आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानोः असहायतेपलिकडचे अदृष्‍य सामर्थ्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या तरुण, देखण्या नायक-नायिकेच्या प्रेमाच्या वाटेतील खलनायक, प्रेमाला विरोध करणारे चरित्र अभिनेते आई-बाप हे अडसर म्हणजे जगातली खूप मोठी दु:खे होत आणि ती दूर होऊन नायक-नायिकेचे मिलन झाले की सगळे आलबेल, असा हिंदी चित्रपटाचा रंजक साचा चित्रपट व्यावसायिकांच्या आणि भारतीय प्रेक्षकांच्याही मनात घट्ट रुतून बसलेला होता, त्या साठच्या दशकात गीताबाली या त्या काळच्या अभिनेत्रीने ‘रानो’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले होते. मुहूर्त झाला. परंतु तिच्या अकाली निधनाने ‘रानो’च्या संकल्पावर पाणी फिरवले. ‘एक चादर मैली-सी’ या राजेंद्रसिंह बेदी यांच्या प्रसिद्ध हिंदी कादंबरीची रानो ही नायिका. गीताबालीचे रानो साकारण्याचे स्वप्न पुरे झाले नाही. 1986मध्ये ‘एक चादर मैली-सी’ आणि असहायतेपलीकडचे अदृश्य सामर्थ्य जपलेली तिची रानो रुपेरी पडद्यावर अवतरली. दिग्दर्शक होते नरेंद्र ढढ्ढा आणि रानो साकारण्याची संधी लाभली होती, हेमामालिनीला.
आर्थिक-सामाजिक हलाखी मानवी संस्कृतीतून आकाराला आलेल्या नातेसंबंधांचीदेखील कशी निर्दय चेष्टा करते, त्याचा दाखला म्हणजे रानो आणि तिच्या धाकट्या दिराची कथा. ‘एक चादर मैली-सी’ ही पंजाबच्या ग्रामीण आणि गरिबीने गांजलेल्या समाजातल्या एका प्रथेवर राजेंद्रसिंह बेदी यांची ही संवेदनशील कॉमेंट होती. त्या समस्येला उत्तर असे नव्हतेच. असलेच तर ते समाजाची आर्थिक हलाखी दूर करण्याच्या अटीवरच मिळणार आणि ती अट आजही पुरी झालेली नाही. मोठ्या भावाचा अकाली मृत्यू झाला, तर तरुण विधवा सुनेचा तिच्या धाकट्या अविवाहित दिराशी पाट लावून देण्याची ही प्रथा ‘चादरडालना’ या नावाने ओळखली जाते. तरुण विधवा सुनेचा पाय इतरत्र घसरू नये, घराची इज्जत घरातच राहावी, दिवंगत मोठ्या मुलाच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष होऊ नये, असे उद्देश त्यामागे असत. धाकट्या दिराचे लग्न दुस-या एखाद्या मुलीशी लावून घरात नवी सून आणली, तर त्यांच्या संसारात विधवा सुनेचे आणि तिच्या मुलांचे लोढणेच होणार, नवी सून ते ओझे उचलताना कुरबुर करणार, घराचे तुकडे होणार आणि विधवा सून, तिची मुले, वृद्ध सासू-सासरा सारेच उघड्यावर पडणार. यावर उपाय म्हणजे ‘चादरडालना’.
कोटला गावातल्या गरीब कुटुंबातली रानो ही सून. साधारणपणे कोणत्याही गावातल्या गरीब घरात सुनेचे जे जीवन असते त्याचेच प्रतिनिधित्व करणारी. दिवसभर घरात राबणारी. सासू कजाग. त्यात वार्धक्यामुळे अंधत्व येऊन अधिकच बिचारा झालेला गरीब बिचारा सासरा. बायकोपुढे त्याचे काही चालत नाही. रानोचा नवरा त्रिलोका (कुलभूषण खरबंदा) घरातला मोठा मुलगा-टांगा चालवून कमाई करणारा. त्याच्या एकट्याच्या कमाईवर घर चालवण्याची जाबाबदारी रानो बिनबोभाट पार पाडते. तिची तक्रार एकच आहे - नवरा रात्री कामावरून परतताना दारू पिऊन येतो, त्याविषयी. दारू ही तिला आपली सवत वाटते. कारण दारूपायी नवरा-बायकोची रोज भांडणे होतात, त्रिलोका रानोला शिरस्त्यानुसार मारहाण करतो. तेही तसे जगावेगळे नाही, कारण दारू पिऊन आले की नवरा बायकोला मारणार, हे समस्त कोटलावासीय स्त्रियांनी गृहीत धरलेले. मात्र रानो अगदीच गप्प बसणारी नाही. ती त्रिलोकाच्या तोडीस तोड भांडते. कधी कधी तिची सरशीही होते आणि त्रिलोका तिची मनधरणी करू पाहतो, ‘मी तुझा गुलाम आहे, तुझा नोकर आहे, म्हणून विनवतो. भांडतानाही अतिरेक करतो आणि प्रेम करतानाही, अशी रानोची त्याच्याविषयीची तक्रार. एकूण दारू सोडली तर रानो वैवाहिक जीवनात समाधानी आहे. गरिबीची सवय आहे, सासू कजागच असणार, तिलाही कधी तरी दोन शब्द सुनवायचे! नव-याच्या दारूबाजीसाठी ती पूर्णपणे नव-यालाही दोष देत नाही. ती बोटं मोडते ती ज्या चौधरी आणि पंडिताच्या - गावातल्या भटजीच्या - नादाला लागून तो दारू पितो त्यांच्या नावानं. नव-यावर तिचं प्रेम आहे, रुसली-रागावली ती त्याच्यासाठी रोटी बनवते. त्याची दारू सुटावी म्हणून नवससायास करते. तो दारू पिऊन आलाय की न पिता हे त्याच्या सुरावरून तीच बरोब्बर ओळखते. नव-यानं आपल्या मरणाचा विचार बोलून दाखवला तर ती घाबरीघुबरी होते. त्याच्याशिवाय तिला ना घरात मान असणार, ना गावात. सवाशीण, मुलांची आई म्हणून तिचा सगळा मान. तेव्हा त्याचं असणं हे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं.
धाकटा दीर मंगल (ऋषी कपूर) रानोच्या समोर लहानाचा मोठा झालेला. दीर-भावजयीचे हे नाते खूप जिव्हाळ्याचे आहे. त्यात छेडछाड, चिडवाचिडवीही आहे. एकमेकांवरच्या अधिकाराची सुखद जाणीवही आहे आणि त्याचबरोबर त्या नात्यानेच विलक्षण नजाकतीने आपली जपणूकही केलेली आहे. दीर-भावजयीचे हे नाते म्हणजे या कथेचा गाभाच. कारण रुजलेल्या सामाजिक प्रथा-परंपरा त्या नात्याचे धिंडवडे काढणार आहेत.
मोठी भावजय आणि धाकटा दीर यांच्यातल्या परस्पर नात्याचा पोत महाराष्‍ट्रात जसा आहे, त्याहून तो उत्तरेत जरा वेगळा आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवे. महाराष्‍ट्रातल्या लक्ष्मणाला सीतेच्या पायातले पैंजण सोडले तर तिचे अन्य दागिने ओळखू येत नसतात. कारण वहिनी त्याला मातेसमान असते. होळी-रंगपंचमीची संधी साधून दीर-भावजयीने एकमेकांवर रंग उधळण्याची प्रथाही महाराष्‍ट्रात नाही. उत्तरेत होळीला दीर-भावजयच हक्कानं एकमेकांवर रंग उधळतात. तिथल्या लोकगीतांतूनही या नात्यातल्या शारीर आकर्षणाचा खट्याळ उल्लेख येतो. या प्रथा-मानसिकतेमागे वर उल्लेखिलेली आर्थिक अगतिकता आधी होती की त्या आर्थिक अगतिकतेवर या खट्याळ, अनिवार आकर्षणात उपाय शोधण्यात आला, हा संशोधनाचा विषय व्हावा.
