आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Mantra Article Of Sachin Tayde In Divya Marathi

चारित्र्याची व्याख्या ठरवायची कुणी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा कुणा व्यक्तीच्या जीवनातील घटनांवरून आपण त्याच्या चरित्राचा लेखाजोखा मांडायला लागतो. मग वाट्टेल त्या पद्धतीने आणि वाट्टेल त्या प्रकारे आपण वाटेत येणाऱ्यांचा न्याय करत सुटतो. मुळात एखाद्याला चारित्र्य असणे किंवा नसणे, हे ठरवणारे आपण असतोच कोण?
जीवन जगताना आपली शोधयात्रा कोणत्या वळणावर आपल्याला घेऊन जाईल, हे सांगता येणं तसं कठीणच. अशा वेळी ज्याने त्याने आपापल्या पातळीवर ‘अत्त दीप भव’चं गुंजन म्हणजेच स्वयंप्रकाशित होण्याचं गीत गात राहणं, अधिक श्रेयस्कर ठरतं. प्रत्येक ऋतूत व्यक्तीला बरंच नवं नवं काहीतरी गवसल्याचा आनंद होत असतो. मात्र गवसणं किंवा सापडणं हे शब्द वापरताना आपण स्वत:ला हेही विचारून घेतलं पाहिजे की, आपलं काही हरवलं होतं का? मग प्रश्न पुन्हा उभा राहतो, की काही हरवलंच नव्हतं तर सापडलं तरी नेमकं काय?

तरुणाईचं रक्त सळसळो वा न सळसळो, एका गोष्टीची हमी मात्र त्यांच्या बाबतीत देता येते, ती ही की किमान इतर कुणाहीपेक्षा तरुण व्यक्ती बऱ्यापैकी आशावादी आणि बंडखोर असतात. मात्र, नियती अधिक ‘वक्तशीर’ आणि ‘व्यक्तशीर’ असते, हे आपण विसरू नये. त्यामुळे जीवनात जर आपल्याला अपेक्षित काही घडावंसं वाटत असेल, तर नियतीला अनपेक्षित असं आपल्या हातून काही घडू नये, याची काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. नसता होत्याचं नव्हतं व्हायला फारसा वेळ लागत नाही.

सुखाचे अंकुर तेथेच तग धरू शकतात, जिथं त्यांना समाधानाचा ओलावा उपलब्ध होतो. अन्यथा पाहता-पाहता हाताच्या दोन बोटांतून जसा पारा निसटावा, तसं सुख आपल्या आयुष्यातून निसटून जातं. बोटाने उचलता यावेत, असे खूप कमी क्षण आपल्या जीवनात येत असतात, याचंच गांभीर्य आपल्याला कळायला हवं.

कुठल्याशा कराल भयाने आपण सगळेच ग्रस्त असतो. अनेकदा कशाची तरी कमतरता आपल्या जीवनात आहे, असं सतत जाणवत राहतं. मात्र नेमकं काय, हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. खरं तर चार माणसांचा आपला गोतावळा म्हणजेच आपलं जग असतं. त्यात आपण अतिशय मश्गुल असतो. मात्र या गोतावळ्यात नव्या माणसाची एंट्री झाली की मग आपण सावध होऊ लागतो. आपण एक तर अशा माणसावर लवकर विश्वास तरी ठेवतो, किंवा संशय तरी उभा करतो. अनेकदा कानावर एक वाक्य पडत असतं की, मी अमुक-तमुकला एका नजरेत ओळखलं होतं किंवा पाच मिनिटांत मी माणूस ओळखू शकतो. खरंच हे शक्य आहे का...? आपण कुणाला एका भेटीत किंवा काही मिनिटांच्या सहवासात ओळखू शकतो का...? इंग्रजीमध्ये एक छान म्हण आहे don’t judge book by its cover. या म्हणीचा विचार दोन्ही बाजूंनी केला, तर आपल्या हाती कोणते उत्तर मिळावे, हे पुन्हा ज्याच्या त्याच्या आकलनावर अवलंबून असते. जीवनात अशी अनेक माणसांची बेटं आपल्याला भेटत असतात.

