आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhav Joshi Article About Wendy Doniger's Book Withdrawn

भावना दुखावल्या म्हणून वास्तव बदलत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेंडी डॉनिगर यांच्या ‘द हिंदूज’ या पुस्तकाच्या वितरणावर पेंग्विन प्रकाशनानेच स्वघोषित बंदी घातली, ती अयोग्य बाब आहे. न्यायालयात पुस्तकासंबंधी खटला चालू असताना प्रकाशकांनीच न्यायालयाबाहेर तडजोड करून हे प्रकरण मिटवावं, ही काही उचित प्रथा नाही. त्यामुळे लेखकांचा आणि वाचकांचा असंतोष उफाळून येणं स्वाभाविक आहे. पण यात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पेंग्विन ही एक व्यापारी संस्था आहे. त्यांच्या असंही लक्षात आलं असावं की, या न्यायालयीन कारवाईमुळे आपल्याला पुढे जाऊन नुकसानच होणार आहे, त्यामुळे त्यांनी बाहेर ही तडजोड केली असावी. दुसरं म्हणजे, हे प्रकरण न्यायालयात टिकणं अवघड आहे, हे लक्षात आल्यामुळेही त्यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही फक्त व्यावसायिक कारणे आहेत.
दुसरं असं, की 2009मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकावर आता वाद उफाळून यावा आणि त्यात पेंग्विनने हे पुस्तक मागे घेऊन त्याच्या प्रती नष्ट करण्याचा निर्णय घ्यावा, यामागची आणखी एक संगती लावता येऊ शकेल. ती म्हणजे, हे पुस्तक म्हणावं तसं विकलं गेलं नसावं आणि त्यामुळे त्याच्या खपासाठी मुद्दाम उठवण्यात आलेलाही हा वाद असू शकतो. ‘शिक्षा बचाव आंदोलन’ समितीनं या पुस्तकाविरुद्ध जो खटला दाखल केला, त्याला आता दोन वर्षे उलटल्यानंतर पेंग्विन असा निर्णय घेतं, यातलं हे गमक असू शकतं. दुसरं असंही आहे की, एवीतेवी या पुस्तकावर बंदी येण्याची शक्यता आहे तर उगाच धोका कशाला पत्करावा, असा हा सरळसरळ व्यापारी दृष्टिकोनही आहे. मागील दोन वर्षांत या पुस्तकाला फारशी मागणी नव्हती, तशी ती यापुढेही नसण्याची शक्यता त्यांनी गृहीत धरली असू शकते. डॉनिगर यांच्या पुस्तकात काहींच्या मते, मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यावरून कोणी उद्या काही बोलू नये, त्या आधीच पुस्तक मागे घ्यावं, असाही एक हेतू यात असू शकतो.
पुस्तकाच्या प्रती नष्ट करण्याच्या निर्णयावर अरुंधती रॉय, रामचंद्र गुहा यांनी या प्रकरणात पेंग्विनला आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलं आहे; पण त्यात एक प्रकाशक म्हणून पेंग्विनचीच बाजू योग्य आहे. त्यात अरुंधती रॉय या कादंबरीकार आहेत; त्या काही इतिहासकार नाहीत. हाच मुद्दा गुहांबाबतही आहे. ते इतिहासावर लिहितात; ते काही इतिहासतज्ज्ञ नाहीत. तेव्हा, कोणत्या कारणास्तव पुस्तक नष्ट करण्याचा निर्णय घेतला गेला, त्यामागील कारणं सांगण्यास वा त्या संदर्भात उत्तर देण्यास पेंग्विन बांधील आहे, असं मला वाटत नाही. पुस्तकाच्या बाबतीत अंतिम निर्णय हा प्रकाशकाचाच असतो आणि असलाच पाहिजे. त्यामागे त्याची अशी काही कारणं असतात; ती त्याने सर्वांना सांगितलीच पाहिजेत, असं काही नसतं. पेंग्विनचा हा निर्णय लेखकाच्या बांधिलकीचा अपमान करणारा आहे, असं काहींना वाटू शकतं; पण मुळात प्रकाशक आणि लेखक यांच्यात काय करार झाला, यावर ते जास्त अवलंबून आहे. डॉनिगर यांच्याशी चर्चा करूनच पेंग्विनने हा निर्णय घेतला असल्याचं सध्या तरी दिसतंय. त्यामुळे यात कोणाचा अपमान होण्याचा किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचाही प्रश्न नाही. मग इतरांनी त्या बाबतीत काय हवं ते म्हणावं, इथं प्रकाशकांना दोष देता येणार नाही.