आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्याचा शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्याचा उद्देश काय आहे? आणि मानवी जीवनात त्याचे नक्की स्थान काय? यासंबंधी जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा कला, समाज, संस्कृती आणि संपर्क व्यवहाराच्या विविध कप्प्या-कप्प्यातून ही चर्चा पुन्हा पुन्हा करत राहतो. वाङ्मय का आणि कशासाठी, हा प्रश्नही अनेक वेळा आपल्या मनात उपस्थित होत असतो. साहित्याच्या मूळ प्रेरणा आणि स्वभाव यांविषयी अनेक समीक्षकांनी व अभ्यासकांनी काही चिंतन आणि निष्कर्षही मांडले आहेत. साहित्याच्या विविध व्याख्याही त्यांनी मांडल्या आहेत. या व्याख्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यासंबंधी अनेक मतभेदही आहेत. परंतु हे नक्की की कोणतीही वाङ्मयनिर्मिती ही एक स्वतंत्र रचना किंवा सर्जन असते आणि साहित्यिक हा सर्जक असतो.
काहींना प्रश्न पडू शकतो की ही स्वतंत्र रचना किंवा निर्मिती कोणती? कोणत्या गोष्टींची? कोणत्या मौलिक आविष्कारात ती प्रकट होते, की ज्यामुळे ही गोष्ट फक्त साहित्यिकालाच जमू शकते? रूपवादी साहित्यातून या प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळू शकतील. वास्तववादी साहित्यातूनही कदाचित काही मांडणी केली जाऊ शकेल. तथापि गेली अनेक वर्षे साहित्याच्या माध्यमातून सत्य आणि वास्तव नवीन नवीन रूपातून व्यक्त होत आले आहेत, ही गोष्ट अन्य चर्चांइतकीच महत्त्वाची आहे. विविध ज्ञानशाखांतून जे सत्य समोर येत असते, तेच सत्य नवीन रूपांतून व्यक्त करणे हाच साहित्याचा उद्देश आहे, की साहित्यातून होणारी ही कलात्मक निर्मिती ही पुन्हा नव्या सत्याचीच पुनर्निर्मिती आहे?
अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्यासाठी साहित्यशास्त्राकडे वळावे लागते. कलाकृतींविषयी स्वतंत्र संवेदनात्मक चिंतन, साहित्याच्या नवीन नवीन रूपांविषयीचे सत्य आकलन आणि त्याची शास्त्रीय मांडणी यांमुळे साहित्यशास्त्र ही इतर शास्त्रांप्रमाणेच एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. साहित्य हे स्वयंप्रेरित एक शास्त्रच आहे. साहित्य ही एक स्वतंत्र कलानिर्मिती आहे आणि ती सत्याचा बोध किंवा शोध घेते, पण सत्याचे ते माध्यम किंवा वाहक ठरत नाही. एखादी सत्यघटना पाहणे, अनुभवणे, तिची कलात्मक पातळीवर मांडणी करणे, या तीन गोष्टी भिन्न आहेत. जाणणे आणि पाहणे यातूनच अस्तित्ववादाचा परिणाम अनुभवता येतो.
ज्ञानाची प्रक्रिया समजून घेतानाच आपण विज्ञानाच्या नव्या स्वरूपाकडे जातो. ज्ञानाचाच तो नवा आविष्कार असतो. त्याचप्रमाणे साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात नवीन रूपांचा, प्रतिभेचा, शैलीचा शोध हा साहित्याचा महत्त्वपूर्ण आविष्कार असतो. हा शोध त्या कलाकृतींच्या परावर्तित रूपांचा शोध असतो. ज्ञान-चिकित्सा आणि कला-चिकित्सा यांतून त्याचे यथार्थ, वास्तव स्वरूप आपण अनुभवत राहतो. अशा वेळी या कलेच्या चिकित्सेसाठी बाह्य परिमाणांची गरज राहत नाही. कारण साहित्यकृतीतील कलात्मक विश्वासार्हता अगोदरच सिद्ध झालेली असते. साहित्यकृतीच्या प्रामाणिकतेचा प्रश्न येथे आपोआप निखळून पडतो.
या सर्व चर्चा तार्किक अंगाने अधिक पसरत जाऊ शकतात. शेवटी कलाचिंतन हे साहित्य आणि कला यातील पूर्णत्वाचा शोध घेण्यासाठीच असते. जीवनाची व्यर्थता, रितेपण, भरून काढण्यासाठी साहित्यकला महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ही पोकळी भरून काढणे हेच कलाकृतीचे आणि तिचा निर्माता - साहित्यकार यांचे काम आहे. साहित्याच्या वा साहित्यकृतींच्या या पूर्णत्वाचा शोध, तिच्या रोजच नवनवीन रूपांना, सृजनशीलतेला प्रेरणा देत असतो, चैतन्य देत असतो. पूर्णत्वाचे असे कोणतेही पूर्वनिर्धारित मोजमाप किंवा आदर्श लेखाजोखा समोर असूच शकत नाही. परंतु पूर्णत्वाच्या अंगाने तो प्रवास करत असतो. एखाद्या कलाकृतीचे सामर्थ्य त्यातूनच मोजता येते की, ती पूर्णत्वाच्या किती जवळ पोहोचली आहे. शेवटी सत्य ही पूर्ण संकल्पना नाही. संपूर्ण जीवनाची, वैश्विक अनुभवाची व्यापक समग्रता आणि संपूर्णता जाणून घेणे ही गोष्ट अव्यक्त स्वरूपातच राहते. तरीसुद्धा ती कोणत्या तरी रूपातून व्यक्त होणेही शक्य असते व आवश्यक ठरते. साहित्याची सर्व रूपे, अंगे या अव्यक्त, निराकार रूपांना साकार करण्याचा प्रयत्न करतात. पूर्णत्वाकडे जाणा-या एखाद्या कलाकृतीचा स्वभाव अथवा वैशिष्ट्य हेच त्या कलाकृतीचे मोठेपण सिद्ध करते. प्रत्येक कलाकृती आपल्या आपल्या काळात अशीच संक्रमित होत राहते. साहित्य ही अव्यक्त स्वरूपाची साधना आहे. त्यामुळे महान कलाकृतीत अनेक वेळा असत्यातही सत्याचाच भास होत राहतो. श्रेष्ठ साहित्यिकाची ही एक कसोटी असते. साहित्याचा हा शोध विविधांगाने घेता येईल. साहित्याचे अस्तित्व, साहित्याचा परिणाम आणि साहित्याची प्रामाणिकता हे खूप विस्ताराचे विषय आहेत. तथापि सत्याचा मुक्त शोध घेण्याऐवजी अनेक वेळा ती-ती कलाकृती हेच एकमेव सत्य आहे, असे सांगण्यात सार्थकता मानू लागते, तेव्हा कलाकृतीचे सत्य आकलन आणि सत्याचे कलात्मक आकलन जटिल होऊन जाते. धार्मिक, ऐतिहासिक, चरित्रात्मक कलाकृती सत्याचे आभास निर्माण करतात. मूळ सत्याचे पुनर्सर्जन करताना कोरीव कथात्म रचनेत त्या कलाकृतींचे प्रामाणिकपणही हरवत राहते.