आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नी परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कित्येकदा आपणास प्रश्न पडतो की मी इतकं कमी खाते तरीही माझे वजन वाढतच चालले आहे. सोबत मनात अजून एक विचार येतो की अमुकतमुक किती खातो दिवसभर अक्षरश: चरतो, तरीही दिसतो कसा वाळकी काडी, कसं असेल बुवा असा विचार करून आपणच आपल्या शरीराला दोष देतो, पण असं आपल्या शरीराला दुषणं देत बसण्यापेक्षा त्यामागे काय आयुर्वेदिक तर्क आहे. याचा थोडा अभ्यास करूया म्हणजे खरी काय परिस्थिती आहे ते आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदानुसार अग्निपरीक्षा ही एक महत्त्वाची परीक्षा आहे. कारण, अग्निमांद्य हे सर्व रोगांचे मूळ कारण असते. चिकित्सा करताना अग्नीचा प्रामुख्याने विचार केला जातो. आणि त्यानुसार व्याधीची चिकित्सा ठरवली जाते.


अग्निपरीक्षा करताना जीर्ण आहाराची लक्षणे बघितली जातात. जसे शुद्ध ढेकर-स्वच्छ येणे, उत्साह वाटणे, मलमूत्रादी वेग योग्य वेळी व योग्य प्रकारे येणे, भूक व तहान चांगली लागणे व शरीर लाघव म्हणजे हलके आणि प्रसन्न वाटणे, ही आहाराची पूर्ण पचन झाल्याची म्हणजे जीर्ण आहाराची लक्षणे आहेत. अग्निपरीक्षा करत असताना अग्नीचे चार प्रकार दोषांच्या कमी अधिकतेने सांगितले आहेत. मंद अग्नी, तीक्ष्ण अग्नी, विषम अग्नी, समाग्नी. काही व्यक्तींमध्ये पचायला जड आणि अधिक प्रमाणात आहार घेऊनही त्याचे पचन फार चटकन होते. थोड्याच वेळात त्यांना भूक लागते. अशा व्यक्तींना भूक मुळीच सहन होत नाही. पित्त प्रकृतीमध्ये तीक्ष्ण अग्नी असते, पण या व्यक्ती किरकोळ प्रकृतीच्या किंवा मध्यम शरीरी असतात. अधिक आहार घेत असूनही हे घडते. तीक्ष्ण अग्नी असताना आहार लवकर पचतो. आहार द्रव्यावर अग्नीची प्रक्रिया फार थोडा काळ घडते. त्यामुळे सार भाग (शरीरास पोषक भाग) कमी व मल भाग अधिक निर्माण होतो. यासाठी अशा व्यक्तीस अधिक मात्रेत मल हे लक्षण आढळते. काही व्यक्तींमध्ये लघुगुणांचा म्हणजे पचायला जड आहाराचे सेवन केल्यास आमाची म्हणजे अजिर्णाची लक्षणे सुरू होतात. साधारणत: कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये मंदाग्नी असतो. अशा व्यक्ती कमी मात्रेत आहार घेतात तरीही त्याचा उपचय चांगला असतो. व्यावहारिक भाषेत आपण म्हणतो ना थोडेसेही खाल्ले तरी छान अंगी लागते, तेच हे उपचय! अशा व्यक्तींमध्ये आहार पचवण्यास अधिक वेळ लागतो. जास्त वेळापर्यंत आहार जठरात राहिल्याने अग्नीचा संस्कार आहारावर अधिक वेळ होत असल्याने घेतलेल्या आहारापासून सारभाग अधिक प्रमाणात निर्माण होतो व साहजिकच अधिक उपचय होतो. विषमाग्नी असणा-या व्यक्तींमध्ये मात्र खूप विचार करावा लागतो. कारण, काही वेळा गुरू म्हणजे पचायला जड आहार अधिक प्रमाणात घेतला तरी उत्तम प्रकारे पचतो. तर काही वेळा अल्प लघु आहारही नीट पचत नाही. समाग्नी सर्वात उत्तम. कारण, ज्यांचा समाग्नी असतो त्यामध्ये घेतलेले आहाराचे प्रमाण व त्यांचे स्वरूप यावर पचन काळ अवलंबून असतो.


पचायला जड व अधिक मात्रेत घेतलेला आहारही व्यवस्थित पचतो, पण त्यात वेळ अधिक लागतो. आणि पचायला हलका आहार कमी मात्रेत घेतलेला आहार चटकन पचून लवकर परत भूक चांगली लागते. मात्र, आहार घेतला नाही तर तीक्ष्णाग्नीप्रमाणे भूक सहन न होणे इत्यादी लक्षणे उत्पन्न होत नाही. तर आले ना लक्षात काय असते, हे अंगी लागणे. आरोग्याचा खेळ अग्नीवर अवलंबून असतो. म्हणूनच आपला अग्नी कुठल्या प्रकारचा आहे याचा विचार करून आहार सेवन करा.