‘एक चादर मैली-सी’मध्ये सुरुवातीला रानोच्या संसाराचे चित्र प्रस्थापित करताना शेजारच्या खास बायकांच्या अशा समारंभात रानो आपल्या मैत्रिणींबरोबर जे गाणे गाते, त्यात दीर-भावजयीतल्या आकर्षणाचा खट्याळ उल्लेख आहे. ‘मर गई मर गई मर गई नी मैं वहीं पे मर गई’ या गाण्यात नवी नवरी कडव्यागणिक नव-याशी आपले खुलत जाणारे नाते वर्णन करते आणि अगदी शेवटच्या कडव्यात ती, आपण नदीवर अंघोळीला गेलो असताना आपला धाकटा दीर कसा आपल्याला चोरून बघत होता, ते सांगते आणि धमाल उडवून देते. या गाण्याची योजना दीर-भावजयीच्या नात्याचे पदर उलगडून दाखवण्यासाठी आहे, तशीच ती पुढे घडणा-या घटनेला पारंपरिक तर्कसंगती पुरवणारी आहे आणि त्याबरोबरच तिचा शोकात्म रंग अधिक गडद करणारीही आहे.
रानोची लेक गुड्डी तेरा-चौदाची, तर दीर असेल अठरा-एकोणीसचा. अजून आपण कमाई केली पाहिजे, ही जाण त्याला आलेली नाही. गावभर उंडारत फिरायचं, शेतातून फळं चोरून खायची, घरी येऊन हक्कानं वहिनीला रोटी वाढायला लावायची, ती आडवं तिडवं बोलली तरी मायेनं रोटी वाढणारच, कोणी तक्रार करायला आलं तर आपली बाजू घेणारच ही खात्री. दीर-भावजयीतल्या छेडछाडीतही कथाकारानं पुढच्या घटनेकडे इशारा करणारी तत्त्वं पेरली आहेत. मंगल वहिनीला चिडवतो, ‘तुझे और कोई घर नहीं मिला शादी करने के लिए?’ त्यावर ती वरचढ उत्तर देते, ‘घर तो मिल जाता. तेरे जैसा मुश्टंडा देवर कहाँ से मिलता?’ म्हणजे घर-संसार, नवरा यांच्या बाबतीत पर्याय चालला असता, पण दीर जणू हाच हवा? काही तरी खास आहेच या नात्यात. ‘एक रोटी और थोडा-सा प्याज़’ मागताना दीर जाणून बूजून ‘प्याज़’ऐवजी ‘प्यार’ म्हणतो; ते वहिनीला चिडवण्यासाठी. मग म्हणतो, ‘जो प्यार मिलना था वह सारा बचपन में मिल गया, अब तो वह सारा उस दारूवाले की किस्मत में है.’ ती त्याला, ‘खबरदार, उसे दारूवाला कहा तो’ म्हणून उत्तर देत नव-याची बाजू घेते. आणि नंतर दारू पिऊन आलेल्या नव-याशी यथास्थित भांडते, मारही खाते. भांडण इतके विकोपाला जाते की, रानो घर सोडून जाऊ लागते. गावात कुठे आसरा नाही मिळाला, तर धर्मशाळा आहे ना, म्हणते. त्या क्षणी त्रिलोका नरमतो. चौधरीच्या धर्मशाळेचे छुपे वास्तव त्याला चांगलेच माहीत आहे. देवीदर्शनासाठी कोटलाला येणा-या यात्रेकरूंना आणून धर्मशाळेला गि-हाईके मिळवून देणे, ही या टांगेवाल्याच्या धंद्यातली बरकत. असहाय स्त्रियांचा गैरफायदा चौधरी आणि भटजी घेत असतात हेही त्याला ठाऊक आहे, कारण एकट्या, असहाय मुलींना स्टेशनवर हेरून साळसूदपणे धर्मशाळेत चौधरी आणि भटजीपर्यंत पोहोचवण्याचे काम तो करत असतो. अशाच एका प्रकरणात त्याचा खून होतो आणि रानो विधवा होते...
