आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसोक्त जगा.......

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेज सुटायला अजून दीड तास बाकी होता. शेवटचा तास रसायनशास्त्राचा. त्यामुळे भयंकर कंटाळा आला होता. विश्रांतीसाठी डोळे झाकले तितक्यात डोळ्यासमोर कॉलेजच्या पहिल्या दिवशी सहज एका वर्गाच्या खिडकीतून आत डोकावून पाहिलेलं मला आठवलं. तेव्हा वर्गात सगळे खूप निराश बसले होते कारण भरपूर अभ्यास करूनही परीक्षेत जवळजवळ सगळ्यांनीच मार खाल्ला होता. तेव्हा त्यांच्या बॅचच्या मॅडम वर्गावर आल्या आणि म्हणाल्या, ‘चला उठा, पुन्हा एकदा तयारीला लागा.’ पण तरीही सगळे तसेच तेव्हा त्या म्हणाल्या, ‘डोळे बंद करा. स्वत:च्या मनाला विचारा की आपण इथे कशासाठी आलोय? आपण नजरेसमोर ठेवलेलं ते ध्येय आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे? आणि हे सगळं केल्यावरच एका सुंदर भविष्यात तुम्ही प्रवेश करणार आहात.’


हे आठवताना आमचे सर वर्गात आले आणि माझे डोळे उघडले. मग अगदी उत्साहात बॅगेतून पुस्तकं काढली; पण तेव्हा एक गोष्ट समजली की, असंच करायचं म्हणून करण्यापेक्षा जर त्यात आनंद मानून ते काम केलं तर समाधान आणि सुख आपल्याच मनाला मिळतं. कॉलेज लाइफ सुंदर असतं हे म्हणतात ते कदाचित याचमुळे, कारण शिक्षिकादेखील आपल्या मैत्रिणीसारख्या असतात.


मला फक्त त्या कॉलेजमधल्या मॅडम आहेत इतकंच माहीत होतं. एकदा माझी वर्गमैत्रीण अ‍ॅडमिशन मिळत नव्हती ते मला सांगत होती. आमचं बोलणं सुरू असताना त्या मॅडम तिथून जात होत्या. त्यांनी आमचं बोलणं ऐकलं आणि त्या म्हणाल्या, ‘तुला एक सांगू? कधीही संकटांचे लाड करू नयेत उलट त्यावर मात कशी करता येईल याचा विचार कर.’ त्या असं बोलून निघाल्या तेव्हा खूप हिंमत करून मी त्यांना विचारलं, ‘मॅडम, तुमचं नाव काय आहे?’ त्यांनी स्माइल दिलं आणि म्हणाल्या, ‘मी प्राजक्ता मोरे, थर्ड इयरला शिकवते मी.’


त्या मॅडमनी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका झटक्यात बदलून टाकला आणि तेव्हापासून ठरवलं की, काहीही झालं तरी जे काम करीन ते आनंदाने आणि मनापासूनच करीन. एकदा एका मुलाने त्यांना विचारलं, ‘मॅडम, तुमचा आदर्श कोण आहे?’ तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय अविस्मरणीय होतं. त्या म्हणाल्या, ‘आई-वडील. त्यांनी मला त्यांच्या संस्कारातून शिकवलं की, विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कसं शिकवावं.’ तेव्हा खरंच या गोष्टीचं आश्चर्य आणि आनंद वाटला की, अशा मॅडम कॉलेजमध्येही असतात.


एका विद्यार्थ्याला शिक्षकांकडून हीच अपेक्षा असते की, हातातल्या छडीपेक्षाही जर तोच हात त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून फिरवून समजावून सांगितलं की पुढच्या वेळेस अशी चूक करू नकोस, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीच्या भीतीपेक्षा व्यवस्थित वागण्याची उमेद जागृत होईल.


आज मोरे मॅडमसारख्या शिक्षकांची प्रत्येक शाळा-कॉलेजला गरज आहे. असे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात आले तर कुठलाही विद्यार्थी वाया जाणार नाही. तो घडेल, शिकेल आणि मोठा होऊन अभिमानाने सांगेल, ‘शिक्षकांनीच मला घडवलं. आता माझ्या सामर्थ्याने देशाचं भवितव्य घडवीन.’ जाता जाता त्याच मॅडमचं वाक्य, ‘हे आयुष्य आपण आपल्यासाठीच तयार केलेलं आहे. मनसोक्त जगा, कारण हा दिवस, ही वेळ आणि हे क्षण परत कधीच नाहीत येणार. स्वत: आनंदी राहायला शिकलात तरच सर्वांना आनंद देऊ शकाल. आपल्याला आयुष्य खूप सुंदर मिळालंय आणि आपल्याला स्वत:च्या चांगल्या कामातून ते अजून सुंदर बनवायचं...’