आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसिका ग्रंथींची सूज ( lymoh nodes)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लसिका ग्रंथी (lymoh nodes) या मानेभोवती, काखेत, जांघेत आणि शरीराच्या इतर भागात असतात. शरीराच्या संरक्षक अशा रोगप्रतिकारक्षम यंत्रणेत त्या मोलाची भूमिका बजावत असतात. सर्दीसारख्या किरकोळ जंतुसंसर्गावेळीही या लसिका ग्रंथींना सूज येऊ शकते. लसिका ग्रंथींनाच संसर्ग झाला तर त्या सुजतात किंवा इतर आजारांचे चिन्ह म्हणून त्या सुजलेल्या असतात. अशा ग्रंथींची कसून तपासणी केल्यास अशा सुजलेल्या लसिका ग्रंथीवर उपचार करावे लागतील किंवा नाही हे डॉक्टरांना ठरवता येते.


मानवाच्या रोगप्रतिकारक्षम यंत्रणेचा एक भाग असलेल्या लहान लहान लसिका ग्रंथी या नॉर्मल असतात. बॅक्टेरिया किंवा इतर जंतूंच्या प्रसाराला अटकाव घालण्याचे काम त्या करत असतात. त्यांच्या वाढीची कारणे
जंतुसंसर्ग (infection) :
सर्दीसारख्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये त्यांची वाढ होणे हे सर्वात अधिक आढळणारे कारण आहे. शरीराच्या ज्या भागात जंतुसंसर्गाची बाधा झाली आहे त्या भागातील लसिका ग्रंथी सुजतात उदा. पायाला जखम झाली असेल, त्यात पू भरला असेल तर जांघेतल्या लसिका ग्रंथी सुजतात.
infections mononucleosis सारख्या आजारात शरीरातल्या वेगवेगळ्या भागातल्या लसिका ग्रंथींना सूज येते उदा. मानेभोवतालच्या, काखेतल्या लसिकाग्रंथींना सूज येते.
कुठल्याही प्रकारे शरीराच्या एखाद्या भागाचा दाह झाला ( inflammation) तर तो लसिका ग्रंथींना सूज आणण्यास कारणीभूत ठरतो. कधी कधी ढेकूण किंवा कोणत्याही प्रकारचा लहान किडा चावल्यानेही त्या सुजतात. शरीराच्या ज्या भागात किंवा अवयवात कॅन्सर झाला असेल तर तिथल्या कर्कपेशी या लसिका ग्रंथींच्या माध्यमातूनच फैलावत असतात.
लसिका ग्रंथीची सूज :
लसिका ग्रंथीला सूज आल्यास त्वचेखाली गोलाकार गाठी येऊ लागतात. सामान्यत: त्यांचा आकार 1 सेंटिमीटरपेक्षा जास्त असल्यास त्या सुजल्या असे म्हणता येईल.
मानेतल्या लसिका ग्रंथीला येणारी सूज ब-याच रुग्णांत मोठ्या प्रमाणावर आढळून येते. सुजण्याचे कारणही बहुतांशी वेळा सर्दीसारखे व्हायरल इन्फेक्शनच असते. कधी-कधी काखेतल्या तर कधी जांघेतल्या लसिका ग्रंथी सुजतात. पण ब-याचदा हाताला न लागणा-या ठिकाणी त्या सुजलेल्या असतात उदा. डोके, पोट, ओटीपोट, छाती किंवा पाय. कधी-कधी तुमच्या मुलाच्या एका ठिकाणच्या (local) लसिका ग्रंथी सुजलेल्या असतात, तर कधी शरीराच्या ब-याच भागात त्या सुजतात (generalized) जर त्या मऊ असतील, दुख-या लालसर नसतील अन् त्या हलवण्याजोग्या असतील तर त्याचं कारण ब-याचदा साधं व्हायरल इन्फेक्शन असतं. पण जर त्या दुख-या असतील, वरची त्वचा तापली असेल तर त्या लसिका ग्रंथी त्यांनाच झालेल्या जंतुसंसर्गामुळे सुजलेल्या असतात. (adenitis)जर कॅन्सरची शक्यता असेल तर त्या गाठी घट्ट, टणक, न हलणा-या, एकमेकांना चिकटलेल्या असतात. जर त्या गळ्याच्या हाडाखाली म्हणजे खांदा-छातीला जोडणा-या हाडाखाली सुजलेल्या अवस्थेत असतील तर ते एक गंभीर आजाराचे चिन्ह असते.
लसिका ग्रंथीची कसून तपासणी केल्यास रोगाचं कारण निश्चित करता येतं. सर्दीसारख्या विषाणू संसर्गामुळे सुजलेल्या गाठी आपोआप ब-या होतात. त्या नाहीशा होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. जर त्या गाठी स्वत: संसर्गामुळे (adenitis) सुजलेल्या असतील तर अँटिबायोटिक्सच्या उपचारांनी त्या नाहीशा होतात. पण जर त्यांचं सुजणं असाधारण असेल किंवा काही विशिष्ट ठिकाणी असाधारणपणे त्यांची वाढ झालेली असेल तर संभाव्य गंभीर आजाराचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात.