आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाबडेपणापेक्षा निडरपणा हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप सेन्सिटिव्ह, अधिक संवेदनक्षम, नको तितकी मानवता, गरजेपेक्षा व गरज नसतानाही मदतीला धावून जाणं अशी नारी-गुणी मानसिकता असलेल्या स्त्रिया अजूनही संख्येने खूप आढळतात. त्यामध्ये गृहिणी व कमावती या दोघींचाही समावेश आहे. भाबडेपणा, इतरांच्या बोलण्यात लगेच येणं, स्तुती आवडणं आणि ती करणार्‍यांच्या ऋणात, प्रेमात राहणं असा स्वभाव असणार्‍या स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक असतात. एवढं साधं, भाबडं राहण्यातून त्यांना बळीचा बकरा व्हावं लागतं. तसं तर नवरा व सासू यांच्या वादात अगदी हिरीरीने सासूची बाजू घ्यायची. का कशासाठी? तर नवर्‍याला मोठं करण्यासाठी कष्ट केले पूर्वायुष्यात म्हणून उतराई भावनेने व दुसरं म्हणजे नवरा आपलाच, पण सासूची बाजू घेण्यामुळे ती खुश होईल असाही विचार. वास्तविक एखादी बाई या वादात न पडण्याचं ठरवून गप्प राहील; पण भाबड्या बायकांना ही नसती उठाठेव कशाला, असे नाही वाटत. त्यामुळे नवरा दुखावला जातो. अबोला िन पुढं ताणतणाव.

स्त्रियांची एखाद्या/ एखादीवर पटकन विश्वास टाकण्याची वृत्ती बर्‍याचदा घातक ठरते. आपल्या वाचनात आलेल्या बातम्यांवरून ते लक्षात येते. उदा. घरात पुरुष नसताना दागिन्यांना पॉलिश करून देतो म्हणून फसवणारा भामटा व त्याच्यावर विश्वास ठेवून फसणार्‍या स्त्रिया. पैसे दामदुप्पट करून देण्याची हमी देत हातोहात पैसे लंपास करणारे बदमाश बहुतेक वेळा स्त्रियांनाच गाठतात व त्या भरीस पडतात. पोलिस आहे असे सांगून असे खोटेच सांगून, दागिने काढून माझ्याजवळ द्या म्हणून ते घेऊन पसार होणारे चोरटे व त्यांच्या कारवायांची शिकार होणार्‍या स्त्रिया. अशा सगळ्या घटना कशाचे द्योतक आहेत? तर पटकन विश्वास, चटकन सांगेल ते ऐकणे आणि घरच्यांना अंधारात ठेवून काही तरी मिळविण्याचा मोह या स्त्रियांच्या गुणांचे ते द्योतक आहे.

हल्ली तर स्त्रियांच्या अंगावर दागिने घालण्याच्या वृत्तीमुळे त्यांची असुरिक्षतता वाढत आहे. गळ्यातील मंगळसूत्र, चेन, हार, बोरमाळ अशासारखे दागिने खेचून नेणार्‍या तरुण चोरांचा धुमाकूळ चालू आहे. हे सगळे वर्तमानपत्रे, टीव्हीवरील बातम्यांमध्ये वाचायला, ऐकायला मिळते तरीही गळ्यातले दागिने घालण्याची स्त्रियांची हौस, मोह नाही सुटत. हे सगळं कसं? तर माझ्या गळ्यातलं नाही चोरणार कोण, मी नाही त्यात सापडणार नि त्यांच्या हाती लागणार, असा भ्रम अनेक जणींना, म्हणूनच चोरट्यांचे फावते. अनेकदा सहकारी गोड बोलून स्वत:चे काम स्त्री कर्मचार्‍यावर ढकलून मोकळे होण्यात पटाईत. तसेच बॉसचे बॉसिंग सोसायचे असते ही स्त्रियांची भूमिका. हे ‘असेच’ चालते हे डोळे झाकून, मेंदू रोखून वागणार्‍या व स्वीकारणार्‍या स्त्रियांना सोसत राहावे लागते हे नक्कीच. अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनासुद्धा जवळिकीने वागवतात. हे ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यू चांगलेच; पण तीच मंडळी अशा स्त्रियांना गृहीत धरतात. शिवाय त्यांची पाठ फिरताच चेष्टा करायला मागेपुढे पाहत नाहीत. नोकरी, चित्रपट मालिकांमध्ये काम, पदोन्नती वगैरेसारख्या कारणांसाठी काही स्त्रिया धडपडणार्‍या. अगदी काहीही करण्याची तयारी ठेवतात; परंतु त्यामुळे होणारी ससेहोलपट आणि अगदी वेळ, पैसा, एनर्जी, घरदार सोडण्यापर्यंत त्यांची मजल जाते. पण एवढं करूनही हाती फारसं काही लागत नाही हा अनुभव असतानाही त्याच मार्गाने जाण्यापासून स्त्रिया स्वत:ला रोखू शकत नाहीत. अगदी स्त्रीत्व समर्पित करण्यापर्यंत काही जणी जातात. तेव्हा वाहवत जाण्यापासून िस्त्रयांनी रोखायला हवं.

