आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘लिव्ह इन’-सांभाळून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरित्रीचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष आटोपले आणि तिला कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत बंगलोरला कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली. घरी हो - नाही म्हणता म्हणता तिचे नोकरीचे पक्के झाले आणि ती भल्यामोठ्या नामांकित कंपनीत वर्षाला 9 लाख या पॅकेजवर जॉइन झाली. घरापासून दूर एकटी कधीही न राहिलेली धरित्री सहा महिन्यांत इतर मित्रमैत्रिणींसोबत रमली आणि धीटही झाली. पुढे एक तीन खोल्यांचा फ्लॅट घेतला. सकाळी 8 वाजता घरून बाहेर पडायचे आणि संध्याकाळी कधी 7 कधी 8 वाजेपर्यंत घरी यायचे रोजचे रूटीन सुरू झाले. आठवड्यातून एक सुट्टी. सर्वच एका वयोगटातील मुला-मुलींचा छानसा ग्रुप तयार झाला होता. तिचे सहकारी पण चांगले होते आणि बॉस राम सर तर खूपच चांगले. धरित्रीला धीर देणारे - काम व्यवस्थित समजावून सांगणारे तिशीतले राम तिचे फारच फेवरिट झाले होते. राम, दक्षिण भारतीय, संसारी, शिकलेली नोकरी करणारी पत्नी. आईवडील आणि गोंडस बाळाबरोबर राहणारे. धरित्रीला आधाराला एक घर मिळाले होते. सारेच व्यवस्थित चालले होते. सकाळी फ्रेश होऊन माफक मेकअप करून धरित्री जात असे. आपल्या कामात चोख म्हणून राम तिला जबाबदारी देत असत. कंपनीही तिच्या कामावर खुश होती. दिवसभरातले बारा-बारा तास धरित्र आणि राम सोबत काम करत असत. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव कळले होते. सतत सोबत राहिल्याने सुट्टीच्या दिवशीही काही न काही कारण काढून एकमेकांना भेटू लागले. कधी बाहेर तर कधी धरित्रीच्या फ्लॅटवर! कंपनीने जामनगरला नवीन युनिट उघडायचे ठरवले. दोघांचीही बदली जामनगरला झाली. प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंतच जामनगरला राहायचे असल्याने रामने फॅमिली शिफ्ट केली नाही. धरित्री-राम ला स्वतंत्र घर कंपनीने दिले होते. सततची सोबत यामुळे जवळीक निर्माण झाली. धरित्रीची आई लग्नाच्या मागे लागली. पण धरित्री काही ना काही कारण काढून लग्नाला नकारच देऊ लागली. जामनगरचे प्रोजेक्टचे 18 महिन्यांचे काम वाढत वाढत 30 महिन्यांवर गेले आणि तिथला मुक्काम अडीच वर्षे झाला. या सर्व वेळेत धरित्री आणि राम सोबतच राहत होते आणि इथून पुन्हा दोघांचीही बंगलोरला जाण्याची मानसिकता नव्हती. रामने त्याच प्रोजेक्टमध्ये काम करण्याची तयारी दाखवली आणि जामनगरलाच दोघांनीही नोकरी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. बघता बघता सहा वर्षे झाली आणि एके दिवशी राम सरांना पुन्हा बंगलोरला कंपनीने बोलावून घेतले.
आता मात्र रामला घरच्यांच्या आग्रहामुळे बंगलोरला जाणे भाग पडले. धरित्री एकटी पडली. गेली सहा वर्षे ती फारच आनंदात होती. सर्व सुख अनुभवत होती आणि आता मात्र तिच्या हाती काहीही नव्हते. ती तिच्या कुठल्याच मागण्या अधिकाराने मागू शकत नव्हती. हा सर्व ‘लिव्ह-इन’मध्ये राहिल्याचा परिणाम होता. आजकाल अनेक मुलं-मुली दिसतात, जी कुठल्याही बंधनात न अडकता लिव्ह-इन रिलेशिनशिपमध्ये राहणे पसंत करतात. विवाहाच्या बंधनात न अडकता अशा प्रकारे समाजात सोबत राहणे हे निश्चितच समाजासाठी घातक आहे. मुख्य म्हणजे यात सर्व अधिकारांना मुकते ती स्त्री.
तिला कुठलाही अधिकार दाखवता येत नाही, नव्हे तो अधिकार तिला नसतोच! शिवाय पाच-सहा वर्षं सोबत राहिल्यानंतरही असे नाते चालूच राहील याची काहीच हमी नसते. असे नाते अनैतिक मानले असल्याने यामधून जन्म घेतलेली मुले ही सामाजिक, भावनिक आणि आर्थिक स्थैर्यापासून वंचित राहतात. त्यांची सामाजिक ओळखच नसते. म्हणजे अशा नात्यांमध्ये नात्यांची वीण सैल असल्याने केव्हाही उसवू शकते आणि नाते संपायला काहीच अवधी लागत नाही. अशा केसेसमध्ये जिथे मुलाचे लग्न झाले आहे तिथे तर तो व्दिभार्या आणि व्यभिचार असे दोन गुन्हे करत असतो. जिथे दोघे अविवाहित पुरुष - स्त्री लिव्ह-इनमध्ये राहतात त्या वेळी ते अनैतिक बंधनात अडकतात आणि समाजात ते स्वैराचार पसरवत असतात. दोघांमध्ये बेबनाव झाल्यास लिव्ह-इन पार्टनरला काहीच अधिकार नसतात.
वैवाहिक पुनर्स्थापनेचा, स्वत:साठी अथवा मुलांसाठी पोटगी मागण्याचा, संपत्तीत अधिकार मागण्याचा कुठलाच दावा करू शकत नाही. कायद्याने दोघांमध्ये कुठलेच नाते नसल्याने असा दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. समाजात आज गरज आहे ती सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारित होण्याची! भारतीय परंपरेनुसार विवाह प्रथा जोपासण्याची! आपली नीतीमूल्ये सांभाळत सर्व जगाला एक उत्तम कुंटुबव्यवस्था देणा-या भारतीय संस्कृतीला जतन करणे आपले परमकर्तव्य आहे कारण अशा स्वास्थ्यपूर्ण कुटुंबव्यवस्थेतूनच सुदृढ समाज घडू शकतो.