आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तववादाचा पराभव...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘साहित्य हे जगण्याचा आरसा आहे’ आणि ‘लिटरेचर इज अ स्लाइस ऑफ लाइफ’ ही दोन विधानं वास्तववादी साहित्याची भूमिका मांडतात. वास्तववादी साहित्य ‘सर्वसामान्य’ जगण्यातल्या तपशिलांचं वर्णन करतं. यातला ‘सर्वसामान्य’ हा शब्द कळीचा आहे. वास्तववादाचा उठाव अभिजनवादाविरुद्ध असल्याने साहित्यिक वास्तववादात लोकशाहीची प्रेरणा महत्त्वाची ठरली आहे. माणसाच्या भावनोद्रेकाला महत्त्व देणारी आणि विवेकापेक्षा मनस्वीपणाचा पिच्छा करणारी साहित्यातली रोमँटिसिझमची विचारसरणी कालबाह्य झाल्याने वास्तववाद्यांनी ती नाकारली. त्याऐवजी ‘दिसतं त्याचं वर्णन’ करणारी विवेकनिष्ठ लेखनशैली त्यांनी स्वीकारली. जागतिक साहित्याच्या इतिहासात ‘रोमँटिक’ आणि ‘रिअ‍ॅलिस्ट’ या दोन्ही स्कूलचे प्रवक्ते आहेत. त्यांच्यामधून विस्तव जात नाही. विश्व साहित्याचं चित्र रोचक आहे. आपण मराठीपुरतंच बोलूया.

मराठी साहित्यात वास्तववादाचा अजेंडा राबवला जातोय. कथा, कादंबर्‍या, नाटकं आणि कविता त्यानुसार लिहिल्या जातायत. इतिहासकार वि. का. राजवाड्यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी ‘कादंबरी’ नावाच्या दीर्घ लेखातून कादंबरीत शुद्ध वास्तव असं काही नसतं आणि शुद्ध अद्भुतसुद्धा नसतं, तर कादंबरी या दोन्हीचं मिश्रण असतं, ही भूमिका मांडली. राजवाड्यांनी ‘रोमँटिक’ म्हणजे ‘अद्भुत’ असं या लेखात म्हटलं आहे. चांगली कादंबरी ही अद्भुत आणि वास्तवाचं मिश्रण असते, ही राजवाड्यांची भूमिका आजही फ्रेश वाटते.

ह. ना. आपटेंच्या सामाजिक कादंबर्‍यांनी शतकापूर्वी वाचकांना रिझवलं आणि त्यांचं प्रबोधनही केलं. हा ट्रेंड मराठीत पुढे रुजला. वास्तववाद म्हणजे, पत्रकार ज्या तथ्यांवर बातम्या तयार करतात ते तथ्यनिष्ठ वास्तव, ही भूमिका मराठी साहित्याने स्वीकारली. इतकी की, अखेरीस तथ्यनिष्ठतेचा अतिरेक झाला आणि कादंबरी पत्रकाराने लिहिलेल्या बातमीसारखी भासू लागली. ही गोष्ट पत्रकारांची शान वाढवणारी असली तरी ती कादंबरीकाराची गोची करणारी आहे. सामाजिक तथ्य आणि राजवाड्यांचं ‘अद्भुत’ यांचं मिश्रण ज्या कादंबरीत झालं, ती कादंबरी ‘मुंबई दिनांक’. अरुण साधूंनी ती लिहिली होती. मेट्रोतल्या माणसांचे मनोव्यवहार, त्यांची सत्ताकांक्षा, जगण्याची धावपळ, मराठी राजकारणाचे डावपेच, ध्येयवादी पत्रकारिता इत्यादी गोष्टी ‘मुंबई दिनांक’मध्ये मस्त आल्या आहेत. सत्तरीच्या दशकात ही एक कल्ट कादंबरी ठरली होती. तिचा फॉर्म क्लासिकल आणि भाषा सामान्यांची होती. ‘मुंबई दिनांक’ येण्यापूर्वी मुंबईकर भाऊ पाध्यांनी ‘वासू नाका’ लिहून वास्तववादाचा फंडा जमवला होता. मुंबईतल्या नाक्यावरची ती पंटर मुलं, त्यांची भाषा, त्यांची ग्राम्य लैंगिकता, त्यांची शाब्दिक आणि प्रत्यक्ष हिंसा आणि निरर्थकतेचा सामुदायिक आविष्कार ‘वासू नाका’मध्ये होता. हे सगळं वाचून त्या काळचे सनातनी खवळले होते.

