आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बांधणी’ प्रेमाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हॅलेंटाइन डे, वसंतपंचमी... Romance is in the air.' लव्ह स्टोरीज... लीजंड्स...कृष्ण-रुक्मिणी, पृथ्वीराज-संयोगिता, जोधा -अकबर, राजेशाही सरंजाम, थाटमाट, दिमाख, उंची कला- संस्कृती, राजस्थान (तेव्हाचं) राजपुताना, गुजरात... (एकापुढे एक तरळणा-या या प्रतिमा एक खास मूड तयार करतात!)
लाल, काळा, हिरवा, पिवळा, निळा, गुलबक्षी... या रंगांची उधळण करत एका खास साडी प्रकाराचा जन्म होतो- तुमच्या, आमच्या सर्वांच्या आवडीचा बांधणी, बंधेज. संस्कृत ‘बंध’पासून आलेला हा शब्द मनात आणि वॉर्डरोबमध्ये केवढी रंगत आणतो! नावाप्रमाणेच कापड ‘बांधून’ रंगवण्याचा हा विशिष्ट प्रकार. कधी केवळ दो-या ने, तर कधी कुठल्याशा गोष्टी (दाण्यापासून लाकडाच्या तुकड्यापर्यंत) गुंडाळून हे कापड ‘बांधले’ जाते व मग रंगात बुडवले जाते. घट्ट बांधल्यामुळे किंवा दो-याचा ताण असल्यामुळे रंगाला या ठिकाणी अटकाव होतो, तो शिरू शिकत नाही. अशा प्रकारे कमी-अधिक, गडद-फिकट अशा रंगछटा देत हे कापड तयार होते. (विकत घेतानासुद्धा कित्येक वेळा आपण हे याच स्थितीत बघतो. नमुन्यादाखल एक टोक उलगडून दाखवले जाते. नुसते उलगडून (इस्त्री न करता) वापरल्यास याचा काही वेगळाच नूर असतो. (हे त्याची authenticity पटवण्यासाठी केले जाते.)

कारण स्क्रीन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली आणि तिने हे ‘घंटों का काम मिंटो में’ करायला सुरुवात केली. रंग पक्के झाले. बल्क प्रॉडक्शन झाल्यामुळे किंमतही उतरली. मात्र साचेबद्धपणा आला. हाताने बांधलेल्या, रंगवलेल्या बांधणीची नजाकता म्हणूनच अवीट राहिली. मुळात ‘बंधने’ तयार करण्यातली एक मूळ कल्पना अशी आहे, ‘या लोकांची विचारसरणी, जीवन.’ जगण्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानच त्याच्याशी बांधलं गेलंय. त्यांच्या मते ‘कापड’ म्हणजे ‘आयुष्य’ व ‘रंग’ म्हणजे ‘प्रेम.’ त्यायोगे प्रेमासाठी आयुष्य नव्हे, आयुष्य आहे म्हणून प्रेम असतं! अर्थात म्हणून बांधणीच्या ‘कच्च्या’ रंगांचं त्यांना वावगं वाटत नसावं! आणि ‘कापड विरलं तरी रंग जशाचा तसा राहिला’ याचं कौतुकही नसावं! रंग गेल्यास पैसा ‘अक्षरश:’ पाण्यात गेला याचं जसं आपल्याला दु:ख होतं तसं आपली एवढी मेहनत ‘धुऊन’ गेली, याचं त्यांना काहीच वाटत नसेल का? असो. हे सर्व कपडे ड्राय क्लीन करूनच वापरावे. शक्यतो पहिल्या वा दुस-या ड्राय क्लीनला रंग पक्का होतो. तरी एक टोक धुऊन खात्री करून घ्यावी, हे बरे.

बांधणी म्हटलं की बुट्टीदार वा ठिपकेदार फुलं, वेली, हत्ती, मोर इ. आपल्या नजरेसमोर येतं. हे जरी खरं असलं तरी याचे आणखी अनेक प्रकार आहेत. लेहेरिया, मोठारा, पिलिया, पटोला, शिबोरी इ. मुख्य प्रकार. मुख्यत्वे बांधण्याच्या पद्धतीनुसार नाव पडतं. क्वचित मुळातल्या मुख्य रंगामुळे. जसं ‘लेहेरिया’ म्हणजे लहर/ लाट, तरंगच जणू पाण्याचे उठताना दिसावे. यात निळा रंग खास करून वापरला जातो.
तर मोठारा म्हणजे ज्यात बांधणीचे ठिपके अगदी बारीक ‘डाळी’ एवढे मोठे असतात.
‘पिलिया’ ही पिवळ्या रंगाची खास बांधणी स्त्रीस पहिल्या बाळंतपणानंतर देतात. ती माता झाल्याबद्दलची ही खास भेट असते.

‘पटोला’ पाटणची (गुजरात) यात डिझाइन चौकटीचे असते व प्रत्येक चौकटीत एक बुट्टा बसवलेला असतो. शक्यतो सिल्कमधला हा साडी प्रकार अत्यंत कलाकुसरीचा, नयनरम्य (व किमती) नववधूसाठी असतो.
(आपल्यास आश्चर्य वाटेल पण थोडासा बांधणी प्रकार हरियाणाकडेही आढळतो. तसेच याचे विदेशी अवतार ‘शिबोरी’ जपान व इतर काही थायलंड, इंडोनेशिया इ. व काही तर आफ्रिकेतही आढळतात.) बांधण्याची पद्धत, त्याला लागणारी मेहनत, त्याचा उठाव, वेगळेपण व त्यासाठी वापरलेलं कापड-सुती-मलमल, सॅटिन, सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, क्रेप व रंगप्रकार-साधे/सिंथेटिक/नैसर्गिक या सर्वांवर यांची किंमत ठरते. रु. 350 पासून 700-2000ची मजल- दरमजल करीत ही जरी-बोर्डर, भरतकाम, आबला वर्क, टिकी वर्क करीत 25,000 रुपयांच्या पलीकडे जाते! मोहेंजोदडो-लोथळपासून अजिंठ्याच्या लेणीमधून, चित्रांतून, डोकावणारा हा प्रकार गुजरात- राजस्थानचा ट्रेडमार्क आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तो आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. याला कोठेच अटकाव नाही. हिंदी सिनेमा, फॅशन शोज, हिप्पी फॅशन, आबालवृद्धांमध्ये. बांधणी सगळ्यांची आहे व सगळे हिचे आहेत. तरीही मुळात ‘ओढणीचा’ वा पगडीचा हा प्रकार ‘साडी’त छान स्थिरावला व ‘डेरा टाकून’ आहे. हिच्याशिवाय आपला वॉर्डरोब पूर्ण होणे नाही व एक प्रकाराची असेल तर तिच्या इतर सख्या असायलाच हव्या...

meghana.shrotri@gmail.com