आजवर बेजबाबदारपणे उंडारणारा मंगल आता घराची जबाबदारी उचलतो. टांगा चालवू लागतो. टांगा हाकणा-या मंगलच्या जागी क्षणभर रानोला त्रिलोकाचा भास होतो. विधवा रानो दु:ख गिळून घरात राबत असते, कर्त्या मुलाच्या मृत्यूमळे सासूची कडू जीभ आणखी काटेरी झालेली असते. रानो तीही सहन करत असतेच. मंगल टांगा चालवून घरी पैसे आणतो. मुले मोठी होणार असतात, मंगलकाकाने आपल्या लाडक्या पुतण्या-पुतणीची जबाबदारी उचललेली असते. हे असेच रेटता येणार असते - किमान मंगलचे लग्न होऊन नवी सून घरात येईपर्यंत तरी. परंतु त्रिलोका चौधरीसाठी दलाली करून मुली पुरवायचा, असा आरोप करणा-याशी मंगलची मारामारी होते आणि मंगल काही दिवसांसाठी तुरुंगात जातो. घराचा उरलासुरला आधारही संपतो. उधारी मिळेनाशी होते, सासू आणखी करवादू लागते. सून घर चालवायला धडपडते आहे, हेही ती कधी लक्षात घेत नाही. वयात येणा-या मुलीविषयीची काळजी रानोचे काळीज पोखरत असते, त्याचीही भर पडते. ती पोरीला सुनावते, ‘तू अब बच्ची नहीं रही... और सुन, महिने के दिन याद हैं न? एक दिन भी आगे पीछे हुआ तो मैं तेरी जान ले लूँगी, अपने हाथों तेरा गला घोंट दूँगी।’ पण नंतर ती तिला पोटाशीही धरते. त्यातच धाकट्याला टायफॉइड होतो. सासू रानोला घराबाहेर काढू पाहते, तेव्हा आधी ती हट्टीपणे ‘मैं इस घर की बहू हूँ’ म्हणत आपला अधिकार सांगू पाहते. पण सासू ऐकत नाही. तेव्हा मात्र रानो आक्रोश करते. ‘क्या नहीं किया इस घर के लिए? सुबह सवेरे चक्की की तरह पिसी हूँ, अपना खून बहाया है इस घर के लिए। बेटी नहीं जनी इस घर के लिए? बेटा नहीं जना? इसका यही इनाम मिला है।’ त्यावर सासू इतकेच म्हणते, ‘औरत मर्द की होती है।’ नवरा नसेल तर बाईला घरात काही स्थान नाही, असा त्याचा अर्थ. त्यावरचा रानोचा चडफडाट आहे तो म्हणजे रानो समाजाच्या ज्या स्तरात जगते आहे, त्या स्तरातील स्त्रीकडून किमान शब्दांत तरी व्यक्त न होणारा असा आहे. त्यामुळे रानो इथे वेगळी उठून दिसते. मात्र ही तिची विधानं तिची म्हणावीत की लेखकाच्या जाणिवेतून आलेली? ती म्हणते, ‘हाँ हाँ, औरत का क्या है? बेटी तो किसी की, बीवी तो किसी की। अपना क्या है उसके पास? न बाप का घर, न पति का घर।’’ तिला समजून घेणारा दीरच आहे. एव्हाना तो तुरुंगातून सुटून आला आहे.
तरी ती म्हणजे, कोणी असामान्य स्त्रीरत्न नव्हे. सासू तिच्या मुलीला लग्नाच्या मिषाने विकू पाहते, तेव्हा रानोमधली आई वाघीण बनून सासूला पळवून लावते खरी, पण आपल्या परिस्थितीपायी गुड्डीला -आपल्या लेकीला- निर्माण झालेल्या धोक्याची जाणीव होताच ती उलटसुलट भावनांच्या भोव-यात सापडते. सासू कधी दावा साधेल याचा नेम नाही, गुड्डी मोठी होत चाललेली, तेव्हा लवकरात लवकर तिचे लग्न करून दिले पाहिजे, पण लग्नासाठी पैसे कुठून आणायचे? मग स्वत:ला चौधरीच्या हाती विकून पैसे मिळवण्याचा विचारही तिच्या मनात येतो. चौधरी हा गावातला पैसेवाला आणि कुकृत्ये करणारा. तेव्हा स्वत:ला विकायचे तर त्याच्याकडेच जायला हवे, म्हणून तिला चौधरी आठवतो. पण दुस-याच क्षणी आठवते, चौधरी तर तुरुंगात आहे. पुन्हा हतबलता. पुढच्याच क्षणी ती पुन्हा वेगळ्या विचाराच्या लाटेत गटागंळी खाते. गुड्डीच्या नशिबात विकले जाणेच