आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘यंत्रालयाचा ज्ञानकोश’चे संक्षिप्त रूपांतरण आता इंग्रजी भाषेमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राला व्यासंगाची एक मोठी परंपरा आहे. त्या परंपरेतून विविध प्रकारचे ‘कोशसाहित्य’ जन्माला आले आहे. हे कोश निर्माण करणारे संशोधक-लेखक ‘एकला चलो रे’च्या ज्ञानवृत्तीने झपाटलेले होते. ज्ञानभाषेतील अद्ययावत लेखन मातृभाषेत आणण्याच्या प्रक्रियेत कोशांना अनन्यसाधारण महत्त्व असते. सोळा भारतीय भाषांमधील शब्द सांगणारा ‘भारतीय व्यवहारकोश’, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा भारतीय चित्रकोश व शब्दकोश आणि डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्रामुख्याने संपादकीय जबाबदारी सांभाळलेला ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ ही चटकन नजरेपुढे येणारी काही ठळक उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर शंकर गोपाळ भिडे यांनी महत्प्रयासाने सिद्ध केलेल्या ‘यंत्रालयाचा ज्ञानकोश’ची दखल मराठी वाङ्मय जगतास घ्यावी लागेल. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांकडे मराठीतील मान्यवर संस्थांनी आणि व्यक्तींनी लक्ष दिले नाहीत, किंबहुना उपेक्षाच केली. आता या ज्ञानकोषाचे संक्षिप्त रूपांतर इंग्रजीत करून त्याचे एक छोटेखानी पुस्तक बाजारात आणले आहे. हे इंग्रजी पुस्तक राज्य मराठी विकास संस्थेतर्फे विक्रीस उपलब्ध असेल.


कोशकारांची उपेक्षा मराठीत नवीन नाही, पण भिडे यांच्या या कामाचे मोल वेळीच ओळखून मराठीत साहित्यिक चळवळी उभारलेल्या संस्थांनी आणि व्यक्तींनी हा कोश प्रकाशात आणण्यास हातभार लावला असता, तर भिडे यांची ही झुंज एकांडी ठरली नसती आणि मराठीत एका चांगल्या कोशाची भर घालण्यासाठी हातभार लावल्याचे श्रेयही संबंधितांना मिळाले असते. शंकर गोपाळ भिडे, हे ऐंशी ओलांडलेले एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व आहे. अनेक कारखान्यांमधून अ‍ॅप्रेंटिसशिप करणा-या मुलांनाही विज्ञान-यंत्रज्ञान-तंत्रज्ञान मराठीतूनच मिळावयास हवे हे भिडेंच्या लक्षात आले आणि त्यातून कोशाची ही कल्पना साकारली, पण हा कोश इतर कोशांपेक्षा अनेकार्थांनी वेगळा, अद्वितीय आणि अशा प्रकारचा मराठी भाषेतील पहिलाच असावा.


यंत्रोपकरण निर्मितीच्या क्षेत्रातील, यंत्रालयाशी संबंधित विषयांची अद्ययावत माहिती भिडे यांनी ज्या महत्प्रयासांनी मराठीत आणली आहे, त्याला तोड नाही. यंत्रावर काम करणारा साधा कामगार असो वा इंजिनिअर, त्याला या यंत्राची नसन्नस माहीत असेल तरच तो आपल्या कामाला न्याय देऊ शकतो. त्यासाठी, डॉक्टरला ज्याप्रमाणे शारीरविज्ञान ज्ञात असावे लागते, तसेच कामगाराला आपल्या यंत्राचे अंतरंग पाठ असायला हवे. हे ज्ञान कामगारापर्यंत साध्या भाषेत आणण्याचा भगीरथासारखाच प्रयत्न भिडे यांनी केला आहे.


स्वराज्यानंतर मात्र देशात ब-याच ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालये, तांत्रिकी विद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात उघडण्यात आल्या आणि अभियांत्रिकी शिक्षणाची, तसेच औद्योगिक प्रशिक्षणाची गरज ब-याचअंशी पूर्ण झाली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत मात्र देशी व इंग्रजी अशा पद्धतीने विषय शिकवले जातात. पुष्कळ वेळा ब-याच अभियांत्रिकी संस्थांमध्ये तसेच विशेषत: खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रात्यक्षिक शिक्षणासाठी अत्यावश्यक अशी यंत्रोपकरणे, प्रमापी साधने नसतात. त्यामुळे, अशा संस्थांतून बाहेर पडलेले विद्यार्थी कारखाना स्तरावर गेल्यावर तिथली वास्तव परिस्थिती पाहून हताश होतात. त्यांच्या उत्साहावर पाणी पडल्यामुळे निरुत्साही बनून तिथल्या कळपात मूकपणे सामील होतात.


ब-याच शिक्षण व प्रशिक्षण संस्थांतून अभियांत्रिकी आणि संबंधित विषयांची पुस्तके सहज प्राप्त होतील, अशी ग्रंथालये नाहीत. ज्या ठिकाणी देशी भाषेतून प्रशिक्षण देतात त्या ठिकाणी देशी भाषेतील अभियांत्रिकी विषयावरची चांगली पुस्तके नसतात. वर्तमान जगात अभियांत्रिकी विषयाची पुस्तके इंग्रजी भाषेत जगभर प्रसिद्ध होत असली तरी त्या पुस्तकांच्या लेखकवर्गात भारतीय लेखकांची संख्या जवळपास नगण्य ठरावी अशी आहे.
महाराष्ट्रापुरते लिहायचे झाल्यास असे लिहिता येईल की, मार्च 1969मध्ये महाराष्ट्र शासनाने विद्यापीठीय स्तरावर मराठी पुस्तके तयार करण्यासाठी महाराष्ट्Ñ विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ स्थापन केले होते. या मंडळातर्फे काही विषयांची चांगली पुस्तके तज्ज्ञ मंडळींनी तयारही केली होती, पण त्यात काही कारणाने नंतर खंड पडला असे दिसते. तथापि, पुस्तके ज्या विद्यार्थ्यांसाठी तयार केली गेली तिथपर्यंतच्या साखळी प्रक्रियेतील दुवे कच्चे राहिल्याने त्या पुस्तकांना फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’तर्फे चार-सहा तांत्रिक विषयांची पुस्तकेही प्रसिद्ध केली गेली, पण या बाबतीतही साखळी प्रक्रियेतील दुवे कच्चे राहिले.


सदर ग्रंथात सर्वसामान्य कामगार, पर्यवेक्षक तसेत औद्योगिक प्रशिक्षण घेणा-या कुणाही विद्यार्थ्याला उपयुक्त ठरेल, अशी माहिती एकत्रितपणे दिले आहे. तसेच आजच्या औद्योगिक कामगार व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातला विद्यार्थी उद्याच्या जगात पर्यवेक्षक व्यवस्थापक व्हावा वा तशीच ईर्षा असल्यास त्याने स्वत:चा कारखाना स्थापून तो चांगल्या प्रकारे चालवावा, अशा दृष्टीने कर्मचारी प्रशिक्षण, यंत्रालय व्यवस्थापन इत्यादी आवश्यक विषयांची तपशीलवार माहिती देणा-या नोंदी दिल्या आहेत. नव्याने कारखाना स्थापन करून तो वाढवायचा, मोठा करायचा तर त्यासाठी यंत्रोपकरण निर्मिती क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण अशा व्यक्तींनी जे स्वत: कामगारच होते. स्वत:चे कारखाने कसे काढले व वाढवले ते नीटपणे समजावे म्हणून काही विदेशी कामगार मालकांची चरित्रविषयक माहितीही येथे दिली आहे.