‘वासू नाका’ ही वास्तववादी पठडीतली आद्य कादंबरी म्हणता येईल. वास्तववादाला ज्याची मातब्बरी वाटते ते सर्वसामान्यांचं जगणं, किंबहुना रस्त्यांवरच्या माणसांचं जगणं या कादंबरीचा विषय आहे. अशा सडकछाप जगण्यात ‘स्पिरिच्युअल’ तत्त्व नसतं. असते ती जगण्याची भगभग आणि तगमग. ही भगभग रोमँटिक धारणेशी विपरीत असते. साहित्यिक रोमँटिसिझम ‘महान’ गोष्टींना व्यक्त करतो. जी. ए. कुलकर्णी याचं चालतं-बोलतं उदाहरण आहेत. रिअ‍ॅलिझम ‘लहान’ गोष्टींना व्यक्त करतो, भाऊ पाध्ये याचं उदाहरण आहेत. रोमँटिसिझमचं तत्त्वज्ञान जगण्यातल्या उच्च, तीव्र आणि सौंदर्यवादी ऊर्मींना महत्त्व देतं. ‘वासू नाका’ने या ऊर्मींना धुडकावून लावत लहान माणसांचं पतनशील, बोथट आणि कुरूप जग दाखवलं. ते त्या काळी धक्कादायक वाटलं. अरुण साधू आणि भाऊ पाध्ये, दोघांना वास्तववादी कादंबरीचा फॉर्म आणि रेसी भाषा गवसली होती. वास्तववादाचे तिसरे प्रवक्ते भालचंद्र नेमाडे आहेत. त्यांनी स्वत:च्या परात्मभावी आर्ताला सामाजिक कादंबरीचं रूप दिलं. ते देताना त्यांनी वास्तववादी निवेदनशैलीचा वापर केला. नेमाड्यांच्या कादंबरीत काही तपशील रिपीट होतात. ‘कादंबरीचा अवकाश तपशिलांनी भरून टाका’, असा आदेशच त्यांनी दिल्यामुळे कादंबरी म्हणजे एक पोतं असून ते तपशिलांनी भरायचं, हा फंडा मराठी कादंबरीत रूढ झाला.

वरवर नेमाड्यांची कादंबरी वास्वववादी तपशिलांची वाटते, पण खोलात गेलं की ही कादंबरी एका मनस्वी म्हणजे रोमँटिक ‘मूड’चा आविष्कार आहे, हे कळतं. नेमाडपंथीयांनी हे धड न ओळखल्याने देशीवादी कादंबरी वरवरच्या तपशिलांत रमली; पण तिला नेमाड्यांच्या कादंबरीने जागवलेला लिरिकल, उदास मूड काही गवसला नाही. हा मूड विलास सारंगांच्या ‘एन्कीच्या राज्यात’ दिसून येतो.

मराठी साहित्यात गेल्या वीसेक वर्षांत फोफावलेल्या वास्तववादाची सगळी भिस्त सामाजिक तपशिलांच्या वर्णनावर आहे. या तपशिलांच्या पोटात, त्यांच्या आगे-मागे, वर-खाली जे गुणतत्त्व लपलेलं असतं, त्या तत्त्वाला शोधून काढणं कादंबरीकारांचं, कथाकारांचं काम आहे. ते मराठीत अपवादानेच झालं. त्याऐवजी कादंबरी म्हणजे घटनांची बखर, हे तत्त्व रुजलं...
वास्तववादी लेखकाला नीट बघता येत नसेल, तर पृष्ठभागावरच्या वास्तवाची दादागिरी सुरू होते. पत्रकारांना अर्थातच पृष्ठभागीय वास्तव पुरेसं असतं. पण कादंबरीकाराला त्याशिवाय नवं, अनोखं आणि अनपेक्षित मटेरियल मिळवावं लागतं. पृष्ठभागीय वास्तवाची स्वत:ची एक शक्ती असतेच. म्हणून लोक रोज, न कंटाळता पेपर वाचतात. तितक्या रुचीने ते कादंबरी वाचत नसतात. काल काय झालं? हा प्रश्न पत्रकाराला महत्त्वाचा असतो; तर माझ्या आत, तुझ्या आत काय सुरू आहे? हा प्रश्न कादंबरीकाराला महत्त्वाचा वाटतो. पत्रकार माणसांच्या भूमिकांची वर्णनं करतात, कादंबरीकार अस्तित्वात नसलेल्या माणसांना भूमिका देतात. पहिला बातमी लिहितो, दुसरा कथा रचतो.

