आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर्त्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिकासो हा नि:संशयपणे विसाव्या शतकातील प्रतिभावंत चित्रकार. 1881मध्ये तो जन्मला तेव्हा दृकप्रत्ययवाद म्हणजे इम्प्रेशनिझम ऐन भरात होता. ‘इम्प्रेशनिझम’मधील मोठा चित्रकार पॉल सेझान याने मितीबाबत (डायमेन्शन) काही प्रयोग केले. पिकासोने ते पुढे नेले आणि क्युबिझमचा जन्म झाला. स्पेनमध्ये जन्मलेला पिकासो पॅरिसला आला, तेव्हा साधारण विशीत होता. त्याला तिथे जगण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली. 1901 ते 1904 हा कालखंड ब्ल्यू पीरियड म्हणून ओळखला जातो. त्याने या काळात निळ्या रंगाची चित्रे केली. वास्तववादी हुबेहूब चित्र रंगवण्यात तो पारंगत होता, पण चित्रकार म्हणून तो काहीतरी वेगळे शोधत होता. ते त्याला 1907 मध्ये ‘क्युबिझम’मधून गवसले. आपण जेव्हा कुठली वस्तू पाहतो, तेव्हा तिचा दर्शनी भाग दिसतो. मागचा भाग दिसत नाही. एकाच वेळी चेहरा समोरून आणि बाजूने रंगवला तर तो कसा दिसेल, या कल्पनेतून क्युबिझमचा जन्म झाला. पिकासो आणि ब्राक हे दोन्ही चित्रकार क्युबिस्ट शैलीत काम करत. पेपरला पेपर चिकटवून ब्राक काम करत असे, तर पिकासोने त्यात खुर्चीचा बेत व तत्सम पदार्थ मिसळून कोलाजला जन्म दिला. 1907मध्ये पिकासोने केलेले ‘लेस’ दम्वाजेल अ‍ॅवांगन म्हणजे ‘दम्वाजेलच्या वेश्या’ हे चित्र त्याने केले. खरे तर हे चित्र थोडे अपूर्ण आहे, पण या चित्रामुळे खूप खळबळ माजली. पिकासोच्या समकालीन विशेषत: माथिसने टीका केली. यावर खळबळ माजली. असं यात काय होतं? नग्नाकृतीचे दर्शन. हे काही नवीन नव्हते. याचे उत्तर जॉन बर्जर या समीक्षकाने दिले आहे. तो म्हणतो की, सर्वसाधारण न्यूडमध्ये स्त्रीचा चेहरा समोर पाहत नाही तर दुसरीकडे कुठेतरी तो पाहतो. पिकासोच्या या चित्रातील स्त्रिया थेट तुमच्याकडे पाहतात. आव्हान देतात! पिकासोने कारकीर्दीत अनेक अजरामर कृतींना जन्म दिला. त्यातील काही रेखाटने सात-आठ वर्षांपूर्वी मुंबईत आणली गेली आणि ‘ओरिजिनल’ पिकासो इथे लोकांना पाहायला मिळाला. गर्निका हे त्याचे गाजलेले दुसरे चित्र. 1937 मध्ये त्याने ते काही आठवड्यांतच पूर्ण केले. स्पॅनिश यादवी युद्धात, बास्क या राजधानीवर झालेल्या हल्ल्यानंतर रेखाटलेले हे चित्र आहे. प्रामुख्याने वर्तमानपत्राचा कागद, बातम्यांची कात्रणे वापरून काळ्या-पांढर्‍या रंगात कोलाज स्वरूपात त्याने हे चित्र घडवले. पिकासोची ब्ल्यू पीरियडमधली चित्रे संग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पिकोसोचे व्यक्तिमत्त्व वादळी व आवेगयुक्त होते. त्याच्या सुरुवातीच्या कालखंडात गावाकडच्या आठवणी दिसतात. रस्त्यावरच्या सर्कशी, हिंडणारी माणसे, स्पेनमधील डोंगरदर्‍या यांचे चित्रण दिसते. क्युबिझमचा कालखंड सिंथेटिक आणि अ‍ॅनालिटिकल अशा दोन टप्प्यांत विभागता येतो. 1914 नंतर क्युबिझमचा कालखंड क्षीण झाला, पण पिकासोला विषयांची कधी वानवा पडली नाही. स्त्री-पुरुष प्रेम, लैंगिकता हा त्याच्या चित्रातला आवडता विषय. कामप्रेरणा आणि निर्मिती यातील नाते उलगडणारे फ्रॉइडचे लेखन प्रसिद्ध होत असतानाच पिकासोचे अनेक स्त्रियांसोबत संबंध, प्रेम, लग्न, ताटातूट यातून त्याला मूर्त आणि अमूर्त असा आशय गवसत गेला. डोरामार, मॉरी थेरेस या आयुष्यात आलेल्या स्त्रियांची त्याने सुंदर चित्रे काढली आहेत. पिकासोने चार लग्नं केल्याने 1973मध्ये झालेल्या मृत्यूनंतर औरस, अनौरस वारसांनी संपत्तीसाठी आणि चित्रांसाठी एकमेकांवर दावे केले. टाइमने विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट चित्रकार म्हणून त्याची निवड केली. पिकासो आणि माथिस यांच्या चित्रशैलीत आणि प्रकृतीत फरक होता, पण दोघांची कायम तुलना होते. आजही पिकासोच्या चित्रांना जबरदस्त किंमत मिळते. मृत्यूनंतर त्याची लोकप्रियता वाढतेच आहे, पण ‘न्यूयॉर्कर’च्या पीटर शॅजेलसारखे समीक्षक माथिसलाच उजवे मानतात. पिकासोने मोठ्या प्रमाणावर शिल्पही केले. चित्रकलेच्या अनेक प्रयोगांचा पाया घातला. एका अर्थाने अचाट प्रतिभेचा हा चित्रकार विसावे शतक घडवणार्‍यांपैकी एक आहे, एवढे मात्र निश्चित!