आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाची पतपेढी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिन दिन विज्ञान दिन’ नुकताच साजरा झाला. समाजात विज्ञान विचार रुजावा, म्हणून अशा उत्सवांची जरुरी असते. विज्ञान कसे पुढे जाते, विज्ञान रुजलेले असेल तर संशोधनाला त्याचे काय फायदे होतात, हे जास्तीत जास्त लोकांना समजणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते...
ब्रिटनच्या दक्षिण भागातील ब्रिस्टल शहर व आजूबाजूच्या अ‍ॅव्हॉन परगण्यात 1990मध्ये एका संशोधनास सुरुवात झाली. आज हा प्रकल्प 21 वर्षांचा झाला. काळाच्या सरळ रेषेत तो पुढे चालूच राहणार आहे. 1990मध्ये या भागातील 14500 गर्भार मातांना या प्रकल्पात सामील करून घेण्यात आले. त्यांना होणारी मुले यात सामावली. आज ही ‘मुले’ 21 वर्षाच्या तरुण-तरुणी झाल्या आहेत.
या संशोधनात भाग घेताना, त्या गरोदर मातांनी 100 पानांची प्रश्नावली भरून दिली हाती. आजतागायत या माता व त्यांची मुले ब्रिस्टल विद्यापीठाशी जोडलेल्या या केंद्रात वेळोवेळी हजेरी लावतात, संशोधक मागतील ती माहिती आनंदाने व प्रामाणिकपणे देतात.
संशोधन केंद्रात आत जाण्याचा मोठा ‘वॉक इन फ्रिज्’ आहे. तेथे या मुलांच्या जन्मावेळी आलेले नऊ हजार ‘प्लासेंटा’ लेबल लावलेल्या फ्लास्टिक खोक्यात रसायनात तरंगत आहेत. आई मुलांची नखे कापते, अशी पंधरा हजार नखे, वीस हजार बालकेसांचे झुपके, पडलेले दुधाचे दात, सुयोग्य पद्धतीने जतन करून ठेवले आहेत. नखे कापली, केस कापले, दात पडले म्हणजे मुलांचे आईवडील संशोधन केंद्राने दिलेल्या लिफाफ्यात भरून हे सर्व नमुने केंद्राकडे न चुकता पोस्टाने पाठवतात. आपण पाठवलेल्या नमुन्यांचा संशोधनासाठी तसेच पुढील पिढ्यांच्या आरोग्यासाठी उपयोग होणार आहे, याची संशोधनात भाग घेणा-यांना जाणीव आहे. संशोधनातील उमेदवारांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो, याचे हे बोलले उदाहरण आहे.
संशोधनाच्या सुरुवातीला कल्पनाही नव्हती, अशी प्रगती आज जैवतंत्रज्ञानात झाली आहे. त्याचा अमाप फायदा संशोधनाला झाला. आजपर्यंत दोन हजार मुलांचे ‘जिनोम’ जनुकीय नकाशे तयार झाले. गर्भाशयात तसेच बाहेरच्या पर्यावरणात घडामोडी घडतात, त्याच्या रासायनिक खुणा बाळाच्या डीएनए वर उठतात. या खुणांच्या नोंदी म्हणजे, ‘एपिजनेटिक्स’. असे दोन हजार एपिजिनोम्स आज येथे तयार होत आहेत. मुले वाढत असताना शरीरात होणा-या बहुविध नोंदी गेली एकवीस वर्षे ठेवल्या आहेत. याच एपिजनेटिक्सच्या नोंदी. यांचा परस्पर संबंध शोधण्याचे काम आता सुरू आहे. यामुळे वाढ होत असताना शरीरात दिसणारे बदल कसे झाले, यावर प्रकाश पडणार आहे. हा हा म्हणता एकवीस वर्षे गेली आणि माहितीचा मोठ्ठा डोंगर, ‘डाटा’ तयार झाला. तो पाहून संशोधकांवरसुद्धा आश्चर्याने तोंडात बोटे घालण्याची पाळी आली आहे.
मुलांच्या आईप्रमाणे वडलांनीही संशोधनात भाग घेतला आहे. त्यांच्या रक्तातील विविध पेशी जपून ठेवून त्यापासून अमर्त्य पेशींची मालिका ‘सेल लाईन’ तयार झाली आहे. त्याची पेढी तयार झाली. मुलांचे लघवीपासून लाळेपर्यंतचे दहा लाख जैविक नमुने अतिशीत वातावरणात फ्रिजरमध्ये ठेवावे लागतात. फ्रिजरमध्ये थोडा जरी बिघाड झाला, तरी हे नमुने निरुपयोगी ठरण्याचा धोका असतो. त्यामुळे ही फ्रिजर यंत्रणा संशोधकांच्या मोबाइलला जोडलेली आहे. आळीपाळीने हे संशोधक ‘कॉल’वर असतात. अगदी मध्यरात्री जरी मोबाइल वाजला, तरी संशोधक तातडीने केंद्रात हजर होऊन यंत्रणेतील दोष दूर करतात. अत्यंत समर्पक वृत्तीने संशोधकांचे काम चालू आहे.
जगभरचे संशोधक या केंद्रातील माहितीच्या साठ्याचा उपयोग करत आहेत. या माहितीवरून आजपर्यंत 700 शोधनिबंध दर्जेदार विज्ञानपत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. जिन गोल्डिंग या विज्ञानवतीने हा प्रकल्प सुरू केला तेव्हा असे नमुने साठवण्यात काय मतलब आहे, अशी टीका झाली होती. पण आज या प्रकल्पाचे महत्त्व पटले आहे. जिन गोल्डिंग 2005मध्ये निवृत्त झाल्या, तरीही त्या आज बिनपगारी काम करतात.
समवयाच्या लोकगटावरील हे संशोधन. याला ‘कोहार्ट स्टडी’ म्हणतात. या संशोधनाचे स्वरूप ‘बँक ऑफ लाइफ’- जीवनाची पतपेढी असे आहे. या संशोधनातून जसा माहितीचा ओघ बाहेर वाहू लागला, तसा त्याचा प्रभाव जाणवू लागला.
ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्याच्या धोरणावर त्याचा प्रभाव पडला. गर्भार मातांच्या संगोपनात काय काय काळजी घ्यायची, याबाबत नवीन गोष्टी समजू लागल्या. मुले वाढू लागली, कुमार झाली, तरुणाई आली, यामध्ये होणा-या बदलाची, वर्तनाची जैविक कारणे शोधायला या संशोधनाने मदत होत आहे. अतिरक्तदाबापासून अल्झायमर, मधुमेह, कर्करोग अशा विविध रोगांच्या ‘पॉप्युलेशन जनेटिक्स’ म्हणजे लोकसमूहातील आनुवंशिकता शोधायला या प्रकल्पाची मोलाची मदत होणार आहे. या सर्वापासून स्फूर्ती घेऊन नॉर्वेने एक लाख बालकांचा संशोधन प्रकल्प सुरू केला आहे.
या संशोधनातील एमी आज एकवीस वर्षांची. ती तिच्या बेबीला घेऊन केंद्रात आली. एमी म्हणाली, ‘मी जीवनभर यासाठी ‘गिनिपिग’ झाले, आज मी माझ्या बेबीला या केंद्रात ‘गिनिपिग’ म्हणून नोंदवायला आलेली आहे.’
नागरिकांत विज्ञानाची जाण व जाणीव असेल तर असे संशोधन यशस्वी व फलदायी होते, याचाच हा सबळ पुरावा.