आज फोफावलेल्या साहित्यिक वास्तववादाने पत्रकार आणि कादंबरीकार या दोघांच्या भूमिकेतला मूळ फरकच खतम केला. हा फरक टिकवणं पत्रकारितेची नव्हे, पण कादंबरीची स्वायत्तता टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे. अमेरिकेतून निघणार्‍या ‘न्यूयॉर्कर’ सारखी साप्ताहिकं कादंबरीकाराच्या प्रतिभेने सामाजिक घडामोडींचं वृत्तांकन करतात, तेव्हा आपण डोस्टोव्हस्की किंवा टॉलस्टॉयच्या कादंबर्‍या वाचत असल्याचा भास होतो. प्रतिभावान पत्रकार मराठीतसुद्धा असल्याने मराठी कादंबरीकारांना पत्रकारांचा चॅलेंज आहे. वृत्तांकने कादंबरीच्या प्रतिभेने होणार्‍या काळात कादंबरीला नव्या प्रतिभेचा शोध घ्यावाच लागेल.

वास्तववादाला ज्याची मातब्बरी वाटते, ते सामाजिक वास्तव नेमकं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न कोण विचारतोय, यावर अवलंबून आहे. भारतीय संदर्भात या प्रश्नाला वर्गीय, वर्णीय, जातीय, लिंगनिष्ठ, भाषिक आणि प्रादेशिक अस्मितेचे अतूट संदर्भ आहेत. या प्रश्नाचं उत्तर पत्रकारासाठी एक असू शकतं, तर साहित्यिकासाठी दुसरं असू शकतं.

वास्तव काय आहे? हा प्रश्न वास्तववादासमोरचे आव्हान आहे. वरवर दिसणार्‍या वास्तवाचे धागेदोरे सुदूर गेलेले असतात आणि दिसणार्‍या वास्तवाचा अंत:स्तर सखोल असू शकतो. हे जाणून वास्तवाचं उत्खनन सुरू केलं की, भलतंच उपवास्तव समोर येऊ शकतं. म्हणजे जे दिसतं ते नसतंच आणि जे असतं ते दिसत नसतं. साहित्यिक वास्तववादाला या तात्त्विक लोच्याशी सामना करावाच लागेल; पण असा कुठलाही तात्त्विक विचार आजची मराठी कादंबरी करताना दिसत नाही. ती दृश्य तपशिलांत आणि ढोबळ राजकीय-सामाजिक वर्णनात आपला मोक्ष साधू इच्छिते.

शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे क्लासिकल टाइममध्ये राजवाड्यांनी उत्तम कादंबरीत वास्तव आणि अद्भुताला समान महत्त्व दिलं होतं. पोस्टमॉडर्न टाइममध्ये कादंबरी म्हणजे दृश्य वास्तवाचंच चित्रण राहणार असेल तर हे वास्तव ज्या वृत्तपत्रांमध्ये पकडलं जातं, ती वृत्तपत्रेच वाचक वाचतील; पण माणूस फक्त वास्तवावर जगत नसतो. वास्तवापलीकडे जाण्याची त्याची आंतरिक ऊर्मी असते. या ‘ट्रान्सेडेंटल’ प्रेरणेमुळे साहित्याचं फावतं. या ऊर्मीला आजच्या पत्रकारांनी समजून नाही घेतलं तरी चालण्यासारखं आहे, पण आजच्या कादंबरीकाराला वास्तववादाच्या पैलतीराकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव सांगणार्‍या मीडिया राणीचं राज्य आज जोरात सुरू आहे. अंगावर काटे आणणारे ‘रिअ‍ॅलिटी शोज’ आहेत. करमणूकप्रधान न्यूज चॅनल्स आहेत. खदाखदा विनोदाचा रतीब सुरू आहे. आज देहाभिमानी माणसांचा वैश्विक शरीरोत्सव मीडिया साजरा करतेय; पण हे अद्भुत नाही. जगण्यातलं अद्भुत काय आहे? माणूस आणि पंचमहाभूतांचा काय संबंध आहे? माणसाच्या मनात-मनाबाहेर काय सुरू आहे? हे साहित्यच सांगू शकतं. राजवाड्यांचं अद्भुत इतकंही अद्भुत ठरू नये, जे आजच्या साहित्यिकांना गवसणारच नाही.