आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नमस्ते मित्रमैत्रिणींनो!
‘वक्ता दशसहस्रेषु’ मधला हा शेवटचा भाग! ‘वक्ता दशसहस्रेषु’मधून गेले काही आठवडे वक्तृत्वकलेच्या अनेक प्रकारांची ओळख आपण करून घेतली. तुम्हा वाचकांचे अभिप्राय, ई-मेलमधून वेळोवेळी माझ्यापर्यंत पोचत होते. त्यामधून तुम्ही विचारलेल्यापैकी काही निवडक प्रश्नांच्या आधारे आज मी समारोप करणार आहे.
बरेचदा वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना येणारी अडचण म्हणजे ‘स्टेज डेअरिंग’. पन्नास-शंभर श्रोत्यांपुढे उभं राहून बोलायचं म्हटलं की आधीच दरदरून घाम फुटतो. पाय थरथरू लागतात (याला अनुभवी लोक ‘ब्रेकडान्स’ म्हणतात) आणि या सगळ्या धामधुमीमध्ये पाठ केलेलं भाषण विसरायला होतं. मग अजूनच पंचाईत! यावर मी एक सोप्पा उपाय सुचवणार आहे. तो म्हणजे पाठ केलेलं भाषण आरशासमोर उभं राहून, आरशात बघून म्हणायचं. आरशासमोर उभं राहायचं कारण डोक्यापासून पायापर्यंत प्रतिबिंब दिसलं पाहिजे आणि आरशात बघून म्हणायचं. कारण स्वत: स्वत:ला बघून म्हणत असताना, एकीकडे कुणीतरी आपल्याकडे बघतंय हीही भावना मनात असेल आणि त्याच वेळी तोंडून भाषणही म्हटलं जात असेल. व्यासपीठावरून भाषण करताना एकाच वेळी अनेक डोळे आपल्याकडे रोखलेले आहेत ही भावना अस्वस्थ करणारीही असते आणि प्रसंगी उत्साह वाढवणारीही. त्यामुळेच ती भावना आपल्याला आपला परफॉर्मन्स उंचावण्यासाठीच उपयोगी पडली पाहिजे, याकडे आपण लक्ष द्यावे, हे उत्तम!
याव्यतिरिक्त स्पर्धकांना नेहमी जाणवणारी अडचण म्हणजे मुद्दे विसरणे! भाषण तयार करताना पानभर मुद्दे निघतात आणि तिथे गेल्यावर जेमतेम दोन चार मुद्द्यांनंतर काहीच आठवेनासे होते. हे विशेषत: उत्स्फूर्त स्पर्धेच्या वेळी घडते. (वाद अथवा नियोजित वक्तृत्वामध्ये पूर्ण भाषण लिहून तयार करता येते). अशा वेळी एक सोपी युक्ती नेहमी हमखास मदत करते. दोन मुद्द्यांमध्ये कायम दुवे ठेवायचेच. आणि हे दुवे प्रामुख्याने एखाद्या शब्द-वाक्य यांचे असावेत. उदाहरणार्थ, ‘लव्ह लेटर’ हा विषय उत्स्फूर्त स्पर्धेमध्ये आला असेल, तर, दुवे असे ठेवता येतील -
मुद्दे - संदीप खरेची कविता, लव्ह लेटरची गरज/उपयोग, गाजलेली लव्हलेटर, ‘लव्ह लेटर’चे सध्याचे प्रकार - पत्र, ई-मेल, एसेमेस, ग्रीटिंग कार्ड्स, कविता.. अखेरीस समारोप कविता (आठवल्यास).
हे मुद्दे अगदीच दिशादर्शक आहेत. यांचे वाक्यांमध्ये रूपांतर करून चार मिनिटे कशी निभावता येतील ते बघूया. सध्याचा आघाडीचा कवी संदीप खरे आपल्या एका कवितेमध्ये म्हणतो -
‘लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं,
थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं!’
प्रेम ही नितांतसुंदर भावना शब्दात व्यक्त करायला, प्रेमाची खात्री पटवून द्यायला, प्रेयसीच्या आठवणींने व्याकूळ होऊन घातलेली साद म्हणजे लव्ह लेटर!
ही साद कधी इतिहासातून ऐकू येईल, तर कधी वर्तमानातून. सावरकरांनी मातृभूमीच्या विरहाने व्याकूळ होऊन ’ने मजसी ने’ ही साद घातली होती, तेही एक प्रकारचे प्रेमपत्रच होते शहरामध्ये राहणा-या मुलाशी खेड्यातल्या आईचा होणारा पत्रव्यवहार हे एका वेगळ्या लव्ह लेटरचंच उदाहरण नाही का? सध्याच्या जमान्यातला पत्रव्यवहार ‘बडे वतन के बाद, हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आयी है, चिट्ठी आयी है’, यातून व्यक्त होणारी भावना हेही एक प्रकारचे लव्ह लेटरच.....
चिट्ठी, पत्रांचा जमाना संपून सध्या आपण ई-मेल्सच्या जमान्यात आलो आहोत. एसेमेस, एमएमएस, ऑ नलाइनच्या हायटेक युगात ‘लाइन’ शोधत फिरणा-या सध्याच्या पिढीला सगळं फास्ट हवंय.......
लव्ह लेटरचे प्रकार बदलतील, पण लव्ह लेटरमधल्या पहिल्या शब्दाची उत्सुकता, हवीहवीशी ओढ कायम राहिल.
इंदिरा संतांच्या एक नितांतसुंदर कवितेचा उल्लेख करून मी निरोप घेतो -
‘पत्र लिही, पण नको पाठवू, शाईमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळीमधुनी, नको पाठवू हसू लाजरे
पाठविशी जे ते ते सगळे, पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र मात्र त्यानंतरचे, वाचायाचे राहून जाते’
वरील भाषणामध्ये गाळलेल्या जागी मुद्दे तुम्ही भरायचे आहेत. एका मुद्द्याकडून दुस-या कडे नेणारे दुवे नक्की बघा. भाषणासाठी माहिती गोळा करण्यासाठी सध्या इंटरनेटइतकं प्रभावी माध्यम नाही. गुगल काय वाट्टेल ते शोधून देऊ शकतं, असे सध्याचे दिवस आहेत. तरीही, विन्स्टन चर्चिल, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन यांची उत्तमोत्तम भाषणे माहितीजालावर मिळतील. ‘टॉप 100 स्पीचेस’ असा सर्च करा आणि बघा काय खजिना गवसतो ते!
तर दोस्तहो! आता थांबतो. अबोल, आत्मकेंद्री आणि स्वार्थी होत चाललेल्या सध्याच्या जगामध्ये मने जुळवण्यासाठी उमदा, निखळ, प्रेमळ संवाद साधू शकणा-या व्यक्तींची नितांत गरज आहे. अशा संवादकलेवरील प्रभुत्त्वासाठी तुम्हाला शुभेच्छा!
nachiket.xcoepian@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.