असेल तर मग आपणच विकावे तिला आणि चांगली भरगच्च किंमत वसूल करावी, मग तिला रोज रोज विकावी, म्हणजेच धंद्यालाच लावावी, असेही विचार येतात आणि डोळ्यापुढे जे चित्र उभे राहते त्यात ती स्वत:ला धर्मशाळेच्या दारापाशी गुड्डीला चौधरीकडेच सोपवताना पाहते. या भिरभिरण्यात चौधरी तुरुंगात असल्याची गोष्ट ती पुन्हा विसरते आहे. चौधरी म्हणजे अशा कुकर्माचा प्रतिनिधीच झाला आहे तिच्या मनात आणि धर्मशाळा हे कुकर्माचे आगर. क्षणभर ‘इज्जत नसली तरी पैसे तर असतील खूप’ असा विचारही तिच्या मनात आलेला आहे. टोकाच्या आर्थिक अगतिकतेतून मनात उठलेले हे वादळ आहे. ती स्खलनशील आहे आणि स्खलनाच्या काठावर येऊन परतते, म्हणून तिचे चारित्र्य अधिक उजळून निघते. मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’मध्येसुद्धा अन्नावाचून तडफडणा-या आपल्या लेकरांसाठी राधा(नर्गिस)मधील आई क्षणभर सावकाराच्या स्वाधीन होण्याची तयारी करते आणि दुस-याच क्षणी सावरते.
तिच्याविषयी सहानुभूती असणारी तिची शेजारीण तिला दिराशी लग्न लावण्याचे सुचवते. प्रथा आहे, पण तत्काळ रानो ती कल्पना झटकून टाकते. मात्र त्यानंतर तिची मंगलशी वागणूक बदलू लागते. ती पूर्वीसारखे मोकळे राहात नाही. आता पूर्वीच्या निरागस छेडछाडीत तिला वेगळेच वास येऊ लागतात. मंगलची पतीच्या रूपात कल्पना करणे तिला सहन होत नाही आणि ती मंगलशी तुटकपणे वागू लागते. मंगलला काहीच बोध होत नाही. मंगलच्या मनात वहिनीविषयी जुनीच भावना आहे. शिवाय तो त्याच्या वयाच्या एका बंजारन मुलीतही गुंतला आहे.
घरातल्या परिस्थितीत ‘चादर डालना’ हा एकमेव उपाय असल्याचा गावपंचायतीचा दबाव वाढू लागतो. मंगलला अर्थातच धक्का बसतो, तो परिस्थितीपासून पळू पाहतो. रानोला तर पळताही येत नाही. ती पूर्वी नव-याशी, सासूशी प्राणपणाने भांडली होती. आता युगानुयुगांच्या प्रथेविरुद्ध तिला भांडताच येत नाही. अगतिक, दिङ्मूढावस्थेतल्या रानोवर आणि गावक-यांनी पकडून, मारून जवळजवळ बेशुद्धावस्थेतच आणलेल्या मंगलवर ‘चादर टाकली’ जाते. आणि क्षणात एका वेगळ्या नात्यावर शिक्कामोर्तब होते. आजवर वहिनीशी असलेल्या दिराच्या खट्याळ-निरागस नात्याचा लोकपरंपरेच्या हस्ते खून होतो. मंगलच्या तरुण स्वप्नांचा चुराडा होतो. रानोची वयात आलेली मुलगी गुड्डी हा प्रकार आणि आई-काकाचे हे नवे नाते स्वीकारू शकत नाही आणि ती बिथरते.
मंगल घरातून निघूनच जातो आणि घरावर पुन्हा उपासमारीची वेळ येते. म्हणजे कितीही नको असले तरी हे नाते स्वीकारणे ही घराची कशी गरज असते, हेच पुन:पुन्हा अधोरेखित होत राहते. घरात कमावणारे कोणी उरत नाही, तेव्हा कमाई करण्यासाठी बाईने घराबाहेर पडण्याची परंपरा नसतानाही रानो बांधकामावर मजूर म्हणून जाते. आपल्या लेकरांचा विचार करून! कामावरचा मुकादम तिची छेड काढू पाहतो तेव्हा मात्र मंगल धावून येतो. कोणत्याही नात्याने तो अशा वेळी धावून आलाच असता. परंतु ही वेळ रानोवर का आली, ते समजून आता तो घरी परततो, घर चालवू लागतो. रानोशी संसार ही आता काळ्या दगडावरची रेघ आणि बंजारन राजी(पूनम ढिल्लाँ)शी संसार थाटण्याचे स्वप्न विसरून जायला पर्याय नाही, हे तो वैफल्यग्रस्त होत का होईना, मान्य करतो. मात्र दारू पिऊनच घरी येतो.
