आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अो गो बिदेशिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखिका लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे मराठीच्या अध्यापक आहेत. 
त्यांनी ‘डॉ. अरुणा रामचंद्र ढेरे यांची समग्र कविता’ हा प्रबंध पीएचडीसाठी नुकताच सादर केला आहे. 
 
काही दिवसांपूर्वी ऋतुपर्ण घोष या बंगाली दिग्दर्शकाने केलेली एक फिल्म पाहात होते. “जीबोनस्मृती.” रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या आयुष्यावर केलेली ही फिल्म आहे. जीबोनस्मृती हे ठाकुरांच्या स्मृतींचे आणि त्यांच्या आयुष्यातील घटनांच्या पडसादांचे पुस्तक आहे. त्याला आत्मवृत्त असे नाव खरेच देऊ नये. या पुस्तकाचा आधार घेत ऋतुपर्णने ठाकुरबाडीत जाऊन केलेली काही चित्रीकरणे खरेच मनाचा ठाव घेणारी आहेत. विशेषत: कादंबरीदेवी आणि रोबी ठाकूर यांच्या गप्पा होत ती बाल्कनी आणि कादंबरीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला तो प्रसंग! 
डॉक्युमेंटरी पाहून काही वेळ नुसताच विचार करत राहिले. ठाकुरांच्या नायिका आठवल्या. भोवती फेर धरून उभ्या राहिल्या. एकेकीकडे अगदी जवळून पाहताना त्यांची घडण, झळाळ स्पष्ट जाणवू लागला. दीडदोन शतकांपूर्वी कागदांवर अवतीर्ण झालेल्या या स्त्रिया, ठाकुरांना त्यांच्याभोवतीच्या जगात कुठेतरी आढळल्या असतीलच, याच शंका नाही. मात्र तरीही त्यांचे निर्णय काळाच्या पटावर उठून दिसतात, हे खरे!
‘नष्टनीड’ कथेतली चारुलता पाहिली तर ती ठाकुरांच्या फार जवळच्या नात्यातून लिखाणात उतरली होती, हे आपण जाणतोच. चारूचे विश्व, तिची संगीताची जाण, तिची बौद्धिक जाण, सौंदर्यासक्ती, आणि तिची समजूत, तिचे एकाकीपण या साऱ्यातून तिची प्रेम करण्याची शक्ती, झोकून देण्याची वृत्ती थक्क करणारी आहे. चारू अमलसाठी पझेसिव्ह होते, त्याने आपल्याला दिलेले वचन मोडले म्हणून खिन्न होते, दूर गेलेल्या अमलला स्वत:चा दागिना मोडून पत्र पाठवायचे धाडस ती करते. इतकेच नव्हे, तर अखेरीस भूपती जेव्हा चारूला तू सोबत येतेस का असे विचारतो, त्या वेळी आपल्या मनाला साक्षी ठेवून न जायचा निर्णय घेते. इथे ती मनस्विनी अधिक स्पष्ट, ठाशीवपणे आपल्या पुढ्यात येते. तिची प्रेम करण्यातली तीव्रता, उत्कटता आणि त्याच निर्णयाची किंमत चुकवण्याची तिची तयारी या दोन्ही गोष्टींसाठी चारुलता फेवरिट होते.
चोखेर बालीतली बिनोदिनी मला फार आवडते. तिच्या मनावरचे ताण, गुंता अतिशय सूक्ष्म आणि तीव्रपणे कादंबरीत उलगडत जातो. तिला नाकारणाऱ्या, डिवचणाऱ्या महेंद्रला अद्दल घडवायची तिची तयारी, त्याच वेळी बिहारीबद्दल तिच्या मनातला सॉफ्ट कॉर्नर, आपण आशालताची फसवणूक करतोय ही जाणीव आणि महेनबद्दल वाटलेले सहज नैसर्गिक शारीर आकर्षण. बिनोदिनी तिच्या सर्व भावना, संवेदनांबद्दल प्रामाणिक आहे. आहे हे असे आहे. त्यात लपवणे नाही. या सर्व प्रसंगांचा ताण सावरत राहणारी १९०३ सालची बिनोदिनी काळाच्या पुढची वाटते. 
ठाकुरांनी ज्या लघुकथा लिहिल्या, त्यातली एक महत्त्वाची कथा म्हणजे स्त्रीर पोत्रो (बायकोचे पत्र)! या लघुकथा त्यांनी १९१३ ते १९१८ या काळात लिहिल्या. स्त्रीर पोत्रोमधली मृणाल, गरीब घरातून आलेली. थोरल्या सुनेत सौंदर्याचा अभाव म्हणून मुद्दाम गरीब घरातली पण सुंदर मुलगी म्हणून पसंत केलेली. तिला मन आहे, ते सर्व गोष्टी टिपणारे आहे. ती कविता करते, मात्र ती अत्यंत नगण्य गोष्ट आहे. तिला हिशेब येतो, मात्र बाईने पुरुषांची कामे करू नये. तिचे अवघड बाळंतपण आणि त्यातून दगावलेले मूल. अाई तर झाले मात्र मातृत्व अनुभवता आले नाही, ही तिची खंत. ही खंत भरून निघते ती बिंदूच्या येण्याने. बिंदू नावाच्या अनाथ मुलीचा सर्वांचा विरोध पत्करून मृणालने घेतलेला कैवार, तिच्या साथीने मृणालला