आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरावे परी नेत्ररूपी उरावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात एक करोड वीस लाख लोक अंध आहेत. डोळ्यांच्या समोरील बाहेरच्या बाजूस काचेसारखा पारदर्शक पडदा (बुबुळ) असतो. त्यामधून प्रकाशकिरणे डोळ्यात शिरतात व आपणास दिसायला लागते, परंतु काही लोकांमध्ये डोळे येणे, खुप-या, डोळ्यांना मार लागणे, अ जीवनसत्त्वाचा अभाव अशा विविध कारणांमुळे हा पडदा पांढरा पडतो व अपारदर्शक होतो. त्यामुळे डोळ्यात शिरणारी प्रकाशकिरणे अडवली जातात. त्यामुळे रुग्णास दिसत नाही. अशाप्रकारे टिक पडून अंधत्व आलेले 36 लाख रुग्ण देशात आहेत. त्यापैकी साठ टक्के बारा वर्षांखालील मुले आहेत. हा पांढरा झालेला बुबुळ काढून त्याठिकाणी दुस-याच्या डोळ्यांचा पारदर्शक बुबुळ बसवल्यास अशा रुग्णांना दिसू शकते यालाच नेत्ररोपण शस्त्रक्रिया म्हणतात. नेत्ररोपण शस्त्रक्रियेसाठी लागणारा डोळा केवळ दुस-या एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर रोपणानेच मिळवता येतो.


सध्या दरवर्षी भारतात फक्त 14000 नेत्ररोपण शस्त्रक्रिया होतात. हे प्रमाण अमेरिकेच्या एक दशांश एवढेच आहे. अंधांचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी साधारणत: 75 हजार नेत्ररोपण शस्त्रक्रिया गरजेच्या आहेत. दरवर्षी साधारणत: 30000 नवीन अंध व्यक्तींची भर पडत असते. महाराष्ट्रात सुमारे 13 लाख लोक दोन्ही डोळ्यांनी तर दहा लाख लोक एका डोळ्याने अंध आहेत. महाराष्ट्रात साधारणत: दर हजारामधील 15 डोळ्यांना नेत्ररोपणाची आवश्यकता आहे. जगातील 20 टक्के अंध आपल्या देशात आहेत. एका नेत्रदानातून दोन अंधांना दृष्टिदान केले जाते, असे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे.


नेत्रदान कोणी, कसे करावे : नेत्रदान कोणीही करू शकतो त्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले मधुमेही इत्यादी लोक नेत्रदान करू शकता. प्रत्येक व्यक्ती नेत्रदानाचा संकल्प घेऊ शकतो व आपली ही इच्छा एक इच्छापत्र भरून जवळच्या नेत्रपेढीला देऊ शकतो वरीलप्रमाणे नावनोंदणी झाली नसली तरी मृत व्यक्तीने मृत्युपूर्वी नेत्रदान करण्याची इच्छा आपल्या नातेवाइकासमोर दर्शवली असेल किंवा मृताच्या जवळच्या नातेवाइकांची तशी इच्छा असेल तरीही नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान केले गेले पाहिजे. त्याकरिता मृताच्या नातलगांनी पुढील दक्षता घेतली पाहिजे 1) मृत्यूनंतर मृताचे डोळे मिटून त्यावर ओला कपडा किंवा कापसाची पट्टी ठेवावी. 2) खोलीतील पंखा बंद करावा 3) मृत्यूचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. मृत्यूनंतर जवळच्या नातेवाइकाने लवकरात लवकर नेत्रपेढीला दूरध्वनी करून किंवा इतर मार्गाने माहिती द्यावी. डॉक्टर ताबडतोब मृताच्या घरी येऊन, दोन्ही डोळे 15-20 मिनिटांत काढून घेतात. खोबणीत कापूस भरून दोन्ही पापण्या जुळवून एक टाका घालतात त्यामुळे चेह-याला विद्रूपता येत नाही. धनुर्वात, रेबीज, एड्स डोळ्यांचा कर्करोग कुष्ठरोग, सेप्टिसिमिया, सिफिलीस, कावीळ इत्यादी कारणामुळे मृत्यू आल्यास त्यांचे नेत्र रोपणासाठी वापरता येत नाही. नेत्ररोपण शस्त्रक्रिया डोळे काढल्यानंतर 48 तासांच्या आत केली जाते. तोपर्यंत डोळे सीलबंद डब्यात (मॉइस्ट चेंबर) ठेवून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. नेत्ररोपण शस्त्रक्रियेत फक्त डोळ्यांचा समोरचा पडदा (बुबुळ) बदलला जातो. संपूर्ण डोळा बदलून बसवला जात नाही. नेत्रदानानंतर ताबडतोब अंध व्यक्तींच्या यादीतून प्रथम दोन व्यक्तींना बोलावून त्यावर नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया केली जाते.


नेत्रदानाबद्दल काही गैरसमज : जसे नेत्रदानाचे पुनर्जन्मात व्यक्ती अंध जन्मतो चेहरा विद्रूप होतो, व्यक्ती नरकात जातो. इत्यादी आजच्या आधुनिक विचारसरणीच्या प्रवाहात या गैरसमजुतींना वाव नाही. आपल्या समाजात अजूनही अज्ञान, गैरसमज,अंधविश्वास व निरक्षरता या कारणांमुळे नेत्रदान कमी होतात. यासाठी समाजाचे प्रबोधन गरजेचे आहे.