आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिकांचे नवे लेखन : ‘अस्मितेच्या नव्या वाटा’ लवकरच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. डॉ. उत्तम अंभोरे यांचा ‘अस्मितेच्या नव्या वाटा’ या नव्या ग्रंथात मराठी भाषेतील साहित्यप्रवाह, साहित्यसंमेलनाविषयीची स्वतंत्र भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवर लेखकांच्या साहित्यावर समीक्षात्मक भाष्य केलेले आहे.
अस्मितेच्या नव्या वाटा हा समीक्षापर ग्रंथ आहे. वसंत आबाजी डहाके यांच्या मराठी साहित्य आणि संस्कृती या गं्रथावर तसेच वामनदादा कर्डक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर समीक्षात्मक लेख लिहिलेले आहेत. प्रदीप म्हैसेकर यांचा धम्म सांगती बाबा, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ग्रंथावरही स्वतंत्र मांडणी करणारा लेख आहे. अरुण काळे, गजमल माळी, महेंद्र भवरे, प्रतिभा अहिरे, हेमंत दिवटे आदींच्या कविता संग्रहाबाबत प्रगतिशील भूमिकेतून मांडणी करण्यात आली आहे. तसेच साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या मराठी दलित कविता (संपादक : रंगराव भोंगळे) यांच्या ग्रंथावरचे परीक्षणही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय आणि महाराष्टीय परिप्रेक्षात अनेक नवनवे समाजघटक आपआपल्या अस्मितेच्या शोधात आहेत. त्यासाठी प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे या नव्या प्रवाहांना कळून घेत, त्यांच्याविषयीचे भाष्य या गं्रथात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समीक्षेच्या नव्या वाटा हा ग्रंथ कैलाश पब्लिकेशन, औरंगाबादने प्रकाशित केला आहे.
डॉ. उत्तम अंभोरे यांचे ‘पत्ता बदलत जाणारे गनिम’ आणि ‘धगीवरची अक्षरं’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच ‘कसे जगावे, कसे वागावे’ हा कथासंग्रह प्रौढ साक्षरांसाठी प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांचा अमेरिकेतील मूळ रहिवाशांच्या कादंबरी लिखाणावरील संशोधनपर साहित्याचा ग्रंथ आणि डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या गौरव ग्रंथाचे संपादन केले आहे.
डॉ. अंभोरे यांना जगभरातील दलित-शोषित- आदिवासी घटक साहित्याने प्रभावित केले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना साहित्य वाचनाची गोडी लागली. गावकुसाबाहेरचे साहित्य आणि शोषणांचे बळी ठरलेल्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला. वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, केशव मेश्राम यांच्या साहित्यांचा त्यांच्या लेखनावर पगडा आहे. परभणीच्या फूड टेक्नॉलॉजीसाठी प्रवेश मिळत असतानाही साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी बीएला प्रवेश घेतला. तेथे साहित्यावरच अभ्यास केला आहे. त्यानंतर एम.ए. इंग्रजी तसेच पीएच.डी पदवी प्राप्त केल्यानंतर जेईएस कॉलेज, जालना येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
शब्दांकन : दीपक कुलकर्णी