Home | Magazine | Akshara | Lina hunnargikar writes about dharni-sangrah

धारणी-संग्रह

लीना हुन्नरगीकर, नाशिक | Update - Jun 23, 2017, 03:01 AM IST

राष्ट्रीय पांडुलिपी मिशनने जानेवारी २०१७मध्ये ज्या ‘धारणीसंग्रह’ नामक हस्तलिखिताचे प्रकाशन केले, त्या हस्तलिखिताची लिपी ही नेवारी किंवा नेवा आहे.

  • Lina hunnargikar writes about dharni-sangrah
    राष्ट्रीय पांडुलिपी मिशनने जानेवारी २०१७मध्ये ज्या ‘धारणीसंग्रह’ नामक हस्तलिखिताचे प्रकाशन केले, त्या हस्तलिखिताची लिपी ही नेवारी किंवा नेवा आहे. हे हस्तलिखित कार्यशाळेचे आयोजक आणि TRIBILS चे संस्थापक-संचालक अतुल भोसेकर यांनी मिळविले. सातव्या शतकातील हे ५४१ पानांचे (folios) हस्तलिखित त्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आम्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन, त्यांनी देवनागरी लिपीत लिप्यंतरीत करवून घेतले. प्रस्तुत धारणीसंग्रहाची भाषा ही संकरित संस्कृत आहे. संकरित संस्कृत म्हणजे बौद्धधर्मविषयक तत्त्वज्ञान ग्रंथांतून दिसून येणारी संस्कृत होय, जसे प्रज्ञापारमितासूत्र इत्यादी. धारणी हा शब्द संस्कृतमधील धृ धातूपासून व्युत्पन्न झाला आहे. याचा अर्थ होतो, धारण करणे. धारणी या माणसाचे नैसर्गिक आणि आधिभौतिक गोष्टींपासून संरक्षण करतात अशी धारणा आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत राव्ही. वेंकटरमण रेड्डी नोंदवितात की, धारणींची संख्या ३०० च्या आसपास दिसते परंतु, त्या पाठीमागची मानसिकता मात्र समजून येत नाही. या ग्रंथाचे संपादक भोसेकर असे नोंदवितात की धारणी या संकटातून मार्ग काढून देणा-या मंत्ररूपात मानल्या गेलेल्या आहेत. भोसेकरांनी प्रस्तावनेत महायान संप्रदायातील तांत्रिक परंपरा आणि धारणींविषयक सखोल विवेचन केलेले आहे. बौद्ध संप्रदायातील वेगवेगळे आचार्य धारणींची संख्या भिन्न भिन्न मानतात. याबरोबरच मंत्र हा धारणीचा एक प्रकार आहे अथवा धारणी म्हणजेच मंत्र आहेत असे अभ्यासकांची मतभिन्नता ते नोंदवितात. यात १२६ धारणींविषयी विवेचन केलेले दिसते. तशी सूची ग्रंथ समाप्तीनंतर आपल्याला दिलेली दिसते. तसेच देवी प्रज्ञापारमितेने अशुभाचे निवारण करावे असाही उल्लेख आलेला आहे. अमोघपाणि, अमोघसिद्धी, देवी तारा यांचे उल्लेख प्रस्तुत ग्रंथातून आलेले दिसतात. विश्वकोषातील साळुंखे यांच्या नोंदीवरून असे समजते की प्रज्ञापारमिता हा गुण, धर्मग्रंथ आणि देवता या दोन्ही स्वरूपात महायान पंथात स्वीकारलेली संकल्पना दिसते. तिचे वर्णनही या ग्रंथातून केलेले दिसते. वेगवेगळ्या धारणींसाठी वापरले जाणारे मंत्रही यात अाहेत. प्रमुख बोधिसत्त्वांना नमन, महायानसूत्रांसारखे सूत्र, भगवान् तथागत आणि मंजूश्री यांचा प्रश्नोत्तर रूपाने झालेला संवाद, आयुष्मान् शारद्वत आणि भगवान् तथागत यांचा संवाद आणि त्यातून पुढे येणारा उपदेश, श्रीरत्नगदसिंहसेन, सुभूति यांच्या कथा या ग्रंथात विस्ताराने आलेल्या आहेत. या ग्रंथात प्रज्ञापारमितेतून विस्ताराने सर्व बुद्धधर्म आणि श्रावकधर्माचे ज्ञान होते असे हा ग्रंथ प्रतिपादित करतो. आज हा ग्रंथ लिप्यंतरीत स्वरूपात आहे. त्याचा अनुवादही पुढे होईल आणि त्याचे हे वेगळेपण अभ्यासकांसमोर निश्चितपणे येऊ शकेल. तसेच, या ग्रंथाची चिकित्सक आवृत्तीही उपलब्ध होईल आणि ती सुद्धा अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.

Trending