आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मणरेषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तू राहा कायम बंधनाच्या चौकटीत
कधी उंबरठ्याच्या आड तर कधी ‘लज्जे’च्या व्याखेत
कधी बुरख्यात तर कधी पडद्यात
आणि त्या बाहेर आलीसच तर

कायम राहावंच लागेल तुला लोकांच्या नजरेत!
शतकानुशतके लोटली तरी अजूनही
virtually कायम आहे तुझी लक्ष्मणरेषा
तुझं स्वतंत्र अस्तित्व, तुझी अस्मिता
तुझा जगण्याचा हक्क हा सगळा

कैद करून ठेवलाय सामाजिकशास्त्राच्या पुस्तकात
इथल्या तथाकथित समाजधुरिणांनी
समान न्यायाची आणि समान वागणुकीची वल्गना करणा-या देशात
तू एक product बनूनच जगवली जातेस!
तुझा संघर्ष सुरू होतो अगदी गर्भापासूनच
तिथे तू वास्तव्याला आलीस की तुझं
समूळ उच्चाटन करणारे उजळ माथ्याने
वावरतात समाजात!

पण तू मात्र खाली मान घालूनच जगावं
हाच अलिखित नियम आहे इथचा
तुला देवी बनवून तुझी पूजा करू
आई म्हणून प्रेम करू, बहीण म्हणून जीव लावू
पण एक स्त्री म्हणून कायम कमी लेखतच राहू!
पण तू तोंडातून ब्र ही काढायचा नाही

केलाच प्रयत्न तर तुझी मुस्कटदाबी होईल
त्याला प्रतिकार केला तर हात पाय बांधले जातील
आणि त्याउपर ही उठवलाच आवाज
तर कधी चेह-या वर अ‍ॅसिडचा मारा होईल
किंवा होतील कोयत्याचे वार
किंवा मग सरळ बलात्कार!

म्हणून म्हणतो तू शांतपणे जगत राहा
तुझ्या लक्ष्मणरेषेच्या मर्यादेत
कारण इथच्या मर्यादा पुरुषोत्तमांनी
स्वत:च्या मर्यादा कधीच तोडल्या आहेत!

kapil.ingole@gmail.com