रानोचा त्याला रोटी देतानाच सूर त्रिलोकाला रोटी देतानाच्या सुरापेक्षा वेगळा आहे, मऊ, सहानुभूतीने भरलेला आहे. ती मंगलला समजावते, ‘यह मत समझना तेरे दिल की बात मैं नहीं समझती। जो तू महसूस कर रहा है, उसी बात का बोझ मेरे दिल पर भी है। मैं एक औरत हूँ... तू तुझा राग जेवणाच्या ताटावर काढलास, मी कोणावर काढू? जबरदस्तीनं माझं लग्न लावणा-या गावक-यांना शिव्याशाप देऊ की सासू-सास-याला मारू?’ ती त्याला नवे नाते मानण्याच्या बंधनातूनही आपल्यापुरतं मुक्त करते. फक्त एकच मागणे मागते ते त्याने दारूत स्वत:ला बुडवून घेऊ नये असे. कारण ‘इस घर को तेरी ज़रुरत है’ - म्हणजेच पुन्हा गोष्ट फिरून येते ती या कुटुंबाच्या आर्थिक अगतिकतेची. त्या अगतिकतेपायी मंगलला तिने दिलेल्या स्वातंत्र्याला अर्थच नाही. परंतु, समाजाने देऊ केलेले नात्याचे लेबल मंगलला स्वीकारावेच लागते. रानोलाही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ते नाते स्वीकारावे लागते. ती ते अधिक समजूतदारपणे स्वीकारते, तेही ती मंगलविषयी पूर्ण सहानुभूती बाळगून.
मुलीला मागणी घालायला आलेला सुसंस्कृत मुलगा हा आपल्या नव-याचा खुनी आहे, हे पाहताच रानो अस्वस्थ होते. मंगलला ते कळताच तो भावाच्या खुनाचा बदला घेऊ पाहतो. तो पश्चात्तापदग्ध तरुण त्यांच्यापुढे सत्य ठेवतो आणि मंगलला शांत करतो. पण प्रत्यक्ष रानो आपल्या नव-याच्या खुन्याला जावई म्हणून स्वीकारणार आहे का? शेवटच्या दृश्यात रानोमधली आई विचारीपणे तरुणाला स्वीकारते, त्याला आणि मुलीला जवळ घेते, तेव्हा तो मिडशॉट तिचे विचारी आईपणच अधोरेखित करतो. मंगलही तिच्यातल्या त्या आईपणाच्या सामर्थ्याकडे पाहात राहतो... प्रथेने लादलेल्या विचित्र नात्याची तक्रार करत तडफडण्यापेक्षा महत्त्वाचे असते, ते विचारी आईपण! सुंदर नात्याची शोकांतिका करणा-या पण अगतिकतेतून सुरू झालेल्या प्रथेवर भाष्य करता करता ‘एक चादर मैली-सी’ हा चित्रपट रानोच्या रूपातल्या स्त्रीच्या दशांगुळे उरून राहणा-या समर्थ आईपणापाशी येऊन थबकतो. परिस्थिती आणि प्रथा - दोघी रानोची कोंडी करतात, पण तावून सुलाखून निघत रानो आपले सामर्थ्य सिद्ध करते. चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यावरची देवीमातेची यात्रा हा चित्रपटाला लोकप्रिय ‘अपील’ मिळवून देण्यासाठी वापरलेला घटक होय. परंतु रानोच्या रूपातल्या देवीमातेशी त्याचा संबंध आहेच. तो स्पष्ट व्यक्त केलेला नाही. तरी अखेरच्या दृश्यात त्या तरुण देवीभक्ताच्या आणि मंगलच्याही डोळ्यात तो दिसतो. अखेरच्या शॉटमध्ये रानोची शांत, साधी मुद्रा स्क्रीन व्यापते, त्या व्याप्तीतही देवीमातेशी रानोचे सायुज्य सिद्ध होते.