आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
एकीकडे स्वयंपाक आवरता घेत सुधा फोनवरून आप्पांच्या डॉक्टरांशी बोलत होती. पंचाहत्तरीच्या आप्पांची लाडकी लेक त्यांच्या काळजीने विव्हळ झाली होती. तिने सहज हॉलमध्ये डोकावून पाहिले तर अजय तिचा नवरोबा समृद्धीशी म्हणजे त्यांच्या नवविवाहित लेकीशी बोलत होता. समृद्धीला लहानपणापासूनच लहानसहान गोष्टी शेअर करायला ‘बाबा’ लागतो, अगदी आता तिचे लग्न झाले तरीही! सुधाच्या चेह-या वर बापलेकीच्या प्रेमाबद्दल कौतुकमिश्रित भाव उमटले.
लॅच ओढता ओढता पायात चप्पल अडकवत असताना ती अजयला म्हणाली, ‘मी येते जरा माझी कामे करून.’ एवढे बरे होते की अजयला तिच्या बारीकसारीक गोष्टींबद्दल कधीही चौकशा नसायच्या. आदरयुक्त स्वातंत्र्याच्या कक्षा त्याने तिला बहाल केल्या होत्या. इतक्या वर्षांत अर्थातच त्या स्वातंत्र्याचा गैरवापर सुधाकडून कधीही झाला नव्हता. त्याच्या कक्षेत धावत तिचे आयुष्य प्रवाही बनले होते.
अजयने तिची दखल घेत विचारले, ‘कशी जाणार आहेस? तुझी कार सर्व्हिसिंगला टाकली आहे ना?’ त्याच्या प्रश्नाने सुधा चक्रावली. सुखद धक्क सहन करीत ती भानावर आली. आज चक्क अजय एवढ्या आस्थेने विचारतोय आपल्याला. एरवी तर किती समांतर आयुष्य जगतो आपण याच्याबरोबर. कधी-कधी तर त्याचे वागणे तुटक. तिच्या सुखदु:खाशी कसलेही सोयरसुतक नसलेले. सुरुवातीला तिला मनस्ताप झाला. रडून पाहिले, सासरी-माहेरी सांगून पाहिले, पण अजय तसूभरही बदलला नाही. आपले एकेरी आयुष्य जगत राहिला. सुधा मनातून तुटत गेली. अजयचा स्वभाव बदलणार नाही हे सत्य तिने स्वीकारले. मग तीही दडपणातून मुक्त झाली. निदान अजय आपल्याला स्वातंत्र्य तर देतोय ना, यावर समाधानी राहू लागली.
आता तर समृद्धीही सासरी गेली. घरात दोघेच दोघे असत. आज अजयने स्वत:हून तिला विचारले आणि म्हणाला, ‘चल. मलाही काम आहे. मी सोडतो तुला कार सर्व्हिस स्टेशनपर्यंत.’ सुधानेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत. ती त्याच्या शेजारी बसली. तिच्या लक्षात आले की अजयचे काहीतरी बिनसले आहे. त्याचे डोळे काही तरी बोलू इच्छित आहेत. समृद्धीशी काही कटू बोलणे झाले असेल का? लाडाकोडात तळहाताच्या फोडागत सांभाळलेली समृद्धी निंबाळकरांकडे सुपूर्द केली. दोघांनी अगदी काळजावर दगड ठेवला होता. तिचा प्रेमविवाह असल्याने दोघे काहीही बोलू शकले नाहीत. लग्नानंतर पाच-सहा महिन्यांतच भांड्याला भांडे लागू लागले. शिकल्या-सवरलेल्या समृद्धीने स्वयंपाकघरात सदैव आपल्याला बांधून ठेवावे आणि घरादाराला खुश ठेवावे, अशी तिच्या सासूबाची अपेक्षा होती. अर्थातच करिअरिस्ट समृद्धीला ते मानवणारे नव्हते. तिचा पती सौरभ सर्वांसमोर तिची बाजू घेऊ शकत नव्हता. दिवसेंदिवस तिची मानसिक कुंचबणा वाढत चालली होती. फोनवरून नकळत वडिलांकडे व्यक्त केली जात होती. अजयचे पित्याचे मन मग तडफडत असे. समृद्धी आईपेक्षा बाबाकडे जास्त मन मोकळे करीत असे. आजही नक्कीच काहीतरी तिच्या मनाविरुद्ध घडले असणार आणि इकडे अजयचा जीव कासावीस झाला असणार. सुधा म्हणाली, ‘मला इथेच उतरायचे आहे. आप्पांना भेटायचे आहे. त्यांच्यासाठी डॉक्टर त्यांच्या घरी येणार आहेत. येते मी तासाभरात.’ तसा अजयही तिच्यासोबत निघाला आणि म्हणाला, ‘मला आप्पांना भेटायचंय. चल मीही येतो.’ सुधाला वाटले स्वत:ला चिमटा काढून पाहावा. स्वप्न की वास्तव तिला कळेना. वाद घालायची ती वेळ नव्हती. क्षणभर तिला वाटले त्याला अपमानित करावे. त्याने आप्पांना अकारण जो मानसिक त्रास दिलाय त्याचा जाब विचारावा. पण वाद घालायला तिला त्राण नव्हते. आप्पांच्या काळजीने ती भांबावून गेली होती. आप्पांचे बरे-वाईट झाले तर आपल्यात कोण असणार आहे भावनिक आधार द्यायला! तिच्या पाठोपाठ तोही आप्पांजवळ उभा राहिला. त्याला पाहताच आप्पांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एकाच गावात राहून आज अनेक वर्षांनी सासरे-जावई एकमेकांना भेटत होते. गैरसमजाच्या भिंतीमुळे एकमेकांना दुरावले होते. आप्पांबद्दल अजयच्या मनात आकस होता आणि आज अचानक त्याला आप्पांना भेटावेसे वाटले. आस्थेवाईकपणे त्यांच्या तब्येतीबद्दल त्याला विचारावे असे वाटले. त्यानंतर दोघेही कितीतरी तास एकमेकांशी बोलत राहिले. जणू काही मधल्या काही वर्षांचे राहिलेले बोलणे त्यांना भरून काढायचे होते. खूप दिवसांनी आप्पा समाधानाने हसले होते. गप्पांच्या ओघात समृद्धीचा विषय निघताच हळवा झालेला अजय तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊन गेला.
स्वत:च्या लेकीला होत असलेला मानसिक त्रास ऐकताच त्याला आप्पांच्या मानसिकतेची जाणीव झाली असावी आणि कदाचित आपण त्यांना अकारण दिलेल्या मनस्तापाबद्दल पश्चात्तापही झाला असावा. सुधाला आतून उमाळा दाटून आला. अकारण तिलाही खूप सहन करावे लागले होते. त्यामुळे आता ती निश्चल पुतळ्यागत झाली होती. हळुवारपणे सुधाचा हात हातात घेत अजय म्हणाला, ‘सुधा, चलायचंय ना घरी?’
swatipachpande@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.