आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याने शिक्षक, विद्यार्थी घडवावा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिष्ठानचा पुढाकार
ज्ञान दानापेक्षा शिक्षणबाह्य कामात नेहमीच व्यस्त असणारे आणि साहित्याच्या वाटेलाही न जाणारे म्हणजे शिक्षक अशी व्याख्या सांपद काळात शिक्षकांची बनली आहे. अर्थात संस्थाचालकांची मनमानी आणि राजकारणात कमालीचा रस असलेली काही मंडळी यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रालाच डाग लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानने शिक्षकांसाठी घेतलेले साहित्य संमेलन आपला वेगळा ठसा उमटवून जातो. प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी शिक्षकांच्या कविसंमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर रामदास फुटाणे कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. अर्थातच संमेलनात शिक्षणखात्यावरील कविता होत्या. ग्रंथदिंडी, कथाकथनही संमेलनात होते.
आताचे शिक्षक साहित्यापासून दूर जात आहे. त्याचे वाचनही कमी होत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून होणा-या नवनिर्मितीचा आलेख किंवा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता साहित्यापासून दूर चाललेल्या गुरुजींना साहित्याशी केवळ जवळीकच न साधता स्वत:च साहित्यिक व्हावे. आहे त्याच स्थितीत कायम न राहाता त्यांनी वाचायलाच हवे. नवनवीन संदर्भ साहित्य वाचत त्यातून विद्यार्थी हितासाठी आवश्यक गोष्टी विद्यार्थ्यांना सोप्या आणि त्यांच्याच भाषेत सांगाव्यात. किंबहुना आपल्या आलेल्या अनुभवातून विद्यार्थी हितासाठी स्वत: साहित्य निर्माण करावे. त्यांनी कवी, लेखक, नाटककार, कथाकार व्हायलाच हवे. आणि आपल्या या साहित्याचा नवनिर्मितीचा उपयोग विद्यार्थी आणि पर्यायाने समाजासाठीच करावा. असे विचार प्रत्येक सहभागी झालेल्या वक्त्यांनी मांडत काही अंशी शिक्षकांच्या उणिवा दाखवत त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न या शिक्षक साहित्य संमेलनातून झाला खरा...
नाशिकातल्या साहित्य संमेलनात बिघडत्या पिढीस कारणीभूत धरत त्याची जबाबदारी केवळ शिक्षकांवरच निश्चित करण्यात आली. शिक्षक साहित्यापासून दूर जात असल्याचीही खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. कवी वाघ यांच्या म्हणण्यानुसार आडातच नाही तर पोह-यात येणार कुठून हे सत्य असलं तरीही नवनिर्मितीसाठी आवश्यक वातारवरण निर्माण व्हायला हवं. ते का होत नाही, याची चर्चा मात्र केली नाही. साहित्य संमेलनातून साहित्य निर्मितीस प्रोत्साहन देणे किंबहुना त्याविषयी विद्यार्थ्यांच्या नवीन पिढीत आत्मीयता निर्माण करणे हा उद्देश असला तरीही त्यात हे साहित्य ज्यांनी निर्माण करावयाचे आहे त्यांच्याबाबतीतही चर्चासत्रांचे आयोजन व्हावे. किंबहुना ते होणे अपेक्षित आहे. केवळ त्यांनी म्हणजे शिक्षकांनी काय करावे असाच हेका नसावा. संमेलनाची जमेची बाजू म्हणजे डॉ. अपूर्व हिरेंसारख्या संस्थाचालक आणि राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तीने त्याचे आयोजन केले होते. निवडणुकांच्या दृष्टीने त्याचे आयोजन करत राजकीय स्वार्थ साधण्याची चर्चाही झाली. पण राजकारणी व्यक्तीने त्याचे आयोजन केले तर राजकारणाचा त्यात संदर्भ येणे साहजिकच होते. शिवाय त्यात साहित्यिक शिक्षकही राजकारणातलेच सहभागी झालेले. त्यामुळे याचा राजकीय फायदा आयोजकांना झाला किंवा त्यांनी तो करुन घेतला तर त्यात नवल असं काहीच नाही. मात्र त्यातून चांगलं घडत असल्याचा एक सूर दबक्या आवाजात निघाल्याने बंद दाराआडील चर्चेला पूर्ण विराम देत नव्या समाज निर्मितीची एक क्रांती हे संमेलन घडांव अशी अपेक्षा या संमेलनातून करुया. तसेच या संमेलनात राहिलेल्या काही लहानशा त्रुटी अहमदनगर येथे होणा-या दुस-या साहित्य संमेलनात भरून निघतील अशी अपेक्षा करूया....
१शब्दांकन - किशोर वाघ, नाशिक