लागलेला ‘स्व’चा शोध आणि अखेरीस बिंदूच्या सुटकेसाठी मृणालने उचलेले धाडसी पाऊल, मात्र त्यापूर्वीच बिंदूने केलेला आत्मघात. हे सर्व ताण मृणाल तिच्या पत्रातून लग्नाच्या पंधराव्या वाढदिवसाला सांगते. ते पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरून! आणि या सर्व घुसमटीला संपवते. “मी आता पुन्हा घरी येणार नाही. तुमच्या घरात माझी काहीच किंमत नाही, हे मला कळले,” असे कळवते. मृणाल शांत आहे. कोणतीही खळबळ तिच्या मनात नाही. तिला तिचा मार्ग ठाऊक आहे. आणि त्या निर्णयाची किंमत चुकवायची तिची तयारीही आहे. 
श्रीमंत, बाहेरख्याली, माजोरड्या जमीनदाराशी विवाह करून त्याची वंचना, उपेक्षा सोसणारी गिरीबाला जेव्हा नवऱ्याला अद्दल घडवायला म्हणून नाटक कंपनीत जाते, तेव्हा रंगमंचावर तिच्या एन्ट्रीलाच प्रेक्षक कौतुक करतात आणि ती नवऱ्याकडे तिखट कटाक्ष टाकते. माझ्याखेरीज नाटक होणार नाही, म्हणून जाहिरातबाजी करून नाटकातल्या नायिकेला घेऊन दीड महिना गायब झालेल्या गोपीनाथचा अहंकार ठेचला जातो. ही ‘मानभंजन’ कथा आणि तिची नायिका गिरीबाला. प्रारंभी गिरीबाला रडताना दिसते. सगळा अन्याय सोसताना दिसते आणि नंतर मात्र ती बंड पुकारते.
हावरट मामा आणि अगदीच बुळा नवरामुलगा यांचे रंग ओळखून लग्नाच्या मांडवातून वरात परत पाठवणाऱ्या वडिलांच्या निर्णयाला साथ देणारी आणि मला लग्न करायचे नाही, मातृभूमीची सेवा करायची आहे, असे स्पष्ट सांगणारी ‘अपरिचिता’ कथेतली कल्याणी!
बालविधवा होऊन माहेरी परत आलेली, भावासोबत राहणारी आणि तळमजल्यावर दवाखाना चालवणाऱ्या भावाच्या डॉक्टर मित्राच्या प्रेमात असलेली ‘कंकाल’ कथेची नायिका! ही नायिका ज्या पद्धतीने आपल्या देह व मनाच्या सगळ्या इच्छा ज्या मोकळेपणाने व्यक्त करते, ते वाचणे हा आनंद ठरतो. ही कथादेखील ठाकुरांनी १९१३च्या आसपास लिहिली आहे. 
या सर्व नायिकांचा विचार करताना सतत जाणवते की, त्यांनी त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी कुणावर सोपवली नाही. किंवा आपल्या अवस्थेसाठी त्या कुणाला दोष देत बसल्या नाहीत. आयुष्य पुढ्यात आलं तसं प्रामाणिकपणे जगल्या. शक्य तोवर शांत राहिल्या. मात्र जेव्हा त्यांच्या अस्तित्वावर कुणी घाव घालायला गेला, तेव्हा मात्र त्यांनी बंड पुकारले. ते स्वत:चे, स्वत:पुरते! आणि त्यांनी स्वत:च्या वागण्याला, निर्णयाला उगाचच त्याग, स्त्रीत्व, माया, ममता, वगैरे फालतू सेंटिमेंटल नावं देत त्यांचा इश्यूदेखील केला नाही. त्या निखळ माणूस म्हणून जागल्या.
भूपतीसोबत न जायचा निर्णय घेणारी चारू म्हणूनच अमलवर जिवापाड प्रेम करणाऱ्या चारूहून मोठी वाटते, कारण ती मनाविरुद्ध जगू इच्छित नाही. अगदी मंदाने करून दिलेला विडा खाणाऱ्या अमलबद्दल पझेसिव्ह होणारी चारूदेखील रसरशीत आणि जिवंत, लोभस वाटते. महेंद्र पुरता आपल्यात गुंतला आहे, हे कळल्यावर म्हणूनच बिनोदिनीचे मन आशासाठी व्याकूळ होते, कारण आपण मैत्रिणीला दुखावले, ही भावना तिच्या मनात आधी येते. लग्न होऊन पंधरा वर्षांनी का होईना, पण स्वत:च्या निर्णयावर ठाम राहणारी मृणाल म्हणूनच वेगळी भासते. 
ठाकुरांच्या या सर्व नायिका कमालीच्या जिवंत वाटत. उष्ण रक्ताच्या, धमन्यांतून वाहणाऱ्या लालजर्द इच्छांचा मुक्त स्वीकार करून त्यांच्या पूर्ततेचा ध्यास धरणाऱ्या, हाडामांसाच्या! त्यांचे जगण्याचे धोरण एकच आहे, जे तुकाराम महाराज म्हणतात ते –

सत्य असत्याशी, मन केले ग्वाही
मानियले नाही, जनमता!

माझे मन माझ्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. इतर काय म्हणतात, काय बोलतात, यांचा मी विचार करत नाही. इतक्या निखळ प्रामाणिकतेने जगण्याला भिडणाऱ्या या सर्व नायिका म्हणूनच मला अतिशय प्रिय आहेत. जिवलग आहेत!
 
madhavpriya.bhat86@gmail.com
बातम्या आणखी आहेत...