कोल्हापूर - कालबाह्य परंपरा, जुन्या रूढी व रीतिरिवाज आता बदलत आहेत. स्त्रियांची वेशभूषा, केशभूषा, आहार, खाणं-पिणं, दैनंदिनी यात एक प्रकारचं नावीन्य आणि आधुनिक ट्रेंड येत आहे. स्वयंपाकघराचा ‘लूक’ बदलत असून किचनवेअर्सची रेलचेल आणि सपोर्ट सिस्टिमची मदत घेणा-यांची संख्या वाढत आहे. भौतिक साधने, सुखसोयी स्वीकारल्याच ना स्त्रियांनी. मग आता नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जुना का? विशेषत: सासूविषयीची मतं बदलायला नकोत का? की साप-मुंगूस अशी दुश्मनी चालू ठेवायची पिढ्यान्् पिढ्या? नव्या तरुण सुनांनी आता समंजसपणे विचार करायला हवा. खाष्ट, पाताळयंत्री, छळवादी, मत्सरी, डँबिस अशासारखी ‘लेबलं’ लावण्याजोगी खरोखरच सासवांचे वर्तन/ वृत्ती आहे काय, हे तपासून पाहायला हवं आणि स्वत:लाही तपासायला हवं.
हल्लीच्या कौटुंबिक मालिकांमध्येही सासूमंडळी अगदी मोकळ्या, सर्वसाधारण नि माणुसकीकडे वळलेल्या दाखवण्यात येत आहेत. सुनेला मुलगी मानून शिक्षणास उत्तेजन, उद्योग-व्यवसायाची प्रेरणा, घरकामात हातभार, कमावतीला सन्मान देणारे वर्तन करणा-या सासवा दिसत आहेत. या ‘भूमिका बदला’पासून तरुणी काही शिकणार का?
पृथ्वीच्या पाठीवर सर्वाधिक द्वेष, आकस सोसावा लागणारा प्राणी म्हणजे सासू. एकदा कानफाट्या नाव पडलं ते पडलंच. कपट कारस्थानं करणारी, दुष्ट, कजाग बाई म्हणजे सासू. ती सदैव सुनेच्या वाईटावरच टपून बसलेली असते. सुनेला छळणं याचाच ध्यास नि क्लृप्त्या, युक्त्या करणारी अशी पारंपरिक समजूत. पण हा भूतकाळ म्हणून सोडून द्यायला हवाच ना. आता काळ बदलला. सासवा बदलल्यात. शरीर-मनाने तंदुरुस्त. वागा-बोलायला ‘मॉडर्न’ असणा-या सासवांचा जमाना आलेला असताना, सुनांनी का बरं जुनीपानी दुखणी उगाळत बसावं? सुनांनी समजून घ्यावं आणि सासूंच्या ‘एनर्जी’चा वापर, त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, उत्साही वृत्ती
आपल्याला मदतगार आणि ‘सुलभक’ (फॅसिलिटेटर) म्हणून उपयोग करून घ्यावा म्हणजे दोघींमधील आंतरक्रिया व सुसंवाद नक्कीच वाढेल. संवादी नातं हवं दोघींमध्ये, त्यासाठी स्वत: मोकळीक घ्यावी वागण्याची आणि सासूलाही मुभा द्यावी वागण्या-बोलण्याची. एकदा परस्परावलंबी, एकमेकींना पूरक व पर्यायी नातं विकसित व पुढे घट्ट होत गेलं की, गैरसमजाला थारा उरत नाही. कमावतीला तर सासूचं ‘असणं’ हेच मुळी निर्धास्तपण देणारं. सासू अशा सुनांसाठी ‘अॅसेट’ ठरते. म्हणून हवं तेव्हा, हवं तसं, हव्या तेवढ्या मर्यादेपर्यंतच सासूचा हस्तक्षेप हवा असा शिरस्ता कसा चालणार? होणारच ना कुरबुरी, नि घर सासूच्या तेवढा वेळ ताब्यात. मग नवरा, नातवंडं, येणारी जाणारी यांची ऊठबस करणारी थोडेसं स्वातंत्र्य घेणारच. कामावरून घरी आल्यावर सासूचं ऑडिट करणं कितपत उचित? सबुरीनं, मार्दवानं पोटात शिरून बोलून गर्भित (धमकी नव्हे) अशा सूचना कधी तरी करणं क्षम्य आहे. अपेक्षापूर्तीच्या कसोटीस उतरलं, की सगळं सोपं होऊन जातं.
सुनेने सन्मानाने, आदराने वागवावे, ही सासूची अपेक्षा. हल्ली सासू सुनेने शिक्षण, करिअर, छंद ठेवावेत चालू पूर्वीप्रमाणे, असा आग्रह धरते. घरसंसार सावरायला सासवा खानावळ, भाजीविक्री, पोषण आहार, अन्न शिजवणं वगैरे उद्योग व्यवसायात मदत करताहेत सुनांना ग्रामीण भागात. हे सुखद चित्र आणि तसा अनुभव पाहून वाटतंय, सासू बदलायला तयार आहे मनाने, तनाने तर या लवचिक मानसिकतेचा धाग पकडून सुनेनेही बदलायला हवं. आदर द्या, सन्मानित करा, गोड बोला, क्रेडिट द्या आणि स्तुती करा की सासवांची. काय हरकत आहे? सुनांनी आता बदलायला हवं.
नवरा नक्की कोणाचा? आईचा की बायकोचा? मालकी हक्काच्या भावनेने ठासून भारलेल्या सासू-सुनांनी एक पक्कं ठरवावं. ‘माझा-तुझा’ अशी वाटणी न करता दोघींचा मानावं. मुळातच लाडाकोडात वाढवलेला, कष्ट करीत मोठा केलेला मुलगा इतके दिवस फक्त आपला, आता त्याची बायको आल्यावर एकदम तिनं तोडून पळवला तर, ही भीती असणारच. सुनेने ओळखून संयम, सबुरी व समजूत घेत वागावं. तरण्याताठ्या सुनेला नवरा किती मोलाचा, हे सासूनेही समजून घ्यावे. नीट विचाराने, समजुतीने वागा.
तूच अॅडजस्ट कर असा हेका व तसा ठेका सुनेने धरायला नको. शिवाय पाहिजे तेव्हा ताणायला आणि नको तेव्हा आक्रसायला घरातली सासू म्हणजे रबर बँड आहे का? कसलाही दोष नसताना दोन बायकांच्या भांडणात फरफटणा-या एकीकडून आई आणि दुसरीकडून बायको अशा भीषण कात्रीत सापडलेलया गरीब बिचा-या पुरुषाचं काय? मग तो तिसरीच्यात गुंतत गेला तर... तेव्हा ‘तुमच्यासाठी काय पण...’ असं केवळ म्हणत राहणं नको. नवरा हे आपलं माणूस आपलंच राहायचं. नंतर सासूलाही आपलं म्हणणं घडावं. अर्थात सासूकडेसुद्धा समज हवीच. मात्र, सुनांकडून विचाराने प्रगल्भ, वर्तनाने विवेकी, वृत्तीने संयमी वागणं व्हावं!