आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature Board Where Rural Student Become Active

ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना सक्रिय बनवणारे वाङ्मय मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘संवादी’ नावाचे साहित्य भित्तिपत्रक
ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी वाढवून ग्रामीण असल्याचा न्यूनगंड दूर करण्याचे कार्य बारवाले महाविद्यालयातील वाङ्मय मंडळ गेल्या तेरा वर्षांपासून करीत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.


*वाङ्मय मंडळाची वाटचाल
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला वाव मिळावा यासाठी बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील मराठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून 2000 मध्ये या विभागाने मराठी भाषा व वाङ्मय मंडळाची स्थापना केली. या मंडळामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. या मंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव अशी विद्यार्थ्यांची कार्यकारिणी निवडली जाते. निबंध स्पर्धा, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये गुणानुक्रमे स्थान दिले जाते.
* विद्यार्थ्यांमधील सुप्त भावनांना वाव
विभागांतर्गत ‘संवादी’ नावाचे भित्तिपत्रक चालवले जाते. या भित्तिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त भावनांना वाव दिला जातो. तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जयंतीनिमित्त अंक प्रकाशित केले जातात. यासाठी डॉ. उद्धव थोरवे, प्रा. व्यंकट कोरे मार्गदर्शन करतात. याशिवाय या विभागांतर्गत अधिकाधिक मुलांना सहभागी करून घेत साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना जीवनाविषयी माहिती मिळावी, तसेच सामाजिक दायित्व, कर्तव्य याची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
* हे राबवले उपक्रम
उपक्रमात मराठी व इंग्रजी संभाषण कौशल्य, माहितीचा अधिकार, ग्राहक कायदा जाणीव जागृती, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन काळाची गरज, जागतिकीकरण, अंधश्रद्धा, बुवाबाजी, तणावमुक्ती, राष्‍ट्रीय एकात्मता, व्यावहारिक लेखन, जिजाबाई, गाडगेबाबा, महात्मा फुले आदींच्या विचारांची गरज या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. प्रत्यक्ष अनुभवातून प्रेरणा देण्याचे कार्य : काही विद्यार्थी हॉटेलमध्ये काम करत उच्च शिक्षण घेऊन चांगल्या शासकीय पदांवर पोहोचलेले आहेत. कठीण परिस्थितीतून मार्ग काढून पोलिस झाले आहेत. अशा कष्ट करणा-या आणि कर्तृत्ववानांचे मार्गदर्शन देण्याचे कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाते. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण तपासून त्यांना पुढे करण्याचे काम वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून केले जाते. शिवाय विविध कला जोपासण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांना संधी असेल तेव्हा विविध कार्यशाळांना महाविद्यालयाचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात येते, असे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. उद्धव थोरवे यांनी सांगितले.