आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमाची गोष्ट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी येणारी ‘द एंड’ची पाटी पाहणं मजेशीर असतं. विवाह मंडपात प्रेमाची इतिकर्तव्यता झाल्याचा समज (?) दृढ करणारी. ‘ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड’ या न्यायाने ही पाटी पडद्यावर झळकते. जिथून ख-या गोष्टीला सुरुवात होते तिथेच दिग्दर्शक मंडळी सगळं संपल्याचा संदेश देऊन मोकळी होतात. मसालेदार मनोरंजन म्हणून प्रेक्षक खुश, पैसा वसूल म्हणून मालक खुश. या पलीकडे चित्रपटातल्या प्रेमकथा फारशा लक्षात राहत नाहीत. याउलट उत्तम मांडणी असलेल्या, वैचारिक बैठक लाभलेल्या प्रेमकथा वाचल्यानंतर त्या मनात रेंगाळतात. व्हॅलेंटाइन डे आणि वसंत पंचमी अशा दुग्धशर्करा योगाच्या निमित्ताने मराठीतल्या काही सुंदर प्रेमकथा वाचनात आल्या. प्रथमदर्शनी प्रेमात पडलेली, गवसलेल्या प्रेमाची आयुष्यभर वाट पाहणारी, तर कधी पूर्वायुष्यातल्या जखमांवर हळुवार फुंकर घालणारा जोडीदार मिळाला म्हणून नव्याने डाव मांडण्याची जिद्द बाळगणारी प्रेमी युगुलं या कथांमधून भेटली. प्रेमाचा नव्याने अर्थ सांगणारी, आयुष्याच्या चित्रात चाकोरीबाहेरचे रंग भरू पाहणारी.

चक्रधर आणि हॅर्टा
जर्मन आणि ज्यूंमधील वंशद्वेषाच्या पार्श्वभूमीवरची ही प्रेमकथा. दुस-या महायुद्धाची बीजं ज्या काळात पेरली गेली त्या संदर्भाला अनुसरून विश्राम बेडेकरांनी लिहिलेली. एकाच बोटीवर अवघ्या दहा दिवसांत एकमेकांच्या प्रेमात बुडालेले चक्रधर आणि हॅर्टा यांच्या प्रेमाची साक्ष देणारी ‘रणांगण’ ही कादंबरी. ज्यूंचा अतोनात छळ आरंभलेला हिटलर त्यांना जर्मनीबाहेर हाकलतो. पूर्वेकडील देशांमध्ये आसरा मिळण्याच्या आशेने निर्वासित प्रवासाला निघतात. हॅर्टा अशाच प्रवाशांपैकी. तिरस्कार, अपमान, सुडाचा आघात करणा-या जर्मनीमधून बाहेर पडते. कार्ल फ्रान्झ या जर्मन प्रियकराच्या आठवणींना तिलांजली देते. त्याच वेळी पहिल्या प्रेमातली विफलता विसरण्यासाठी सफरीवर निघालेला चक्रधर तिला भेटतो. प्रेमाचा आधार हरपलेली ती दोघं प्रथमदर्शनीच प्रेमात पडतात. बोटीवरच्या सहप्रवासात एकमेकांसाठीच जगतात. मुंबई मुक्कामी चक्रधर उतरतो. हॅर्टा पुढे शांघायसाठी प्रवास सुरू ठेवते; पण चक्रधरच्या वियोगाने व्यथित झालेली हॅर्टा नंतर आत्महत्या करते.

पूर्वायुष्यातल्या विस्कटलेल्या प्रीतीचे चटके सोसूनही, मनावर नव्या मायेची फुंकर घालू पाहणारी, बोटीवरच्या स्नेहाचे क्षण निसटू न देणारी, अल्पायुषी नात्याला भविष्य नाही हे उमजूनही स्वत:ला परस्परांवर समर्पित करणारी, एकमेकांच्या स्पर्शाने बेभान होण्याचा आनंद घेताना लोकलज्जेकडे पाठ फिरवण्याचा धीटपणा दाखवत स्वत:शी प्रामाणिक राहणारी ही चक्रधर-हॅर्टाची जोडी. परिस्थिती-सामाजिकतेमुळे वाट्याला आलेलं अपरिमित दु:ख सोसल्यानंतर एकमेकांच्या मिठीतले उबदार क्षण जशी ही जोडी आसुसून जगते तितक्याच कणखरपणे विभक्त होण्याचं वास्तवही डोळसपणे स्वीकारते. प्रेम सुस्थित जीवनात जगतं, रणांगणावर नाही हे चक्रधरचं वाक्य वाचणा-याला अंतर्मुख करून जातं.