मुद्दा हा असतो की, प्रत्येकाला स्वतंत्र दृष्टीने पाहणे गरजेचे असते. नाहीतर कुण्या व्यक्तीवर आपण अन्याय करू शकतो. असे होऊ नये म्हणून थोडंसं संयमी भूमिकेतून माणसा-माणसांमध्ये भावतंतू सांभाळण्याचा आपण प्रयत्न करावा. शब्दसंभार वापरताना त्यांची मदत काळजीपूर्वक व्हावी. संदीप खरे यांची ओळ अशा वेळी राहून राहून आठवत राहते, ‘शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणूनी, वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही....’

अनेकदा कुणा व्यक्तीच्या जीवनातील घटनांवरून आपण त्याच्या चरित्राचा लेखाजोखा मांडायला लागतो. मग वाट्टेल त्या पद्धतीने आणि वाट्टेल त्या प्रकारे आपण वाटेत येणाऱ्यांचा न्याय करत सुटतो. मुळात एखाद्याला चारित्र्य असणे किंवा नसणे, हे ठरवणारे आपण असतोच कोण? आणि त्यातही चारित्र्याची जेव्हा चर्चा सुरू होते, तेव्हा त्यामध्ये एखाद्या स्त्रीचीच चर्चा अधिक वरच्या आवाजात सुरू असते. जणू काही पुरुषांइतका चारित्र्यवान जीव या भूतलावर कुणी नाही. ‘शील’ आणि ‘अश्लील’ शब्दाची व्याख्याही ज्याच्या-त्याच्या आकलनानुसार बदलते. मला नेहमी वाटतं, अश्लीलता ही दिसण्यात नसून ती आपल्या पाहण्यात असते.

दुसरीकडे चारित्र्यवान स्त्रीची व्याख्यासुद्धा आपल्याकडे अतिशय सोयीने केली जाते. जी स्त्री मरेपर्यंत आपल्या पतीसोबत एका बंधनात... आणि बंधनातच.. राहील, तिलाच चारित्र्यवान असल्याचं सर्टिफिकेट मिळतं, बाकी इतरांना नाही. मग हाच नियम पुरुषांना लागतो का...? अनेकदा उत्तर ‘नाही’ असंच येतं. एकाला एक नियम तर दुसऱ्याला दुसरा. खरे शब्द ओठांवर यायला लागले, की मग आपलं ‘सख्खं’ वास्तवसुद्धा नाराज व्हायला लागतं. हे मात्र जास्त खरं. अशा वेळी जीवनाची व्याख्या निश्चित करणं अधिकच गरजेचं बनतं.

एखादी बाब चुकीची असेल तर ती सार्वत्रिक चुकीचीच असते, मात्र असं अनेकदा घडताना दिसून येत नाही… दारू पिणं, सिगारेट ओढणं वा शिव्या देणं जर वाईट असेल तर ही बाब सगळीकडेच समान मानायला हवी. मात्र एखादी मुलगी यातली एखादी गोष्ट करत असेल तर तिच्यासाठी संस्कारापासून परंपरेपर्यंतच्या सगळ्या फूटपट्ट्या सपासप बाहेर काढल्या जातात. हे असंच मुलासाठी वा पुरुषासाठी नेहमीच होतं का…? न्यायाची हौसच असेल तर एक तर तो समान असणं अत्यंत गरजेचं असतं.

अन्यथा दुसऱ्यासाठी न्याय आणि स्वत:साठी मात्र ‘एवढ्या वेळी सांभाळून घ्या’ हा असा विचार साफ अन्यायी असतो. इथं एक बाब लक्षात घेतली पाहिजे, न्याय देणाऱ्यानं तर न्याय समानतेनं दिलाच पाहिजे, पण न्याय मागणाऱ्यानंदेखील स्वत: न्यायी असलंच पाहिजे.