फक्त मानवी हक्कांसाठी आहे, अमुक एका संस्कृतीविरोधात, अमुक एका धर्माविरोधात, विशिष्ट विचारधारेच्या राजकीय पक्षापुरती ती अजिबातच नाही. संविधानातील एक अधिकार मी या देशाचा नागरिक म्हणून मागतो आहे...
-हमसफर ट्रस्टच्या एचआयव्ही प्रोग्रामचे संचालक
शब्दांकन : प्रियांका डहाळे