आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकभाषा ज्ञानभाषा व्हाव्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकभाषा ज्ञानभाषा व्हाव्यात कारण प्राचीन काळापासून लोकभाषा ही ज्ञानभाषा झाल्याचे अनेक उदाहरणात दिसते आहे. लोकभाषेत शिक्षण देऊन अनेक देशांनी प्रगती केली आहे. आम्हीही निश्चितच मातृभाषा किंवा लोकभाषेत उच्च शिक्षण दिले तर विषय कळण्यास आकलन होण्यास अधिक सोपे जाईल, हे सर्वांना पटते. विद्वानांचे यावर दुमत नाही. लोकभाषा या ज्ञानभाषा व्हाव्यातच मात्र व्यावहारिक पातळीवर तसा निर्णय का होत नाही. कारण, ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे भारतीय जनतेच्या मनात आपल्या भाषांविषयी आणि ज्ञानपरंपरेविषयी साशंकता निर्माण करून न्यूनगंड निर्माण केला. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारातून हिंदुस्थानात राबवलेल्या शिक्षण नीतीमुळे इंग्रजी हीच केवळ ज्ञानभाषा आहे व होऊ शकते, असा भ्रम भारतीयांच्या मनात निर्माण झाला. भारतीय ज्ञानपरंपरा आणि तत्त्वचिंतन याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय संशोधक आणि विचारक यांनी येथील प्रादेशिक भाषांमध्ये महत्त्वपूर्ण लेखन करून भारतीय भाषादेखील ज्ञानभाषा होऊ शकतात, असे सिद्ध केले आहे.
लोकभाषा ही ज्ञानभाषा होऊ शकते हे आपल्या देशातील अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते अगदी प्राचीन काळात गौतम बुद्धांनी त्यांना प्राप्त झालेले ज्ञान लोकभाषेतच लोकांना सांगितले. त्या काळात संस्कृत ही ज्ञानभाषा मानली जात होती. असे असतानाही सामान्यजनांना बोध करावा या भूमिकेने भगवान गौतम बुद्ध यांनी संस्कृत भाषेचा अवलंब न करता त्यावेळी बोलभाषा म्हणून प्रलित असलेल्या पाली भाषेत प्रवचने केली, दुसरे उदा. महावीरांचे देता येईल. महावीरांनी जैन धर्मातील तत्त्वे संस्कृत भाषेत न सांगता त्यावेळी बोलभाषा म्हणून प्रचलीत असलेल्या अर्धमागधी भाषेतून सांगितले. त्यांच्या अनुयायांनी तत्त्वप्रसारासाठी महाराष्ट्रीचा (बोलभाषा) अवलंब केला. त्यातून जैन महाराष्ट्री या निराळ्या बोलभाषेची जडणघडण झाली, मध्ययुगात आपल्या देशातील सर्व भक्तिसंप्रदायांच्या प्रवर्तकांनी संस्कृत या ज्ञानभाषेऐवजी त्यांच्याकाळात प्रसिद्ध असलेल्या लोकभाषेचा आधार घेतला. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक स्वामी श्री चक्रधर यांनी त्यांचे अनुयायी दामोदर पंडित यांना त्यांनी संस्कृत भाषेत रचना केली म्हणून बोल लावला. संस्कृत भाषेत रचना केली तर माझा सामान्य परिवार त्यापासून वंचित राहील (माझा सामान्य परिवार नागवैलकी), असे सुनावून मराठीतच रचना करण्याचा आदेश दिला. स्वत: चक्रधर यांनी महानुभाव पंथाचा तत्त्वविचार मराठीतच विशद केला. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती स्पष्ट करताना अमृतातेही पैजा जिंके, असे आत्मविश्वासपूर्वक सांगितले. श्रीमद भगवद्गीतेतील सहज तत्त्वज्ञान त्यावेळची लोकभाषा असलेल्या मराठीत सांगितले. गीतेचा भावार्थ अत्यंत सोप्या आणि सुलभ अशा मराठी भाषेत दृष्टांतांच्या माध्यमातून स्पष्ट केला. जगद्गुरू संत तुकाराम यांनी वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, असे आत्मविश्वासपूर्वक सागून भक्तितत्त्व विचार आणि नाममाहात्म्य मराठी या बोलभाषेतूनच गायले.
