आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature Board For The Linguistic Skills Development

भाषिक कौशल्य विकासाचा ‘ध्यास’ असलेले साहित्य सृजन मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशात गुणवत्तेसाठी नाव असलेल्या झुलाल भिलाजी पाटील (जयहिंद) महाविद्यालयात स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्याचा विकास व्हावा यासाठी मराठी वाङ्मय मंडळ आणि साहित्य सृजन मंडळाची स्थापना करण्यात आली. सन 1983 मध्ये महाविद्यालय स्थापन झाल्यापासून शिक्षणमहर्षी स्व. झेड. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यापैकीच एक म्हणजे मराठी वाङ्मय मंडळ आहे. मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांसह मातृभाषेबद्दलची गोडी वाढावी यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्थापनेपासूनच मंडळाची धुरा प्रा. डॉ. शशिकला पवार आणि प्रा. उषा साळुंखे यांनी सांभाळली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून मराठी विभागाच्या प्रा. अनिता तायडे यांच्याकडे धुरा आली आहे. त्यांना साहित्य-विद्यार्थीप्रिय प्राचार्य पी. एच. पवार, उपप्राचार्या प्रा. शारदा शितोळे, डॉ. व्ही. आर. चौधरी यांचे नेहमीच सहकार्य लाभत असते.


महाविद्यालयीन जीवन म्हणजे केवळ मौजमस्ती असा समज अनेकांचा असतो ; परंतु याच काळात जीवन जगण्याचा मंत्र मिळत असतो. मनुष्याची खºया अर्थाने जडणघडण होते. त्यात समाजात प्रेरणा देणारे काही व्यक्तिमत्त्व असतात. त्यांच्यापासून आपण काही शिकत असतो. हीच शिकण्याची संधी महाविद्यालयातील मंडळाकडून देण्यात येते. वाङ्मय मंडळाकडून साहित्य क्षेत्रासह इतरही मान्यवरांना विविध विषयांवर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात येत असते. याशिवाय कादंबरी, कविता, लेख लिखाणाची गोडी लागावी यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, साहित्यिक चंद्रकांत पाटील यांनी लेखन कौशल्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कादंबरी लेखनाबाबत रंगनाथ पठारे यांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना मंडळामार्फत मिळाला.


व्याख्यान, वादविवाद, वक्तृत्व, निबंध लेखन आदी विविध प्रकारच्या स्पर्धांसह शिक्षक दिन, मराठी मातृभाषा दिवस, संस्कृत दिवस अशा अनेक प्रासंगिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल प्रेम, आत्मीयता वाढावी आणि आपल्या भाषेत विचार मांडताना आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळामार्फत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांना विद्यार्थ्यांबद्दल विशेष आस्था होती. त्यादृष्टीने त्यांच्याकडून मंडळाच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन मिळत गेल्याने नियतकालिकांसह भित्तिपत्रकात विद्यार्थ्यांना लेखनाची संधी मिळते.


मराठी विभागाचे साहित्य सृजन मंडळ
महाविद्यालयातील वाङ्मय मंडळामार्फत वर्षभरात राबविण्यात येणा-या उपक्रमांव्यतिरिक्त केवळ मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विभागाचे स्वतंत्र साहित्य सृजन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच मंडळाचे कार्य सुरू आहे. मंडळातर्फे विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा.आशुतोष पाटील यांचे ‘भाषेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात विद्यापीठ स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. डी. व्ही. अहिरे यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच कथा, कविता, आत्मचरित्र अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. मराठी भाषा दिनानिमित्त एकांकिका वाचन आणि नाट्यछटेचा अभिनव उपक्रम घेण्यात आला. त्यात बहिणाबाई, मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. तसेच पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या ‘स्पंदन ऋणानुबंधांचे’ या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात साहित्य अकादमी, जनस्थान पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि साहित्य संमेलनाबाबतची माहिती मांडण्यात आली होती. त्यासाठी नाट्यशास्त्रात एम.ए. करणारे मुकेश काळे, किरण लद्दे यांचे मार्गदर्शन मिळते. आजकाल मोठ्या प्रमाणावर एफएम रेडिओ, दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमात बोलण्यात येणाºया भाषेमुळे खरी मराठीची माहिती व्हावी, त्यांच्यात भाषिक कौशल्य वाढून त्यांचा विकास व्हावा आदींसाठी उपक्रम राबविण्यात येतात.


‘ध्यास’चा स्त्री-भ्रूणहत्या विशेषांक
महाविद्यालयाकडून ध्यास नावाचे वार्षिक नियतकालिक प्रसिद्ध केले जाते. त्यात वाङ्मय मंडळ आणि साहित्य सृजन मंडळाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. यंदा महाविद्यालयाकडून स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर ध्यासचा अंक काढण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या ध्यास अंकाला सन 2011-12 या वर्षी कविता आणि वैचारिक लेखनासाठी विद्यापीठाकडून बक्षीसही प्राप्त झाले आहे. तसेच मुखपृष्ठही उत्कृष्ट ठरले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक, कविता लेखनाची आवड निर्माण होते.


वाचनसंस्कृती वाढीसाठी भविष्यात उपक्रम
वाङ्मय मंडळ, साहित्य सृजन मंडळाकडून भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीसाठी उपक्रम राबविण्याचा मनोदय मंडळाच्या प्रमुख प्रा. अनिता तायडे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी अग्निपंख, विशाखा अशी काही नामवंत पुस्तके विद्यार्थ्यांना महिनाभर वाचण्यासाठी देऊन त्यावर वस्तुनिष्ठ आधारित प्रश्नांची परीक्षा घेण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.