नंदिनी आणि मिलिंद
माणसाला आयुष्यभर सतत कसली तरी प्रतीक्षा असते. अनेकांच्या बाबतीत आयुष्य संपतं, पण प्रतीक्षा संपत नाही. मात्र, प्रतीक्षेचे क्षण संपून सुखाची पालवी फुटण्याचं भाग्य काही जणांना लाभतं. रणजित देसार्इंच्या ‘प्रतीक्षा’मधली नंदिनी-मिलिंद ही जोडी अशाच भाग्यवंतांपैकी एक. लग्न होण्याआधीच दुर्दैवाने नियोजित वरापासून तिला दिवस जातात. त्यातच नियोजित वराचा लग्नाआधीच मृत्यू होतो. कुमारी माता बनल्याने समाजाने नाकारलेली नंदिनी गोपालपूर गावातल्या साधूबाबांकडे आश्रय घेते. ते तिचा मुलीच्या मायेने सांभाळ करतात. पहिलं प्रेम नाकारले गेल्याने व्यथित झालेला मिलिंद भटकत-भटकत बाबांच्या आश्रमात पोहोचतो. तिथल्या वास्तव्यात नंदिनीच्या प्रेमात पडतो. नंदिनी सुरुवातीला त्याचे प्रेम नाकारते. मात्र, बाबांनी समजावल्यावर ती मिलिंदच्या प्रेमाचा स्वीकार करते. शेवटी मिलिंद-नंदिनी, नंदिनीचा मुलगा नवीन आयुष्याला सुरुवात करतात. मनाजोगतं प्रेम मिळालं नाही म्हणून कृष्णभक्तीत लीन झालेली, आयुष्याबद्दल कृतज्ञता बाळगणारी, निरपेक्ष वृत्तीची, जीवनातल्या अनुभवांनी हळवी, पण तितकीच कणखर बनलेली नंदिनी. आणि याउलट स्वभावाचा मिलिंद. जीवनाबद्दल कटुता ठेवणारा, मनातल्या अशांततेमुळे शाश्वत प्रेमाच्या शोधात निघालेला, कायम स्वत:च्या दु:खात गुरफटलेला.

दोघंही भिन्न स्वभावाची. त्यांना गुंफणारा धागा आहे त्या आश्रमातले बाबा. प्रेम हवं असेल तर आधी ते निरपेक्षपणे द्यायला, स्वत:कडे प्रामाणिकपणे पाहायला शिका असं सांगणारे. मिलिंदच्या सर्व शंकांचं समाधान ते करतात. मनातलं दु:ख जाणणारं, ते दु:ख उपभोगणारं माणूस ज्यांंच्या आयुष्यात नसतं, त्यांचं दु:ख एकटं असतं. मात्र, ज्यांना असं माणूस गवसतं, त्यांना जगण्यातला सूर सापडतो. कायावाचामनाने एकत्र होत ती दोघं एकरूपतेचा साक्षात्कार घेऊ शकतात. अशीच एकरूपता शेवटी नंदिनी-मिलिंदला लाभते.

सावित्री
परस्परांच्या सहवासात प्रेम फुलतं. मात्र, वियोगाने ते अधिक परिपक्व होतं. अशाच परिपक्वतेचा, तृप्ततेचा आविष्कार दिसतो पु.शि. रेगेंच्या सावित्री प्रेमकथेत. दूरदेशीच्या प्रियकराशी पत्रांतून संवाद साधणारी नायिका ही कादंबरीची नायिका. आईच्या मायेला पारखी झालेली. कामात व्यग्र असणा-या वडिलांच्या सावलीत वाढलेली सावित्री अर्थात साऊ. साऊचे वडील, त्यांचे स्नेही एजवर्थ, साऊला मुलीसारखा जीव लावणारी राजम्मा यांचे प्रसंगानुरूप उल्लेखही यामध्ये डोकावतात. ही कादंबरी छोटेखानी पत्रामध्ये विभागली आहे. साऊचा प्रियकर तिला प्रत्यक्ष भेटल्याचा उल्लेख केवळ एकदाच आहे; पण पत्ररूपाने दोघंही सतत सान्निध्यात असतात. साऊने पाठवलेली 34 पत्रं यात आहेत. त्यातून साऊ तिच्या प्रियकराशी गप्पा मारते. या गप्पांमध्ये विषयांचा उथळपणा नाही. उलट सामाजिकतेचं भान आहे. त्यांतून साऊची संवेदनशीलता, वैचारिक बैठक नजरेत भरते. या पत्रांमधून साऊ प्रीती, अनुराग, प्रेम यांसारख्या शब्दांची अपूर्वाई वाटत नसल्याचं सांगते. या शब्दांचा वापर स्वत:ला स्थिर करण्यासाठी करतो असं साऊला वाटतं. प्रियकराबद्दलचं आकर्षण मर्यादा न ओलांडता व्यक्त करण्याचं धाडसही ती दाखवते. एकमेकात परस्परांसारखं होऊन विरघळून जाणं, या देवघेवीनं दोघांनीही समृद्ध होण्याचा आग्रह ती धरते. प्रेमाच्या नात्याबद्दल स्पष्टता असणारी, प्रियकराचं मन जाणण्यासाठी आधी स्वत:च्या मनाचा थांग शोधणारी साऊ पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटते.


प्रभाकर पेंढारकरांची रारंग ढांग, फ.म. शहाजिंदे यांची ‘मी-तू’, ना.धों. महानोरांची ‘अजिंठा’, ना.सं. इनामदारांची ‘राऊ’ याही अशाच काही प्रेमकथा. काही अव्यक्त, तर काही विफल प्रेमाच्या. मनातल्या प्रेमभावनेला श्रद्धेची-विश्वासाची जोड मिळाली तरच जोडीदारासोबत सर्वार्थाने एकरूप होता येते. अशी शाश्वत सोबत आयुष्यभरासाठी प्रत्येकालाच हवी असते; पण स्वत:ला हरवल्याखेरीज शाश्वत असं काहीच गवसत नाही, नाही का?

vandana.d@dainikbhaskargroup.com