क्षेत्र कोणतंही असो, जीवघेणी स्पर्धा, अतोनात अडथळे, नको तेवढी आव्हाने समोर उभी असताना अगदी निर्भयपणे, जिद्दीने त्यास सामोरे जावे लागणार आहे, हे स्त्रियांनी लक्षात घ्यावे. अगदी मनाजोगती भाजी खरेदीपासून ते संसाराची नौका यशस्वीरीत्या तडीपार न्यायची असेल तरीही मनाचा दमदारपणा, निर्णयात ठामपणा, निर्भीडता, भिडण्याचे सामर्थ्य, मागे हटण्यास नकार, परिस्थिती झुकवेल त्याप्रमाणे झुकणे नाकारण्याचा दृढनिश्चय व निग्रह स्त्रियांकडे हवा. परिश्रमाला पर्याय नाही आणि अपमान-अपयशाला भीक घालायची नाही, असा निर्धार हवा. मुळूमुळू रडणारी, हळूहळू चालणारी, वाटेतच डळमळणारी, भावना वेगाने उचंबळून गळाठून जाणारी आणि नाही जमणार अशी नकारात्मकता घेऊन पळणारी कशी भोज्जा गाठू शकणार?

घराबाहेरची आत्यंतिक असुरक्षितता, घरातली कनिष्ठता, करिअरमध्ये दुय्यमपणा सोसण्याच्या संदर्भातील नवे आधुनिक छळ सोसण्याचे सामर्थ्य स्त्रियांमध्ये असतेच. निसर्गानेच ही ताकद स्त्रियांना दिलीय; परंतु सुप्त बळ, दडलेला मनोनिग्रह, छुपी शक्ती, लपलेली आंतरिक धाडसी वृत्ती, अन्यायाचे रूप जाणवून घेण्याची तार्किकता दबलेली, महत्त्वाकांक्षेवर बसलेली धूळ, पंखांवर लादलेलं ‘लोक काय म्हणतील’ याचं ओझं या सगळ्यांमधून बाहेर पडण्याची निडर आणि निर्भय वृत्ती स्त्रियांनी आता दाखवायला हवी. स्त्रियांनो, स्वत:ला ओळखा. लेचंपेचं, मिळमिळीत, गर्भगळीत होऊन आणि राहून नाहीच चालणार. निडरपणा, निर्ढावलेपण, निर्भयी निर्णयवृत्ती हवीच या एकविसाव्या शतकात स्त्रियांकडे. कारण स्त्रिया मागे राहून व ठेवून विकास व आधुनिक प्रगती याची वाटचाल यशस्वी होणार नाही. म्हणून म्हणावेसे वाटते, ‘होऊया निर्भय करारी, घेऊया उंच भरारी.’
लीला पाटील, कोल्हापूर