आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंच पडण्याचे रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्या शाळेच्या पटांगणात एक चिंचेचं झाड होतं. मधल्या सुटीत खेळून दमल्यावर मुलं त्या झाडाच्या सावलीत बसायची. मी पाचवी किंवा सहावीत असताना, एकदा दमून त्या झाडाच्या सावलीत बसलो होतो. काही मुलं फांद्या हलवून चिंचा पाडायचा प्रयत्न करत होती. मी ते पाहात असतानाच एक चिंच झाडावरून खाली पडली. मी मूळचा तसा जिज्ञासूच! त्यामुळे चिंच खालीच का पडली, वर का गेली नाही?
 
असा प्रश्न मला भेडसावू लागला आणि त्यावर विचार करताना अचानकच माझ्या डोक्यात एक भन्नाट  कल्पना आली. आपण ज्या जमिनीवर आराम करत बसलो आहोत, त्या जमिनीतच काही आकर्षणशक्ती असावी, त्यामुळेच वरून कुठलीही गोष्ट टाकली, फेकली किंवा सुटली तर ती गोष्ट जमिनीच्या दिशेने खालीच येते!!!!!!
 
ही अभूतपूर्व कल्पना योग्य आहे का, हे तपासण्यासाठी मी ती चिंच तीन वेळा वर फेकली, प्रत्येक खेपेला चिंच खाली जमिनीवर येऊनच पडली. यावरून माझी कल्पना साधीसुधी नसून हा एक नवा शोध असल्याचं मला तत्काळ लक्षात आलं. हा शोध मी लावला, म्हणून हर्षोन्मादानं हेडमास्तरांना सांगायला गेलो.
 
मला वाटलं होतं, की ते माझी नवी कल्पना ऐकून मला बक्षीस देतील, किमानपक्षी संध्याकाळी शाळा सुटताना राष्ट्रगीत सुरू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांसमोर माझा सत्कार करतील. पण झालं भलतंच! माझा शोध ऐकून भारावण्याऐवजी ते माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहू लागले. 
 
 
खात्री पटावी, यासाठी मी त्यांना पुरावा म्हणून ती पडलेली चिंच दिली. ती चिंच पाहून  ते माझ्यावरच भडकले आणि त्यांनी मला हाकलून दिलं... शेवटी मी हिरमुसून परत वर्गात आलो. माझ्या शोधाला मास्तरांनी दिलेल्या प्रतिसादानं माझी संशोधकवृत्ती खच्ची झाली आणि पुन्हा कधीही शोध लावायचेच नाहीत, असं मी मनोमन ठरवून टाकलं.

पुढच्या वर्षीच्या विज्ञानाच्या तासाला शिकताना कळलं, की चिंच खाली पडली ती ‘गुरुत्वाकर्षणा'मुळे आणि तो शोध साडेतीनशे वर्षांपूर्वी कोणीतरी एका न्यूटन नामक माणसानं लावला होता. त्याने म्हणे, सफरचंद झाडावरून पडताना पाहिलं होतं. न्यूटन का कोण, त्याने तो शोध लावलाही असेल, माझी त्याच्या नावाला किंवा शोधाला काही हरकत नव्हती.
 
पण साडेतीनशे वर्षांनी का होईना, मीदेखील तोच शोध लावला होता. त्याचं जर कौतुक झालं असतं, तर मी पुढे अनेक शोध लावले असते, त्याचं काय? माझ्या शोधाची हेटाळणी करून मास्तरांनी माझ्यातली संशोधकवृत्ती चिरडून टाकली आणि परिणामतः भारत अनेक मोठ्या शोधांना, त्यातून घडणाऱ्या विकासाला कायमचा मुकला...

संशोधकांना खुडून टाकणारे आमचे हेडमास्तर काही एकटेच नाहीत, आणि खुडला गेलेला मीदेखील काही एकटाच संशोधक नाही. तमाम भारतीयांच्या दृष्टिकोनाचे हेडमास्तर आणि संशोधकांचा मी, अशी ही एक-एक प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. भारतीयांच्या बरोबर उलट पाश्चात्त्य लोकांचा दृष्टिकोन असतो. ते जिज्ञासू आणि शोधक वृत्तीच्या, नवीन काही सांगणाऱ्या अभ्यासूंचा शोध घेऊन त्यांची वर्षानुवर्षे जोपासना करतात. परिणामी पुढे ते मोठे शोध लावतात.
 
 उदा. श्रीनिवास रामानुजन. हे भारतातच अंकगणितात संशोधन करत होते, आपले सिद्धांत मांडू पाहात होते, तोपर्यंत त्यांना त्यांच्या गावातदेखील कोणी विचारत नव्हते, किंबहुना त्यांच्या शाळेने त्यांना ‘नापास' ठरवले होते. वस्तुतः तोपर्यंत रामानुजन यांनी जे सिद्धांत मांडले होते, त्यातले बहुतांश त्यापूर्वीच जगातल्या अन्य गणितज्ञांनी मांडलेले होते.
 
तरीही ‘गॉडफ्रे हार्डी' या ब्रिटिश गणितज्ञाने रामानुजन यांच्या गणिताच्या वह्या, टाचणे पाहून त्यांच्यातले असामान्य ‘शोधकत्व' ओळखले. त्यानेच रामानुजनना १९१३मध्ये विशेष शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि इंग्लंडला घेऊन गेला. तेथे आणखी शोध लावून महान गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीयांना कळले, की असा हा थोर माणूस आपल्यात आहे.