महाराष्ट्रातील ही उदाहरणे सोडली तर इतर प्रांतातदेखील अनेक तत्त्वविचारकांनी आणि संत-महंतांनी सामान्यजनांना बोध करण्यासाठी लोकभाषेचाच आश्रय घेतल्याचे दिसते आहे. इ.स.पूर्व काळात होऊन गेलेले तामिळनाडूंचे तिरुवल्लूर या तत्त्वज्ञाने तमिळ भाषेत व्यवहारज्ञान सांगितले. अगदी आसामचे उदाहरण घ्यावयाचे तर केशमदेव आणि प्रेमदास यांनी संस्कृतभाषेतून नाममाहात्म्य पटवून देण्याऐवजी आसामी भाषेत ग्रंथ लिहून संकीर्तन भक्तीचा प्रसार केला. संत कबीराचे दोहे प्रसिद्ध आहेत. त्यांनी जीवनविषयक गहन तत्त्वज्ञान लोकभाषेतच सांगितले. कर्नाटकातील वीरशैव संप्रदायाची रचना लोकभाषेतच आढळते. सर्वज्ञांनी जीवन व्यवहारासंबंधीची मूळतत्त्वे लोकभाषेतच समजावून सांगितली. निरनिराळ्या भाषेतील अशी अनेकविध उदाहरणे देता येतील. येथे एवढेच पाहावयाचे की, प्राचीन काळापासून हिंदुस्थानातील धर्म व पंथप्रर्वतकांनी आध्यात्मिक तत्त्वविचार संस्कृत भाषेतून न सांगता लोकभाषेच्या माध्यमातूनच सांगितला. मध्ययुगापासून तर भारतात सर्वदूर लोकभाषेचाच अवलंब संत माहात्म्यांनी आणि भक्ती तत्त्वाचा प्रसारकांनी केल्याचे आढळते. यावरून स्पष्ट होते की, लोकभाषा ही ज्ञानभाषा होऊ शकते. यावरुन हेच सिध्द होते की लोकभाषा ही ज्ञानभाषा नि:संशयपणे होऊ शकते. हिदुस्थानातील इंग्रजी आमदानीत ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे भारतीय जनतेच्या मनात आपल्या भाषांविषयी आणि ज्ञानपरंपरेविषयी साशंकता निर्माण करून न्यूनगंड निर्माण केला. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारातून पाश्चिमात्य तत्त्वचिंतकांचा बडीवार माजविला एवढेच नाहीतर इ. स. 1813 व 1818 या काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदुस्थानात ज्ञानपरंपरेचा अभाव आहे, असे परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला. तेथे पारित झालेल्या हिंदुस्थानच्या ख्रिस्तीकरणाच्या ठरावानुसार लॉर्ड मेकॉले यांना हिंदुस्थानात योजनापूर्वक इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराकरिता पाठवीले. त्यांनी हिंदुस्थानात राबविलेल्या शिक्षण नितीमुळे इंग्रजी हीच केवळ ज्ञानभाषा आहे व होऊ शकते, असा भ्रम भारतीयांच्या मनात निर्माण झाला. भारतीय ज्ञानपरंपरा आणि तत्वचिंतन याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय संशोधक आणि विचारक यांनी येथील प्रादेशिक भाषांमध्ये महत्त्वपूर्ण लेखन करून भारतीय भाषादेखील ज्ञानभाषा होऊ शकतात, असे सिद्ध केले आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने संस्कृतभाषेचे महत्त्व स्वीकारून देखील प्रादेशिक भाषात. शास्त्रीय लेखन केले पाहिजे. हे परोपरीने सांगितले यामागेदेखील लोकभाषा या ज्ञानभाषा होऊ शकतात. यासंबंधीचा आत्मविश्वासच दिसून येतो.
मुलाखत : महेश रा. सरोदे