आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानाचे बाळकडू मिळायला हवे लोकभाषेतूनच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हे लोकभाषेतूनच द्यायला हवे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी लोकभाषेतून संवाद साधल्यास आकलन होण्यास खूपच मदत होईल. कायदा, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम लोकभाषेतून उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास, समजण्यास अडचणी येणार नाहीत, परिपूर्ण ज्ञान मिळेल.
बोली ही लोकभाषा असते, ती ज्ञानदानाची भाषा व्हायलाच हवी. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व परिसरामध्ये अहिराणी ही लोकभाषा आहे. लहान-थोरांपर्यंत ती बोलली जाते. मूल ज्यावेळी जन्माला येते ते त्याच्या आईच्या भाषेमुळे, सहकार्याने लहानाचे मोठे होत असते. त्याला ज्ञानाचे व ज्ञानसंस्काराचे जे बाळकडू मिळते ते मुळी लोकभाषेतूनच! भोवतालच्या समूहाचे आकलन त्याला लोकभाषेतूनच होत असते. एखादे मूल जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते. त्यावेळी त्याला ए, बी, सी, डी असे शिकविले जाते, ते त्याला लवकर आकलन होत नाही. तेच जर लोकभाषेतून समजावत त्याला शिकविण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल. लोकभाषेमुळे ते मूल सभोवतालचे लवकर आकलन करू शकेल. त्याच्या आईची जिव्हाळ्याची, हृदयाची अशी जी भाषा-लोकभाषा, जिच्या माध्यमाने जर शिक्षण दिले गेले तर ते आकलन करण्यास सोपे जाईल. एखादा शिक्षकवर्गात शिकवत असेल आणि त्याने जर लोकभाषेच्या माध्यमातून कठिणातला कठीण विषय समजून सांगितला, तर तो विद्यार्थ्यांना सोप्यात सोपा आकलनास मृदू मुलायम वाटेल. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत लोकभाषा ही ज्ञानभाषा म्हणून वापरण्यास हरकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृती, संस्कार, समाजकारण, रूढी, रिती-रिवाज हे परिणामकारकदृष्ट्या पदरी पडतील. विद्यार्थ्यांना शास्त्र, गणित विषयाची गोडी अधिक जवळ असते. एखाद्या लहान मुलाला ‘म’ मगरीचा शिकवायला गेले तर ‘मगर’ त्याला परिचित नसते, परंतु सध्या ‘मम्मी’ हा शब्द इतका परिचित झाला आहे की, तो लोकभाषेत रूढ झाला आहे. त्याला जर ‘म’ मम्मीचा सांगितले, तर तो आनंदाने उड्या मारतो. लोकभाषेतील गाणे विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवले व नृत्य वगैरे करावयास लावले तर त्यांना आजच्या सवयीतून खºया संस्कृतीचे ज्ञान होते.
लोकभाषा साधी, सरळ, सोपी असते. लोकभाषेतून ज्ञान दिल्यास ते क्लिष्ट होणार नाही, अधिक स्पष्ट होईल. वरच्या पातळीवर ज्ञानाचे आकलन करताना हिंंदी, इंग्रजीचा आधार घेणे गैर नाही. लोकभाषेच्या ‘ग्रास्पिंग पॉवर’ ही इतर दुय्यम भाषेपेक्षा निश्चित जास्त असते. ‘मायची भाषा म्हणून मुलं अधिक तिच्या जवळ जातात व ज्ञानाचे सखोल आकलन करतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमात इंग्रजीत असलेले सगळेच शब्द लोकभाषेत असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काही ठराविक पातळीपर्यंत लोकभाषा हीच ज्ञानभाषा करायला हवी. त्यामुळे सोनिया गांधी महाराष्टात आल्यानंतर त्यांनी ‘नमस्कार, जय महाराष्ट’ हे स्थानिक शब्द उच्चारताच श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, हे त्याचे उत्तम उदाहरण होते.