रामानुजन यांच्या शिष्यवृत्तीच्या घटनेला आता जवळजवळ शंभर वर्षे लोटली. चिंच पडण्याच्या प्रकरणालादेखील पन्नास वर्षे होऊन गेलीत. आजही आपण भारतीय तसेच आहोत आणि घटनाही तशाच घडताहेत. नुकताच एका अशाच शोधक वृत्तीच्या भारतीय, अगदी मराठी माणसाने अर्थकारणात क्रांती घडवणारा असा शोध लावला.
 
या शोधामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रांती घडून भारत हा काळा पैसा व भ्रष्टाचारापासून मुक्त होऊन आर्थिक महासत्ता बनू शकेल. हा शोध दोन महत्त्वपूर्ण तत्त्वांवर आधारित आहे. १) मोठ्या नोटांवर बंदी २) सर्व कर रद्द करून (२००० रुपयांवरील) सर्व बँक व्यवहारांवर अत्यल्प (अंदाजे २ टक्के) व्यवहार कर (ट्रँझॅक्शन टॅक्स). या एवढ्या क्रांतिकारी शोधानंतर संशोधकाची अवस्था नेमकी माझ्यासारखीच झाली आहे.
 
 माझा शोध जसा ३५० वर्षांपूर्वी न्यूटनने लावला होता, तसाच या ट्रँझॅक्शन टॅक्सचा शोध ‘जॉन मेनार्ड केन्स' याने ऐंशी वर्षांपूर्वीच लावला होता आणि नोटबंदीदेखील ऐंशी वर्षांपूर्वीच केली गेली होती. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जसा वेगवेगळ्या बाबतीत शेकडो वर्षे वापरला गेला, तसाच ट्रँझॅक्शन टॅक्सदेखील ब्राझील, स्वीडन, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांमध्ये गेली ३०-३५ वर्षे लागू करून वापरला गेला आहे आणि नोटाबंदीदेखील गेल्या ऐंशी वर्षांत अनेक देशांत केली गेली आहे.
 
 आपल्या या अस्सल मराठी अर्थक्रांतीची ही दोन्ही प्रमुख तत्त्वे ज्या देशांत वापरली, त्या सर्व ठिकाणी भ्रष्टाचार-काळा पैसा थांबवण्यात आणि विकास साधण्यात सपशेल अपयशी ठरली असली, तरी ते अपयश महत्त्वाचे नसून त्यामागची माझ्यासारखी शोधक वृत्ती महत्त्वाची आहे. शोधक वृत्ती ही शोधापेक्षा अधिक महत्त्वाची असते, हे सिद्ध करायला रामानुजन जरी हयात नसले, तरी मी जिवंत आहे ना!!
 
 कुठल्यातरी न्यूटनच्या झाडाचे सफरचंद माझ्या शाळेतल्या चिंचेच्या आधी पडले, यावरून हेडमास्तरांनी माझी शोधक वृत्ती खुडली. पण त्या खुडण्यामुळे माझे कितीसे नुकसान झाले? मी पुढचे शोध लावणे थांबवून माझा उद्योग सुरू केला. पण माझे पुढचे शोध बंद झाल्यामुळे विकास थांबला, तो भारताचा!! म्हणजे, शेवटी नुकसान अखंड भारताचे झाले.

नोटाबंदी सपशेल फसल्यानंतर त्यावरून सारे अर्थतज्ज्ञ अर्थक्रांतीच्या संशोधकाला अगणित प्रश्न विचारून भंडावून सोडताहेत. त्याने काय साध्य होणार आहे? नोटाबंदी सर्वत्र फसली असेल, ट्रँझॅक्शन टॅक्सदेखील फसला असेल, पण महत्त्व फसण्याला नसून त्यामागील अस्सल क्रांतिकारी शोधक वृत्तीला आहे. ती जर खुडली, तर त्या क्रांतिकारकांचे थोडेच नुकसान होईल? त्याला आईकडून ३५०० रुपये दरमहा मिळतात, ते तसेच यापुढेही मिळत राहतील आणि त्यात तो आनंदीही राहील. 
 
त्याची शोधक वृत्ती या अर्थतज्ज्ञांच्या प्रश्नांनी खुडली गेली तर मात्र त्याचे भावी शोध बंद पडतील आणि त्याद्वारे काळा पैसा व भ्रष्टाचारापासून मुक्त होऊन भारताचा विकास होण्याची शक्यता दुरावेल. एवीतेवी एखाद्या हेडमास्तरप्रमाणे संपूर्ण देशाची शाळा भरवून आपल्याला ‘मन की बात'रूपी उपदेशामृत पाजले जातेच. मग देशाच्या हेडमास्तरांनी एकदा आपल्या शालेय कार्यक्रमात या अर्थ संशोधकाचा सत्कार का करू नये? ...विलायती सफरचंदाच्या प्रसिद्धीने भारतीय चिंच ‘खट्टू' होते, हे त्यांना माहीत नाही काय?...
 
 
लोकेश शेवडे
lokeshshevade@gmail.com
लेखक संपर्क -९२२५१ १६६६०
बातम्या आणखी आहेत...